चंद्रपूरात आढळला पुन्हा एक रुग्ण!



चंद्रपूर येथील दुर्गापूर येथे हैदराबाद वरून आलेलं एक कुटुंब कोरोनटाईन होते. याच कुटुंबांमधील एका पुरुषाच्या अहवाल पॉझिटिव आल्यामुळे चंद्रपुरातील पॉझिटिव रुग्णांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये कृष्णनगर चा रुग्ण दाखल होता. आजचं या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव आल्यामुळे शुभवार्ता देण्यात येवून तो रूग्ण कोरोना मुक्त झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली होती. नुकतेच दुर्गापूर येथील रुग्ण मिळाल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या चंद्रपुरात दोन अशी झाली असून दुर्गापूर येथील रुग्णाची मुलगी 13 मे रोजी हैदराबाद येथून चंद्रपूरात परतल्यानंतर पूर्ण कुटुंबाला इन्स्टिट्यूटशनल कोरोनटाईन करण्यात आले होते, नुकत्याच आलेल्या अहवालानुसार या पाच पैकी एक जण म्हणजे त्या मुलीचे वडील पॉझिटिव्ह निघाले असल्याच्या वृत्ताला जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दुजोरा दिला आहे. सदर कुटुंब असल्यामुळे इन्स्टिट्यूशनल कोरोनटाईन असल्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. बाहेर राज्यातून आलेले व रेड झोनमधून आलेल्यांनी त्याची सूचना जिल्हा आरोग्य विभागाला द्यावी अशी कळकळीची विनंती यापूर्वीही करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सदर सूचनेचे पालन करून बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी जेणेकरून त्रास सहन करावा लागणार नाही.


विशेष वार्ता :

आता मास्क वापरणे अनिवार्य!

चंद्रपूर, दि. 20 मे: कोरोना आजारासह अन्य साथजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चेहऱ्यावर मास्क न वापरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, खर्रा खाऊन पिचकारी मारणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढे घराबाहेर पडायचे असेल तर शहर असो वा गाव प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या व इतरांच्या आरोग्यासाठी मास्क लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोरोना सोबतचा दीर्घ संघर्ष लढतांना यापुढे चेहऱ्यावरचा मास्क अनिवार्य राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असून यासाठी प्रसंगी दंड आकारा असेही पोलीस विभागाला बुधवारी दिलेल्या निर्देशात स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये. यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली असून आता आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 लागू असून कामाचे ठिकाण, सार्वजनिक स्थळी, दुकाने,आस्थापने, प्रतिष्ठाने  येथे कार्यरत कामगारास, कर्मचारी तसेच सुविधेचे लाभ घेणारे जिल्ह्यातील सर्व नागरिक यांनी कायम मास्क वापरणे गरजेचे आहे,असे न केल्यास 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

मास्क वापरणे का गरजेचे :

संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्याकरिता तसेच संसर्गजन्य बाधित व्यक्तींपासून दुसऱ्या व्यक्तीला रोग होऊ नये यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे.

मास्कचे प्रकार :

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत.यामध्ये प्रामुख्याने मास्कचे तीन प्रकार आहे. एन 95 मास्क,  सर्जिकल मास्क, घरगुती कापडी मास्क हे आहेत.

विविध प्रकारचे मास्क कोणी वापरावे :

ताप,खोकला इत्यादी लक्षणे असणाऱ्या, आजारी लोकांची काळजी घेणारे आरोग्य सेवा कर्मचारी,आजारी लोकांची काळजी घेणारे व्यक्ती, संशयीत अथवा पुष्टी झालेले रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांनी सर्जिकल मास्क वापरले पाहिजेत.

बाधित व्यक्तींना सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांनी एन 95 मास्क वापरला पाहिजे. कापडी मास्क अथवा रुमाल सर्व नागरिकांनी वापरावे. जेणेकरून धुतल्यानंतर मास्कचा वापर करता येईल.

