शेतकऱ्यांची फसवणूक होता कामा नये तलाठी;ग्रामसेवक यांनी मुख्यालयी रहावे



पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे खरीप पूर्व बैठकीतील निवेदन

चंद्रपूर दि.22 मे: खरीप हंगामासाठी आवश्यक असणारी खते, बी-बियाणे, किटकनाशके शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. यासाठीचे आवश्यक ते सर्व नियोजन करावे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बोगस बियाणे, खते, किटकनाशके यांची जास्त दराने विक्री होणार नाही, कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याबाबतची आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन खरीप हंगाम यशस्वी करा तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाचे सर्व निर्देश योग्य प्रमाणात पाडले जावेत यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांनी मुख्यालयीच रहावे, अशा सुचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहूजन कल्याण विकास तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले.

खरीप हंगामात संदर्भात राज्यस्तरीय बैठक राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तसेच महाराष्ट्रातील एकूण खरीप हंगामावर येणाऱ्या अडचणी खतांचा व बियाण्यांचा पुरवठा आणि उत्पादन वाढीसाठी काय प्रयत्न केले पाहिजे यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर चंद्रपूर येथे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी  संवाद साधतांना त्यांनी जिल्ह्यातील खरीप पुर्व हंगामासाठी निर्देश दिले.

जिल्ह्यात कृषी केंद्रामार्फत जे बियाणे विकली जातात ते बियाणे विक्री करीत असताना कृत्रिम तुटवडा दाखवून चढ्या भावाने शेतकऱ्यांची लूट केल्या जाते. यावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील कृषी केंद्रासमोर बोर्ड लावून त्या कृषी केंद्रातील बियाण्यांचा साठा व सदर बियाणे कोणत्या कंपनीची आहे त्यांची नावे व दर स्पष्ट लिहिलेले असावे.असे आदेशही कृषी केंद्राला कृषी विभागार्मॉत देण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास सदर कृषी केंद्रावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हा संकटात आहे. अर्थव्यवस्था सुद्धा मोडकळीस आली असून यावर खरीप हंगामावरच पुढच्या अर्थव्यवस्थेला मदत होईल तसेच हा हंगाम यशस्वी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत होता कामा नये या दृष्टीने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पीक कर्जासाठी बँका अनावश्यक कागदपत्रांची मागणी करीत असतात. यासाठी शेतकऱ्यांना आता आधार कार्ड ,सातबारा, स्वतःचा फोटो आणि नमुना आठ या चार कागदांची पूर्तता करावी लागणार आहे. याशिवाय कोणतेही कागदपत्र बँकांनी शेतकऱ्यांना मागू नये तसे आढळून आल्यास सदर बँकावर कारवाई करण्याचे आदेश दिले. कोणतीही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये अशी भूमिका जिल्हा प्रशासन वेळोवेळी घेत आहे.

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या संदर्भात व तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर समिती गठित करण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला. त्यासोबतच पिक कर्ज संदर्भात काही तक्रारी असल्यास टोल-फ्री क्रमांक सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शेतकरी गटामार्फत खतांचा व बियाण्यांचे वाटप मोठ्या प्रमाणात होत आहे सोशल डिस्टन्सीगचा वापर करून गर्दी होऊ न देता जिल्ह्यातील कृषी विभागामार्फत खबरदारी घेतल्या जात आहे. शेतकऱ्यांना खते, बी -बियाणे, कीटकनाशके खरेदीसाठी यापुढे चेक स्वरूपात व्यवहार करता येणार आहे. सोयाबीन पिकाची लागवड करीत असताना खरीप हंगामात  शेतकऱ्यांनी स्वतःकडे राखून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करावा जेणेकरून शेतकऱ्याची बचत होईल व चांगले पीक घेण्यास मदत मिळेल. सोयाबीन पिकाबरोबर तुर या आंतरपिकाचे मोठ्याप्रमाणात उत्पादन शेतकऱ्यांने घ्यावे.तसेच ज्वारीचे सरळ वाण ह्या पिकाचे उत्पन्नही  जिल्हयातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सातत्याने सोयाबीनचा पेरा वाढवल्यामुळे उत्पन्न घटले व जमिनीचा कसही कमी झाला आहे. जमिनीच्या मातीच्या परीक्षणाची मोहीमही कृषी विभागामार्फत राबविली जात असते त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच शेतकऱ्यांनी स्वतःच्या पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

संकटप्रसंगी कोरेनाच्या पार्श्वभूमीवर गावातील तलाठी आणि ग्रामसेवक यांनी गावातच उपस्थित राहावे जेणेकरून सामान्य माणसाला व शेतकऱ्याला  त्रास होणार नाही अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील शेवटच्या माणसाचा कापूस शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीचे धोरण प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाबाबत काही अडचण व तक्रार असल्यास 18002334000 / 07172-271034 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या