- कोविड रुग्णाचा व्हायरल ऑडीओ - व्हीडीओ तथ्यहीन
- दक्षतेने घेतली जात आहे घाबरलेल्या रुग्णाची काळजी
- वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांचा खुलासा
- डॉ. सोनारकर हे कोविड-19 रुग्णालय कक्षाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून अतिशय जबाबदारीने काम बघतात.
- "त्या" रूग्णाला मानसिक रोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांचेकडून समुपदेशन!
- "तो" रुग्ण घाबरला असल्यामुळे नैराश्यातून त्याने स्वतःचे मत बनविले.
चंद्रपूर, दि.22 मे : नवी दिल्ली येथून 17 मे रोजी ब्रह्मपुरी येथे आलेल्या रुग्णाला सुरुवातीपासून संशयित रुग्ण म्हणून वैद्यकीय उपचार करण्यात आले. या रुग्णाचा अन्य कोणत्याही पॉझिटिव्ह रुग्णाशी संबंध आला नाही. पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे हा रुग्ण घाबरला असून अतिशय सहानुभूतीने व वैद्यकीय नियमांचे पालन करत त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याचे समुपदेशन केले जात असून प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता एस.एस.मोरे यांनी दिली आहे.
ब्रह्मपुरी येथील या रुग्णाने पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर घाबरून जात ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश समाज माध्यमांवर प्रसारित केल्यामुळे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश डॉ. मोरे यांना दिले होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष भेट देऊन रुग्ण व्यवस्थेची पाहणी केली. डॉ.मोरे यांनी केलेल्या लेखी खुलाशानुसार सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असून भीतीपोटी व घाबरून व्हायरल केलेल्या ऑडिओ व्हिडिओ मध्ये सत्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा रुग्ण नवी दिल्ली येथून 17 मे रोजी ब्रह्मपुरीला आल्यानंतर त्याच दिवशी प्राथमिक लक्षणानंतर त्याला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. ब्रह्मपुरी येथून 108 रुग्णवाहिकेत द्वारे कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून 17 मे रोजीच रात्री साडेआठ वाजता कोविड कक्ष क्रमांक 2 मध्ये संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले.
19 मे रोजी सकाळी त्याचे स्वॅब घेण्यात आले. 20 मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला विशेष कोविड वार्डमध्ये हलविण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाकरिता संडास बाथरूमची वेगळी व्यवस्था असणाऱ्या स्वतंत्र कक्षात एकट्यालाच ठेवण्यात येते. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 2 पॉझिटिव्ह रुग्णामधील अंतर 1 मीटर ठेवण्यात आलेले आहे. या रुग्णाला त्यांनी आरोप केलेल्या यवतमाळ येथील रुग्णासोबत ठेवण्याचा प्रश्नच नाही. 17 च्या रात्रीपासून पॉझिटीव्ह अहवाल येईपर्यंत संशयित रुग्णाच्या कक्षात हा रूग्ण होता. यवतमाळ येथील रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतरच तिला थेट पॉझिटीव्ह रूग्णाच्या स्वतंत्र कक्षात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्याचा अन्य कोणत्याही रुग्णाची संपर्क आला नाही. सर्वप्रथम संशयित रुग्ण म्हणून ज्या कक्षात ठेवण्यात आले होते तो कक्ष व पॉझिटिव्ह रुग्णाचा कक्ष यामध्ये तसेही 200 मीटरचे अंतर आहे. त्यामुळे नवी दिल्लीवरून आल्यापासूनच या रुग्णाला लक्षणे होती. त्यामुळे विशिष्ट वैद्यकीय काळजी घेतली गेली आहे.
रुग्णाच्या दैनंदिन आवश्यकतेनुसार त्याला जेवण चहा-नाश्ता फळे देण्यात येतात. चादर दर दिवशी कोड सिस्टीमनुसार बदलण्यात येते. कोविडच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनेनुसार एकदाच वापरून नष्ट करता येईल, अशा ताटातच जेवण पुरवले जाते. रुग्णाला पुरविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाची वैद्यकीय तपासणी केल्या जाते. सॅनिटायझर प्रत्येक रूममध्ये स्वतंत्र दिले जाते. पिण्याचे पाणी गरम पिणे आवश्यक नाही. पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स पुरवण्यात येते. तसेच दैनंदिन वापरासाठी आवश्यक असणाऱ्या तेल, साबण, टूथपेस्ट, इत्यादी आवश्यक वस्तूंची कीट स्वतंत्र पुरविली जाते. रुग्णाच्या कक्षाचे 4 तासाने रोज निर्जंतुकीकरण केले जाते. विलगीकरण कक्षामध्ये स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था देखील पुरविण्यात आली आहे. याबद्दल आतापर्यत कोणत्याही रुग्णाची तक्रार आली नाही.
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी सर्व आवश्यक सेवा चंद्रपूर येथे उपलब्ध आहे. रुग्णाला अन्य आजार असल्यास व या संस्थेत संबंधित सुविधा उपलब्ध नसल्यास नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येते. ब्रह्मपुरीच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्याला नागपूर येथे पाठविण्याची आवश्यकता नसल्याचेही डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. भास्कर सोनारकर हे कोविड-19 रुग्णालय कक्षाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून अतिशय जबाबदारीने काम बघत आहे. त्यांनी देखील रुग्ण घाबरला असल्यामुळे नैराश्यातून त्याने स्वतःचे मत बनविले असल्याचे स्पष्ट केले आहे.
तथापि, अतिशय दक्षतेने या रुग्णाची काळजी घेतली जात असून त्याच्या कुटुंबीयांनी याबाबत आश्वस्त असावे, अनेक रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर अशा प्रकारची मानसिकता तयार करून घेतात. सर्वच रुग्णांना या काळात समुपदेशन केले जाते. या रूग्णाच्या पॉझिटीव्ह आल्यानंतरच्या वागणुकीमुळे मानसिक रोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांनीही समुपदेशन केले आहे.
मात्र अशा प्रकारच्या चुकीच्या आरोपामुळे सध्या प्रचंड कामाच्या व्यापात असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेची देखील बदनामी होते, याबाबत डॉ.मोरे यांनी आपल्या खुलाशात खेद व्यक्त केला आहे.
0 Comments