- माजी वित्तमंत्री आम. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन रविवार दिनांक 31 मे रोजी चंद्रपूर जिल्हयात रक्तदान शिबीरांचे आयोजन!
- चंद्रपूर जिल्हा भाजपाचा उपक्रम!
- सर्व शहरांसह तालुका मुख्यालयी होणार रक्तदान शिबीरे!
चंद्रपूर : दिनांक 31 मे हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती दिवस! हा जयंती दिवस भाजपतर्फे चंद्रपूर जिल्ह्यात सेवादिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.. या सेवादिनाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे प्रत्येक तालुका स्तरावर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिनांक 31 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वा. दरम्यान चंद्रपूर शहरासह जिल्हयातील सर्व शहरांमध्ये तसेच तालुका मुख्यालयी रक्तदान शिबीर आयोजित करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली देण्यात येणार आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन हे रक्तदान शिबीर आयोजित होत आहे. भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मार्चा आणि भाजपा महिला आघाडी यांच्या माध्यमातुन जिल्हाभर हे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा दूर करण्याच्या दृष्टीने हे रक्तदान शिबीर सेवा म्हणून आयोजित करण्यात येत आहे. हे रक्तदान शिबीर सोशल डिस्टंसींग पाळून करण्यात येणार आहे.
या रक्तदान शिबीरात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे व रक्तदान करावे, असे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, प्रा. अतुल देशकर, संजय गजपूरे, राजेश मून, राहूल सराफ, ब्रिजभूषण पाझारे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रेणुका दुधे, चंद्रपूरच्या महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, बल्लारपूर च्या उप नगराध्यक्षा सौ. मिना चौधरी, काशी सिंह, पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, गजानन गोरंटीवार, राहूल संतोषवार, नगराध्यक्षा श्वेता वनकर, उपनगराध्यक्षा रजिया कुरैशी, मुलच्या नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, बल्लारपूर तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल, चंद्रपूर तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, नामदेव डाहूले, सिंदेवाही तालुकाध्यक्ष राजू बोरकर, वरोरा तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, वरोरा शहर अध्यक्ष सुरेश महाजन, भद्रावती शहर अध्यक्ष प्रविण सातपुते, भद्रावती तालुकाध्यक्ष तुळशिराम श्रीरामे, जिवती तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष बबनराव निकोड, राजुरा तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, नागभीड तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम, चिमूर तालुकाध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर यांच्यासह जिल्हयातील सर्व भाजपा पदाधिका-यांनी केले आहे.
(वाचा विशेष लेख)
============√√√√√√√============
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (विशेष लेख)
राजकारण, समाजकारण आणि धर्मपरायण या क्षेत्रात परमोच्च शिख गाठणार्या तसेच शुद्धचारित्र्य सात्विक आचारविचार व चोख कारभार यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून लौकीक संपादन केलेल्या अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या या लौकीकाबद्द्लच पुण्यश्लोक असे म्हटले जाते. अहिल्यादेवींनी आपल्या कारकिर्दीत हिंदू देवळांच्या व तीर्थ क्षेत्रांच्या जीर्णोद्धारासाठी झटत असताना मशिदी, दर्गे यांचा विसर पडू दिला नाही. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार, बद्रीकेश्वरपासून रामेश्वरापर्यंत व जगन्नाथपुरीपासून सोमानथपर्यंत अनेक मंदिरे, उद्याने, विश्रामगृहे, अन्नछत्रे, विहीरी, धर्मशाळा, रस्ते, पाणपोया असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. नर्मदा, गंगा, गोदावरी या नद्यांवर सर्वप्रथम घाट बांधून नद्यांवर घाट बांधण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.
अहिल्यादेवींच्या उज्ज्वल कामगिरीबद्दल कवयित्री शांता शेळके म्हणतात,
राजयोगिनी सती अहिल्या, होळकरांची | अजून नर्मदा जळी लहरती, तिच्या यशाची गाणी ||
परधर्माविषयी त्यांच्या मनात सहिष्णूता व आदर होता. त्यामुळेच अहिल्यादेवींच्या राज्यात सर्वधर्मिय लोक आनंदाने व सुखाने नांदले. परराज्यांशी त्यांनी सलोख्याचे व परस्पर सहकार्याचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळेच निजाम, हैदर, टिपू, नबाब हे त्यांच्याविषयी आदर बाळगून होते.
वैधव्याच्या दुःखाने आणि पुत्रशोकाने होरपळून निघालेल्या या कर्तृत्ववान व धाडसी महिलेने धीरोदात्तपणे निधड्या अंतःकरणाने पुनश्च उभे राहून मध्य भारतात मराठी साम्राज्याच्या ध्वज फडकत ठेवला. पतीनिधनानंतर अहिल्याबाई सती जायला निघाल्या होत्या. पण सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांची समजूत घालून या निर्णयापासून त्याना रोखले. त्यानंतर अहिल्याबाईंनी सासऱ्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून उर्वरित आयुष्य दौलतीचा सांभाळ व जनहित कार्यात व्यतीत केले. १७६६ मध्ये मल्हाररावांच्या निधनानंतर नर्मदाकाठी महेश्वर येथे राजधानी स्थापित करून त्यांनी येथूनच राज्यकारभाराची सूत्रे समर्थपणे चालवली. उत्तम प्रशासक म्हणून नावलौकीक मिळवला.