मास्क वापरण्याची पद्धत:

अगोदर हात स्वच्छ धुवावे, मास्क घालण्यापूर्वी फाटला नाही ना याची खात्री करून घ्या, रंगीत भाग बाहेरच्या बाजूने ठेवावा.मास्कच्या वरचा भाग नाकाच्या मधोमध ठेवण्यात यावा. मास्कच्या मध्यभागी असलेली स्ट्रीप नाकावर फोल्ड करण्यात यावा. मास्कचे  धागे अथवा रबर कानाच्या मागे  काळजीपूर्वक बांधावीत. मास्कच्या खालच्या बाजूला हनुवटीच्या दिशेने ओढावे.जेणेकरून नाक, तोंड आणि हनुवटी योग्य पद्धतीने झाकल्या जाईल.मास्कला वारंवार हात लावणे टाळावे.मास्क घालून असताना जास्त बोलणे टाळावे,जेणेकरून मास्क जास्त वेळ घालने सोयीचे होईल.मास्क ओले झाल्यास, फाटल्यास किंवा खराब झाल्यास तात्काळ तो बदलून घ्यावा.

मास्क काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावा, मास्क काढताना त्यांना मागची दोरी अथवा रबर काळजीपूर्वक काढावे. मास्कच्या समोरच्या भागाला हात लावू नये.खोकताना किंवा शिंकताना नेहमी रुमालाचा वापर करावा. आपल्याजवळ रुमाल नसल्यास हात दुमडून आपल्या हाताच्या कोपऱ्याचा  वापर करावा.

मास्कचा चुकीचा वापर किंवा एकच मास्क वारंवार वापरल्या गेल्यास संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

अशी लावावी मास्कची विल्हेवाट :

घरगुती कापडी मास्क किंवा कापडी रुमाल वापर झाल्यानंतर वेगळ्या बकेटमध्ये डिटर्जंट पावडरचा उपयोग करून स्वच्छ धुऊन वाळवून घ्यावे आणि नंतर त्याचा वापर करावा.

शस्त्रक्रिया वेळी वापरण्यात येणारे सर्जिकल मास्क आणि वैद्यकीय मास्क एन 95 हे एकदाच वापरण्यात यावे. हे मास्क काढल्यानंतर 1 टक्के सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाने निर्जंतुकीकरण करून जाळून किंवा जमिनीत पुरून त्याची विल्हेवाट लावावी.

मास्क दुकानांमध्ये न घेता स्वतः घरी तयार केलेला कापडी मास्क वापरणे कधीही योग्य राहील. घरातील सुती कापडांचा देखील मास्क तयार करता येतो.तसेच साधा रुमाल सुध्दा चांगला पर्याय आहे.मास्क वापरून स्वतः सुरक्षित रहा तसेच इतरांनाही सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करा.

थुंकणाऱ्यांवरही कडक कारवाई:

जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास तसेच गुटखा, तंबाखू खावून थुंकल्यास संसर्गजन्य आजार होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे थुंकणे  हे स्वतःसाठी व इतरांसाठी घातक असून असे केल्यास दंडात्मक कारवाई प्रशासनाला अंतर्गत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आरोग्यासाठी घातक:

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने या थुंकीद्वारे कोरोना, स्वाइन फ्लू, निमोनिया तसेच इतरही संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ शकतो.

शहरामध्ये आतापर्यंत केलेली कारवाई:

चंदपूर शहरामध्ये आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी  मास्क न वापरलेल्या 783 नागरीकांवर  कारवाई करत  1 लाख 56 हजार तर थुंकणाऱ्या 73 नागरीकांवर  8 हजार 500 दंड करीत मनपा अंतर्गत कारवाई केली आहे.

जिल्ह्यामध्ये साथ रोग प्रतिबंध कायदा 1897,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 लागू असून या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणारी व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

स्वतःचे तसेच इतरांचे सामाजिक आरोग्य धोक्यात न टाकता आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सूचना तसेच प्रशासनाचे निर्देश नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या