मरण्यासाठी जगतांना...!  • डॉ. आनंदे व इतर डॉक्टरांच्या मृत्यूचे वास्तव !

  • भारतात दर दहा हजार लोकसंख्येमागे एक डाॅक्टर !

(असोसिएशन ऑफ फिजीशिएशन ऑफ इंडिया ( विदर्भ ) चे पुर्वाध्यक्ष व "संकल्प" , चंद्रपूर चे व अध्यक्ष "संकल्प" तथा प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अशोक वासलवार यांनी आजच्या डॉक्टरांच्या स्थितीवर शब्दबद्ध केलेले त्यांचे मत...!)

✒️ डॉ. अशोक वासलवार ✒️


जिल्ह्यात एकाही मृत्युची नोंद नाही असे आम्ही सर्वांना अभिमानाने सांगायचो पण आज चित्र पालटलेले आहे. बाधितांचा आजचा आकडा व मृत्युची संख्या अचंबित करणारी आहे. भारत वर्षात बाधितांची संख्या जागतिक दुस-या क्रमांकावर जरी असली तरी मृत्यु दर हा जगात सर्वात कमी आहे. ह्याचाच अर्थ असा की बाधीतांच्या निदाणाचे प्रमाण जरी वाढले असले तरी त्यांच श्रेय योग्य मार्गदर्शन करणारी सरकारी यंत्रणा व उपचार करणारे डाॅक्टर्स , नर्सेस व इतर वैद्यकीय कर्मचा-यांना जाते.

कोरोनाच्या भयानक स्फोटामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवळे निघणार हे १९६३ साली नोबेल पारितोषिक जिंकणा-या केनेथ आरो या अमेरिकन अर्थ तत्ववेत्यांनी वर्तविले होते. आरोग्य सेवा ही बाजारु वस्तु नाही. बाजारात साखर , कपडे, चपला अशा वस्तु मिळतात जिथे ग्राहक हा राजा असतो. ती वस्तु खरेदी करतांना माझ्याकडे पैसे किती आहेत आणि काय घ्यायचे हे मी ठरवतो. आरोग्य सेवेच्या मार्केट मध्ये मात्र मी , काय औषधोपचार करायचा हे माझ्यासाठी दुसरं कुणीतरी ठरवत असतं. मी या बाजारात राजा नाही , उलट संकटात सापडलेला ग्राहक असतो.

कोरोनाच्या या महामारीत, डाॅक्टर आहेत का डाॅक्टर ? बेड आहेत का बेड ? असा आकांत करीत सर्वजन वावटळी सारखे फिरत आहेत. डाॅक्टरांनाही आजार झाल्यास त्यांना ही बेड मिळत नसल्याची विदारक परिस्थिती आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेबद्दल सांगायचे म्हटले तर आज संपूर्ण भारतात ८० टक्के बाह्यरुग्ण व ६० टक्के आंतर रुग्ण हे खाजगी औषधोपचार करुन घेतात. "लॅन्सेट" ह्या वैद्यक शास्त्रातील मासीकाने जन सामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध होण्याबद्दलच्या १९५ देशांचा अहवाल २०१८ मध्ये प्रसिध्द केला होता. त्यात आपल्या देशाचा क्रमांक १३९ व बाजुच्या श्रीलंका ह्या छोट्या देशाचा क्रंमांक ७१! ह्या वरुन आरोग्य सेवेच्या जाणीवेची आपल्या सरकारची जोखीम किती तीव्र आहे, ह्याची कल्पना यावी.

