- अफवा पसरविणारी क्लिप व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार
- जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या एकूण 12
- पहिला पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना मुक्त जाहीर
- 64 संशयित व्यक्तीच्या नमुन्यापैकी 10 जण पॉझिटीव्ह
चंद्रपूर जिल्ह्यात आता सात ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र
चंद्रपूर,दि. 21 मे : चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आणखीन 9 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्याच्या अतिरिक्त 5 भागात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे .आता एकूण 7 प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाले आहे. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असून रुग्णासंदर्भात चुकीची माहिती व प्रशासनाची बदनामी करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची सूचना पोलीसांना करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 612 व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 513 नागरिक निगेटिव्ह असल्याचे पुढे आले आहे . आणखी 87 नागरिकांचे स्वॅब निकाल प्रतिक्षेत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपर्यंत 3 पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यात आणखी 9 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मात्र हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) करण्यात आले होते. त्यामुळे बिनबा गेट व दुर्गापूर हे प्रतिबंधीत क्षेत्र वगळता अन्य कोणताही भाग सिल करण्यात आला नव्हता. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी रात्री उशिरा आणखी 5 क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र ( कॅन्टेन्टमेंट झोन ) जाहीर केले आहे.
नवीन प्रतिबंधित क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील मौजा विसापूर गाव, पोंभुर्णा तालुक्यामध्ये येणारे मौजा जाम तुकुम, सिंदेवाई तालुक्यात येणारे मौजा विरव्हा, मूल तालुक्यात येणारे मौजा चिरोली, राजुरा तालुक्यातील मौजा लक्कडकोट या गावांचा समावेश आहे. या परिसरातील असणाऱ्या पॉझिटिव नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आरोग्य विभागाकडे नावे द्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 मे रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या कृष्ण नगर येथील रुग्णाला सध्या नागपूर येथे कोविड शिवाय अन्य आजारासाठी दाखल केले आहे. हा रुग्ण आता कोरोना मुक्त झाला असल्याचे कळविले आहे. या रुग्णाची 16 व 17 मे रोजी सलग 2 दिवस कोरोना चाचणी करण्यात आली होती. दोन्ही चाचणी निगेटिव्ह आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये साथ प्रतिबंधक कायदा लागू असताना रुग्णासंदर्भात चुकीची माहिती, प्रशासनाला बदनाम करणारा कोणताही मजकूर, आक्षेपार्ह ऑडिओ, व्हिडिओ पोस्ट समाज माध्यमांवर पसरविणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने सायबर सेलला दिले आहे. 21 मे रोजी प्रसारमाध्यमांवर जारी करण्यात आलेल्या एका आक्षेपहार्य ऑडिओ क्लिप संदर्भात कारवाई करण्याबाबतही प्रशासनाने सूचना केली आहे.
चंद्रपूर शहरात बाहेरून येणाऱ्या सर्व नागरिकांनी शकुंतला लॉन्स येथे आपल्या नावाची नोंदणी करावी व प्राथमिक आरोग्य तपासणी करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे याशिवाय अन्य तालुक्याच्या ठिकाणी थेट पोहोचणाऱ्या नागरिकांनी बस स्थानक परिसर व तहसील कार्यालयामध्ये नावाची नोंद करावी गावांमध्ये थेट पोहोचणाऱ्यांनी गावातील यंत्रणेला, आशा वर्करला याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments