झाडीपट्टीतला गावगाळा अन् झाडीबोली....!लयी बाक्क झालं....!

लयी बाक्क झालं म्या झाडीबोली साहित्य संमेलनाला गेलो. चांद्याहून माहा शेजारी परमोद ले या संमेलनाचं मोठं हूरूप होतं. त्यानीचं वारंवार जाऊ-जाऊं असं मांगी डेंग-डेंग लावलं आणि सनवारी ११ वाजताच्या एसटीने आमी दोघे बी मुलसाठी निघांलो. मुलमंधी गेल्यावर एका वळखीच्या माणसाच्या गाडी घेतली अन् परमोद आणि मी एका गाडीवर अन् विजुभाऊ अन् अमित राऊत दुसऱ्या गाडीवर अर्ध्या घंट्यात पोहोचलो जुनासुरल्याले. उद्घाटन आटोपले होते, पालकमंत्री जी वाटेला लागत होते. बरं झालं म्या संमेलनाला गेलो. आपल्या भासा बोलणारे, लिहीणारे आपले लोक भेटले. "आता लिवा कता" हा कारकरम पूर्ण बघितला. आणिक थांबावे, असं वाटतं होतं पण थांबू शकलो नाही. पण झाडी बोलीतील लेखमाला, कविता वाचण्यास व परकासित करण्यात लई मजा येेेत आहे.
-राजु बिट्टूरवार, चंद्रपूर