भारतात आरोग्य क्षेत्रासाठी केलेली आर्थिक तरतुद ही सकल राष्ट्रीय उत्पनाच्या केवळ १.५ टक्के तर जपान ११ टक्के, अफगानीस्तान १०, नेपाळ ०६ , श्रीलंका ०४, चीन ०५ टक्के आरोग्यावर खर्च करतो. अमेरिकन पब्लिक हेल्थ असोसिएशन च्या अहवालानुसार जर आपण आरोग्यासाठी एक डाॅलर खर्च केला तर आरोग्य व्यवस्थेवर होणारा खर्च हा साडेपाच डाॅलरने कमी होतो. हेच आपण रुपयामध्ये समजु शकतो. आरोग्य सेवेत आपल्याला दिसत नसणारा भाग खुप महत्त्वाचा आहे व तो दुर्लक्षीत झालेला आहे. कोरोनाच्या ह्या महामारीत देशभर नविन रुग्णालये उभी करण्याचा व त्यांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सरकार करते आहे. पण तीथे काम करण्यासाठी डाॅक्टर्स व इतर कर्मचारी कुठुन आणनार ? इतर सरकारी इमारतींना कमीत कमी वेळात हाॅस्पिटल मध्ये रूपांतरित करता येईल पण डाॅक्टर्स , नर्सेस आपल्याकडे अल्पावधित कसे तयार करणार ? ह्याचे उत्तर उपलब्ध नाही. एकट्या महाराष्ट्रापुरता जर मनुष्य बळाचा विचार केला तर संचालक पदापासुन ते डाॅक्टर्स , नर्सेस व अन्य आरोग्य कर्मचा-यांची ४० हजार पदे रिकामी आहेत. खाबुगीरी वाढली आहे. महाराष्ट्रात १७ हजार डाॅक्टरांची पदे अजुन भरायची असुन त्यात ८० टक्के तज्ञ डाॅक्टरांच्या जागा आहेत. जे डाॅक्टर व परिचारीका आहेत  ते या परिस्थितीत जिवाची बाजी लाऊन आपले कर्तव्य करीत आहेत पण त्यांच्या आरोग्याचे काय ? 

कोरोनाचा विषाणुने आपल्या देशात प्रवेश केल्यापासुन ह्या देशातील डाॅक्टर्स प्रतिकुल परिस्थितीतही ह्या आजाराशी लढा देत आहेत. ही बाब त्या पेशाचा अभिमान वाढवणारीच. वैद्यकीय सेवा करणा-यांना अत्यावश्यक सेवा म्हणुन बंधने असतील ही तरी संबधितांच्या आरोग्याची आवश्यक काळजी घेणे ही महत्वाचे ठरते पण त्यासाठी आवश्यक अशी काय  उपाययोजना केली आहे ? सुरुवातीच्या काळात जेव्हा स्वसंरक्षक साधने उपलब्ध नव्हती तेव्हा अनेक डाॅक्टर्स रेनकोट घालुन पण काम करत होते. नंतर ती जेव्हा उपलब्ध झालीत ती पुरेशी संरक्षक नसल्याचेच सिध्द झाले. स्वसंरक्षक साधणे ( PPE Kit ) परिधान करणे व नंतर काढणे हा एक क्लेशदायक प्रकार आहे. ते घातल्यानंतर शरीरावर एक प्रकारचे आवरण तयार झाल्यामुळे एक थेंब पाणीही पिता येणार नाही, स्वच्छता गृहात पण जाता येत नाही. घामाने पुर्ण शरीराची वाट लागते. ते कितीही सुरक्षित असले तरी  प्रचंड त्रास होतो पण वैद्यक म्हणुन डॉक्टर्स आपला  स्वधर्म पाळतात. कधीकधी घरी जाण्याची परवानगी पण नसते. डाॅक्टरांवर आरोप करणा-या मंडळीनी अशा वातावरणात रोज १२ तास ०१ महीणा काम करुन दाखवावे म्हणजे ह्या त्रासाची त्यांना जाण होईल. जिवावर उदार होऊन कोवीड सेंटर मध्ये प्रतिकुल परिस्थितीत काम करताना ! पुणे, मुंबई , पिंपरी- चिंचवड , लातुर मध्ये डॉक्टरांवरती हल्ले झालेत. तुरळक घटना इतर ठिकांणी पण घडल्या. कुठे नेऊन ठेवले तुम्ही या योद्ध्यांना ? महाराष्ट्रातील ७० टक्के डाॅक्टरांना अशा प्रसंगाना कधी ना कधी सामोरे जावे लागलेले आहे असा आय. एम. ए. चा अहवाल सांगतो. देवासमान समजल्या गेलेल्या डाॅक्टरांवर हल्ले हे समाजभान हरविल्याचे लक्षण असुन रुग्णाच्या नातेवाईकांनी कायदा हातात न घेता कायद्यानेच न्याय मागितला पाहीजे , हे त्यांना केव्हा समजेल?  सरकारी सेवेतील डाॅक्टर्स कमी पडु लागल्यानंतर खाजगी डाॅक्टरांना,  उपचार करण्याचे  सक्तीचे करण्यात येऊन त्यांचे खाजगी दवाखाने कोवीडसाठी आरक्षित करण्यात आलेत  पण स्वसंरक्षक साधणे पुरविण्यात आली नाहीत. तरीही अनेक खाजगी डाॅक्टर्स आपल्या सेवा देण्यासाठी समाजभान ठेऊन पुढे आलेत. 