अहिल्याबाईंनी सैनिकी शिक्षणही घेतले होते. त्या उत्तम लढवय्या होत्या. सैनिकांचे मनोधैर्य टिकवून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी त्या नेहमी सैन्यदलाला भेटी देत असत. त्यांनी सैन्यात महिलांची एक तुकडीही ठेवली होती. पेशव्यांवर त्यांची अपार निष्ठा होती. माधवराव, सवाई माधवराव, नाना फडणीस यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. मराठी राज्याच्या इतिहास लिहिणारे जॉन माल्कम म्हणतात, अहिल्यादेवींनी अंतर्गत राज्यव्यवस्था आश्चर्य वाटावी एवढी नमुनेदार होती. ती एक विशुद्ध अंतःकरणाची आदर्श राज्यकर्ती होती.
पुरोगामी विचारसरणी असलेल्या अहिल्यादेवींनी कालबाह्य झालेल्या पूर्वीच्या अनेक कायद्यांमध्ये परिस्थितीनुरूप सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. विधवांचे धन जप्त करून ते राजकोषात जमा करण्याची जुलमी प्रथा बंद केली. विधवेला मुल दत्तक घेण्याची इच्छा असल्यास तिला तशी परवानगी देण्यात आली. या न्यायिक प्रक्रियेच्या आड येणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिली जाईल, असे फर्मान काढले होते. अहिल्यादेवींनी जवळपास २८ वर्षे राज्यकारभाराची धुरा समर्थपणे सांभाळली. मल्हाररावांच्या काळात राज्याचे वार्षिक उत्पन्न सोळा लाक रूपये होते. अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत ते एक कोटींपर्यंत गेले. त्या राजकारणाबरोबरच अर्थकारणातही पारंगत होत्या. गावोगावी लोकांना जागीच न्याय मिळावा म्हणून पंचाधिकारी नेमले. भिंड, गोंड जमातीच्या लोकांकडून त्यांनी पडीक जमिनीवर लागडव करून राज्यकोषात भर टाकली. प्रजेकडून कर रूपाने प्राप्त झालेला पैसा जनकल्याणाच्या विविध उपक्रमांसाठी राबवून प्रजेला सुखी व आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी सारं आयुष्य वेचलं.
अहिल्यादेवींनी राज्यव्यवस्थेत शिक्षणावर अधिक भर दिला. होळकरांची राजधानी महेश्वर शिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. नामवंत व्यक्ती व शैक्षणिक संस्थानांमार्फत शिक्षण दिले जात असे. हिंदी व मराठी पाठशाळेतून संस्कृत भाषेचेही शिक्षण दिले जाई. याशिवाय वेद-पुराण, शास्त्रे, वेदांत व्याकरणाचे शिक्षण विद्वान-पंडितांमार्फत देण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांच्या राजदरबारात कलाकार, साहित्यिक, शिल्पकार, पंडितांना विशेष मानसन्मान दिला जात असे. कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी यांना सरकार दरबारी मानाचं स्थान होतं.
देशासाठी त्यांनी केलेल्या गौरवपूर्ण कार्याबद्दल भारत सरकारने या राजमातेच्या स्मरणार्थ कृतज्ञतेच्या भावनेतून अहिल्याबाईंच्या नावाने १९७५ मध्ये टपाल तिकीट काढलं. पंडित नेहरूंनी ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी या आपल्या पुस्तकात हिंदूस्थानातील युद्ध व बंडे या शीर्षकाखालील लेखात अहिल्यादेवींविषयी आदर व्यक्त करताना म्हटले आहे, की मध्य हिंदूस्थानात आपल्या कार्यकर्तृत्वाने नावलौकीक मिळविलेल्या विभूताचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो अहिल्यादेवी होळकर या कर्तबगार स्त्रीचा. एका अल्पवयी विधवा स्त्रीने १७६५ ते १७९५ ही तीस वर्षे इंदूर संस्थानावर अधिराज्य केले हे कौतुकास्पद आहे. तिने युद्ध टाळून आपल्या संस्थानात शांतता व सुव्यवस्था राखून भरभराटी आणली. अहिल्यादेवींचे हे महान कार्य सर्वधर्मियांना वंदनीय होतं. म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी असे म्हटले जाते.
स्वतःचे कौटुंबिक जीवन दुःखीकष्टी असतानाही अहिल्यादेवी धीरोदात्तपणे प्रजेच्या सुखशांतीसाठी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कार्यरत राहिल्या. धवलचारित्र्य आणि पावित्र्याची चैतन्यमूर्ती अहिल्यादेवी म्हणजे मानवी जीवनातील अज्ञान, अंधःकार व दुःख करून त्यास प्रकाशमान करणारी दीपज्योत होय.
- रणवीर रजपूत
वरिष्ठ सहाय्यक संचालक
माहिती व जनसंपर्क महासंचलनालय
0 Comments