झाडीपट्टी मनल्यावर बहूलोकाईच्या भिमट्या व-या जातेत....! झाडीपट्टी भाय बाक्का सब्द लागते, आयकालं ..होका नाही जी? ईदर्बातल्या लोकाईलं ऊलू ऊलू माईत आहे. पण नाई का पु-या महाराष्ट्रालं माईत नसे ....हे झाडीपट्टी मनजे होते तरी का ? ... झाडीपट्टी मंजे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा न् गोंदिया या चार जिल्याईचा मिरुन बनते थो भाग...! अन् या जिल्याईत जे मराटी भास्या बोललेत ते भास्या मंजे झाडीबोली..! आमच्या या झाडीपट्टीत जास्त धानस पिकतेत दंडाईत अन् धानपट्टाही मनतेत या भागालं..! रोवना करतानी भाय तरास...! वरास होते मनून पातीवरच्या बाया गाना मनू मनू रोवतेत .या भागात परतेक जिल्यात तरे, बोळ्या, बंदारे, धरण बहूस आहेत.परतेक जिल्याची वळख येगरी येरगरी आहे.. झाडीपट्टीचे ..बोलभासेचे रुपही येगरे येगरे आहे...येती नाई का ..! परतेक जिल्यात कोसाकोसावर मराटी भास्या बदलत जाते.जास्ती मनाल तं हा खेळ्याईचा भाग..! बाकीच्याही भास्या बोलतेत येती...मराटी, तेलगू, गोंडी, पोवारी, हिंदी....अस्या बहू भास्या बोलतेत या भागामंदी...जुन्या जाणत्या लोकाईकडून माहीत होते बोलभास्या,चालरीअन् रहनसहन...लगनसराई आली मंज्या परतेक भागात फिरावाचा मोका येते,अन् परतेक भागातली..जिल्यातली खरी चालरीत माईत होते.बहू भास्या,वेश, चालीरीती आहेत या झाडीपट्टीमंदी. पु-या झाडीपट्टीत मनाल निसर्गाची देन बहू आहे... खास मंजे बारमाई नद्या, नाले,अन् जंगल मनाल त मस्त घप्प (घनदाट) जिकडं पाहाल तिकडं हिवरा ..हिवरा जंगल अन् त्या दाटीत मदीमदी गावं,खेडे ,सेहरं वसले आहेत. मनून येतच्या रानभाज्या बहू परसिद्द आहेत.सप्पा बरोबर पण या झाडीनंस येती मोटी समस्याही आली आहे.. जंगल ,डोंगर -पहाळ याचा आदार घेऊन नक्षलवाद फोपावला अन् विकासाच्या दिसेन चाललेल्या झाडीत मातर मोठा अळंगा आला.
अस्याही परीस्थितीत येती लोकं भाय मिरुन मिसरुन रायतेत...! खेळेगावात जाऊन पाहाल तर येथच्या चालीरीतीची खरी वळख होते..येतच्या लोकाईचा मानसन्मान पाहून नवा माणूस बेंबरेजून जाते.काही काही भागात का नाई, गावचे झगळे गावातस मिटवतेत..कोर्ट कचेरीत अन् पोलिस स्टेसनात जाऊस नाही देत.तेथची न्यायव्यवस्था येगरीस आहे. येथच्या साद्याभो-या मानसाईलं हे राजकारणी लोकं मातर मनात ईक भरवून बिगळवतेत...! भावाभावाईत झगळे लावाचे काम करतेत .या राजकारणापाई सग्गा भाऊ पक्का वैरी होईन जातेत अन् मुकावर मुक नाई पडू देत.अन् एकामेकाईचे डोक्से फोडतेत.निवडणुकीत हेच(राजकारणी) लोकं खेळ्यापाळ्याईतली शांतता भंग करतेत....! आमलं अबिमान वाटते आमच्या झाडपाईचा (झाडीतील लोकं) घरच्या मोवाची दारु काहाळतेत मिरुनस पेतेत अन् झगळतेतही...! पण राती झगळा झाला तरी सकारी ऊटून सप्पा ईसरुन एकामेकालं रारामही करतेत .सनावाराच्या दिसी तं पु-या गावात आनंदानं मिळून मिसरुन सन साजरा करतेत. सळा सारवण, रांगोळ्या टाकून एकमेकाच्या मदतीनं सप्पा कारेक्रम करतेत. भजन,पुजन यात मोटे भाविक .सणाच्या दिसी त गरीब, श्रीमंत एक होऊनसन्या घरोघरी तेलरांदा बनवून एकमेकालं देतेत. गावामंदी कोणालं हातपाय झाला तं (बिमार पडला तर) सप्पाजन धावतेत एकमेकासाटी. एकाद्या गरीबाचा लगन,मरण जरन कराचा असल त वर्णी काहाळून तो पुरा करतेत.माज्या झाडीतला माणूस मोटा प्रेमळ,मानवाईक अन् मनमिळाऊ रायते.
आतं हरुहरु बदलत चालला येतचा माणसही शिक्षण घेऊन. शिक्षणाच्या मिसानं सेहेराची हवा लागत आहे खेळ्यातही,नवे पोरं त बरेवाईट बदल करत आहेत रहनसहन चालरीत.आतं खेळ्यात का नाही ..लुगळे धोतराचा जमानास नाही रायला पँन्ट शर्ट, सलवार कुरता लावालं शिकले.परतेकाच्या हाती मोबाईल, घरी टि.वी..नव्या जमान्यापरमान बदल आहेत हरुहरु काही बदल चांगले काही वाईट असतील मातर झाडीपट्टीच्या मातीचा वास काही कमी झाला नाही.