दर एक हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर असावा असे जागतिक मापन, पण भारतात  दर दहा हजार लोकसंख्येमागे  एक डाॅक्टर आहे. दिवस रात्र एक करुन स्वतःचा जीव धोक्यात टाकुन देशवासीयांसाठी,  कोरोना विरुध्द लढणारे खरे योध्दे हे डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारीच आहेत.आजपर्यंत ३८२ डाॅक्टरांचा ह्यात मृत्यु होऊन ४००० च्या वर  डाॅक्टरांना कोवीडची लागण झाली पण  केंद्र सरकारकडे ह्याची साधी नोंद ही नाही. महाराष्ट्रात आय. एम. ए. च्या सर्वेक्षणानुसार 55 चे वर डाॅक्टर्स मृत्यु पावले आहेत.  जिवन मरणाच्या ह्या  लपाछिपीत डाॅक्टरांनी त्यांची कार्यक्षमता पुर्णपणे सार्थ करण्याचा प्रयत्न केला, हे समाजाने व टिका करणा-यांनी समजुन घ्यायला हवे. नको त्यांना  शहीदाचा दर्जा किंवा आर्थिक मदत त्याचे ते भुकेले नाहीत. समाजाचीच संवेदना जर गेली, तर ही अपेक्षा ही सार्थ ठरत नाही. आय. एम. ए. ने केलेल्या सर्वेक्षणात सामान्याचे सरासरी आयुष्यमान ६५ ते ७० वर्षे व डाॅक्टरांचे सरासरी आयुष्यमान ५५ ते ६० आढळुन आलेले असुन हृदय विकार , ब्रेन स्ट्रोक , ब्लड प्रेशर , डॉयबेटिज, थॉयराइड, कर्करोग , रक्त वाहीन्याच्य बिमा-यांचे प्रमाण वाढलेले असल्याचे दिसून येते.  रुग्णाला मृत्युच्या दाढेतुन व आजारातुन बाहेर काढण्याची कसरत , सर्व जग झोपले असतांना रात्री अपरात्री धाव, व्यायामाकडे दुर्लक्ष , नोकरीच्या ठिकानी व रुग्णालयात होणारी जिवापाड मेहनत, स्पर्धेत व ज्ञानात टिकुन राहण्याचे आव्हान , रुग्णांची वाढती संख्या, राजकीय व शासकीय दबाव , नातेवाईकांचे  टेंशन व प्रसंगी मारहानीची भीती अशा कारणांनी ताणतणाव वाढुन डाॅक्टरांचे सरासरी आयुष्यमान कमी झालेले आहे.

आयुष्यातील २० ते २५ वर्ष शिक्षणात काढल्यानंतर पुढे कुठे डॉक्टर म्हणुन मान्यता मिळते तो पर्यंत इंजिनियर, वकिल व इतर व्यावसायिक आपल्या क्षेत्रात स्थिर पण होतात. सध्याची परिस्थिती भविष्यात अशीच राहीली तर वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा व डाॅक्टर बनण्याचा युवकांचा कल कमी होत जाईल.  एकीकडे सरकार जास्त डॉक्टर्स तयार व्हावे म्हणुन प्रयत्न करते तर दुसरीकडे समाज डाॅक्टरांना समजुन न घेता त्यांना मारहान करतो. डाॅक्टरांनी कसे वागावे, काय करावे ? प्रश्नच आहे .                                                                    आमचा मित्र वर जातांना सांगुन गेला असेल  

         "जरी  डाॅक्टर  आहे  मी 
         परिस्थितीची ही विटंबना ,
          कर्तव्य   दक्ष  तरीही मी 
          मरण्यासाठी   जगतांना "

Post a Comment

0 Comments