गावाची सुधारणा !



लयी वर्सान मी
माया गावी आलो,
गाव पाउन पूरा
बेंब्रेजुनस गेलो।।१।।
येकस पानठेला होता
तवा, आतं झाले चार,
येक दोगस तेती दिसाचे
आतं शौकीन झाले फार ।।२।।
गायी भसी शेऱ्या मेंढ्या
कोंबड्या बहू होत्या तवा,
दुध दही तूप सस्ता
भेटे कितीबी खावा !!३!!
जनावरंबी आतं तवा
सारखे नाइ रायले,
गोठ्याच्या जागी नवीन
नवीन घरं झाले।।४।।


गावाच्या मंदातून होती
मोठी सीदी वाट,
अना मंदामंदातुन होती
आडवी आडवी वाट।।५।।
वाटच्या दोनी बाजूंनी होत्या
गवताच्या कुडाच्या झोपड्या,
अना पाटील सावकारायचे
येक दोन वाडे अना माड्या।।६।।
झोपड्यांच्या लान आंगनाले
होते काट्याकुट्याचे कूप,
कोटं खोटं लावलं होतं
फाटकं पोतं खूप।।७।।
ढिवराची पोरं लंगोटी नाइत 
आंगड्यावरच राये,
नवाडा कोनी आला का
 कुपाआडून  टोंगु टोंगु पाये।।८।।
माय बाप काम
 धंद्यालं मजुरीलं जाये,
बुडी तान्याचा पारना दोरी 
धरुन हालवत राये।।९।।
आतं झोपड्याच्या जागी 
झाली लान मोटी घरं,
दारुच्या भट्टीचे बी होते 
काइक घरं हे नाइ बरं।।१०।।    
शाळाबी आतं सातवीवरी ,
दुसरी खाजगी बी झाली.  
सप्पा शिकाले लागले 
पोरं अना पोरी।।११।।
टि.वी. सप्पायच्या घरी 
अना मोबाईल हाती,
सप्पा येकमेकालं हॅलो हॅलो 
मनती भविष्याची माती।।१२।।
सुधारनेन केलारं कहर 
मानुसकी नाइ रायरी नावालं. 
पान खाउन थुकतेत फिदी फिदी 
हासतेत लावून डोऱ्यावर गागल||13||

कवयित्री  : शशिकला गावतुरे,  मुल

Post a Comment

0 Comments