  मनोरंजन मनाल त माझ्या झाडीपट्टीतली झाडीपट्टी रंगभूमी वडसा,नवरगाव त सा-या महाराष्ट्रात डंका वाजवते.येती दंडार, नाटक, वग, खडीगंमत, तमाशा, भजन, किर्तन  विशेष मनजे झाडीपट्टीत बैलाईचा जंगी ईनामी शंकरपट भरवला जातो गावागावात पट मंजे कास्तकाराईचा जीव न पराण..या मिसानं गावात दंडार नाटक रायते रातभर अन् सोयरकीचे कामही होते, घरोघरी पाऊण्याईचा मानमान होते.  अजूनही जश्याच्या तशा ऊब्या आहेत जुन्या परंपरा परतेक भागात काही दिवस सरकारनं बदी आणली होती पटाईवर पण पुना मंजुरी भेटली न् ढवळ्या पवळ्याची जोडी दानीवर गागरा ऊडवू लागली.मोठी यात्रास भरते पटात भाजीपाला खरेदी विक्री, हाँटेलवाले,चिल्लर धंदे बहू चालतेत पटाच्या मिसानं.
           झाडीबोली बोलणा-या न् झाडीपट्टीत रायणा-याईलं झाडपे मनतेत लोकं. पुण्या मुंबईवाले त आमची मजाक उळवत होते...ही  गोष्ट ...! झाडीबोली चळवळीचे जनक मा हरिश्चंद्र बोरकर सायेबांच्या कारजात धसली अन् त्याईनं या झाडीबोलीलं नावारुपालं आणूनसन्या तिचा पु-या भारतभर डंका वाजवला.नवकरी करता करता त्याईलं याची जाणीव झाली अन् त्याईच्यातल्या झाडप्यालं झाडीबोलीनं झपाटलंन ...अन् पायता पायता झाडीबोली टिकवाचे खर मनाल त ..आंदोलन सुरु झाले. त्याईच्यासंग खांद्यालं खांदा लावून पु-या  झाडीपट्टीतले लेखक ,कवी,कवयित्री ऊबे आहेत आतं...नावस घ्याहाचे झाले त..ग्रामगिताचार्य मा.बंडोपंत बोढेकर सर,मा.राजन जयस्वाल, मा हिरामण लेंझे,मा.हिरालाल पेंटर,झाडीबोलीची बहिणाबाई आ.अंजनाबाई खुणे,मा.धनराज खानोरकर ,मा.अरुण झगडकर,मा ..डॉ. लेनगुरे साहेब 
.......असे बहूझन जोडले अन् खरीखुरी चळवळ ऊबी होऊन अज मनाल त ताकतीनं ऊबी झाली झाडीबोली. झाडीपट्टीतले रंगभूमीवाले कलाकार, जुने जानते दंडारपार्टीवाले,शाहीर, लोककला सादर करणारे लोकं...परतेक जिल्ह्यात अज झाडीबोली चळवळ अन् अनेक स्याका तयार झाल्या. पईलं सरम लागाची लौकाईलं बोलालं झाडीबोलीत अज जमाना बदलला अन् आमी झाडीबोलीत लिवालं लागलून ...एकदोन नाही त ढगासवरी लोकं लिवतेत आतं बहू लेखक ,कवी,कलाकार या झाडीबोलीलं मोहोरं नेत आहेत.ढगासवरी पुस्तका लिवले परकासन केले...आमी पुण्या मुंबईच्या मागं नाही हे दाकवून देले...आमी झाडीपट्टीवाले.....या चारही जिल्ह्यात जसी काही होडस लागली आहे.. पुस्तका लिवासाठी..रोजस कोटी नाही कोटी पुस्तक परकासन होतस रायतेत.बहू ढंगात अन् झाडीच्या रंगात रंगलून आमी आतं..आमचे लोकगीतं, भजन, अभंग, लेक, कथा, कविता संग्रह त काही विचारु नोका लगीतस झाले लिवून...अन् लिवना सुरुच आहे. परतेक जिल्यात ,सेहेरात ,खेळ्यात झाडीबोली साहित्य मंडळ स्थापन करुन झाडीबोली सेवा सुरु झाली. अन् कविसंमेलन भरवत आहून आमी.रोजस नवेनवे कवी,कवयित्री तयार होत आहेत...अन् खरीखुरी झाडीबोली लोकाईलं वाचालं भेटत आहे. याचा आमच्या झाडप्याईलं अबिमान आहे.परतेक जिल्यात ही चळवळ जोरानं धावत आहे.. पटतल्या बैलासारकी ..अन् चारही जिल्यात अजवरी 28 साहित्य संमेलन झाले ,यावरुन माज्या झाडीबोली शब्द साधकांईचे आबार मानवा मनतो.झाडीपट्टीत कवी लोकाईचा महापूर आला आहे सध्या... परमान मराटीतही अन् झाडीबोतही लेखन करालं लागले माज्या झाडीतले झाडपे..।यासाठी रातीचा दिवस करत आहेत ...ते मंजे डॉ. बोरकरसर सर, मा.बंडोपंत बोढेकर सर.... जवानाईलंही लावतेत असी हलकाई आहे त्याईच्यामंदी.. चारीधामफिरुन खेळ्यापाळ्याईत भरवतेत हा झाडीचा महाकुंभ मेळा...! अशा माज्या बहूभाषिक, बहूधर्मीय, बहूवेशभुषा असलेल्या झाडीपट्टीत येग-या येग-या रंगानं अन् ढंगानं  माजी ही झाडीबोली नवे नवे रुप घेत राहो... अन् असीच अमर होत जावो........!
-प्रा. विनायक धानोरकर,
गडचिरोली

Post a Comment

1 Comments

  1. व्हा खूप बाका लवल्या सर
    अभिनंदन 🌹👌👌👌👌

    ReplyDelete