सावध व्हा ! सावध व्हा!! सावध व्हा!!!
चंद्रपुर विशेष : गुरूवार दि. 23 एप्रिल रोजी रात्रो साडे आठ च्या दरम्यान सिमेंट ने भरलेला १२ चाकी ट्रक चंद्रपूर-मूल मार्गावरील केसलाघाट मारुती मंदिराजवळ एका झाडाला धडकला. ही धडक एवढी जोरदार होती की लोडेड सिमेंट ट्रक रस्त्यावर ९० अंशामध्ये सरळ होऊन कोसळला व गाडीचे केबिन रोडच्या शेजारला असलेल्या झाडामध्ये अक्षरश: आतमध्ये घुसला. पोलिसांना ट्रकची केबिन सब्बल ने उपसून बाहेर काढावी लागली. सचिन जैन यांच्या मालकीच्या असलेल्या या ट्रक चा चालक अपघाताचे वेळी दारू च्या नशेमध्ये होता त्यामुळे चालकाचा तोल गेला अशीच ही नेहमीप्रमाणे घटना होती. नेहमी घडणार्या घटनेप्रमाणे चालक त्याठिकाणाहून पसार ही झाला. या लोडेड ट्रकमध्ये ड्रायव्हर क्लिनर व्यतिरिक्त पाच-सहा मजदूर व एक बालक केबिन मध्ये होते. अपघातानंतर चालक फरार झाला. आत मध्ये असलेले हे मजदूर रक्ताच्या थारोळ्यात मंदिरातील बेंचवर विव्हळत होते. तेलंगाना येथील हे मजूर कुटुंबासहित बाहेर कुठेतरी जात असल्याचे सांगत होते. या चार चाकी ट्रक मध्ये तेलंगाना राज्यातील उत्पादित असलेले बिर्ला-ए-वन कंपनी चे सिमेंट ची वाहतुक होत होते.
प्रश्न येथेचं उभा राहतो, तेलंगाना मधून आलेले हे मजूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिरले कसे? तेलंगाना मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात सिमेंट बॅग भरून चंद्रपूर जिल्ह्यात कुठे नेल्या जात होते? दोन दिवसापूर्वीच सिमेंट उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे? मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जाणार्या या सिमेंट वाहनाला दुसर्या राज्यातून जिल्ह्यात येण्याची परवानगी मिळाली कशी? बिना परवानगीने शिरलेले वाहन तपासणी नाक्यावर कां बरे थांबविण्यात आले नाही? परराज्यातून सिमेंट भरून आलेले हे ट्रक व त्यात असलेले परराज्यातील मजूर जिल्ह्यातील संचारबंदी च्या होत असलेल्या पायमल्ली चे वाभाडे काढणारी घटना आहे. Lock down च्या आदेशाचे पालन करत 80 टक्के जनता घरातच आहे. महामार्गावर, राज्य महामार्गावर चार चाकी वाहने धावतांना दिसतात. बहुतेक वाहनांवर जीवनावश्यक वस्तूंची सेवा असे कागदी प्रिंट समोरच्या भागावर चिपकलेले आहे. यांची कोणती ही तपासणी नाक्यांवर केली जात नाही हे जिल्ह्यातील वास्तव चित्र आहे.
वरील अपघात जिल्ह्यासाठी फार बोलकी घटना आहे. वरील प्रकरणाचा तपास सुरू आहे. मूल पोलीस स्टेशनमध्ये भादंवी 279, 337, 188 सहकलम 184, 134/ 177 मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेले परराज्यातील मजदूरांना चंद्रपुरात तपासणीसाठी भरती करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना कोरोनटाईन ही केल्या जाईल. अपघाताच्या तपासामध्ये मालकाने दुसऱ्याला गाडी विकल्याची बाब ही समोर येईल, नेहमीसारखे चोरटे मार्ग याठिकाणी शोधले जातील. आणि तसे जर काही घटनेत घडत असेल तर येणाऱ्या दिवसात चंद्रपूरला कोरोनापासून कोणीही रोखू शकणार नाही हे सत्य आहे. तालुक्याच्या सीमा अंतर्गत, जिल्ह्यांच्या सीमा अंतर्गत, राज्याच्या सीमा अंतर्गत कोणतीही तपासणी होत नाही. खुलेआम वाहतूक सुरू आहे. बाहेर जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी बिना परवानगीने या गावातून त्या गावात जात आहे. परराज्यातून येणाऱ्या वाहनांमध्ये पैशांच्या लालसेपोटी परराज्यातील नागरिकांना त्या-त्या जिल्ह्यात सोडून दिल्या जात आहे. या घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वर घडलेली घटना ही त्याचे बोलके उदाहरण आहे.
घटना घडलेले ठिकाण चिचपल्ली की मूल पोलीस स्टेशन या वादात पडले असतानाच एका प्रत्यक्षदर्शीने थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांना या घटनेची सूचना दिल्यानंतर मूलची पोलीस त्या ठिकाणी आली व तपास हाती घेतला हे वास्तव आहे. रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होईल असे चित्र भासविले जात आहे. परंतु 108 या क्रमांकावर कोणताच रिप्लाय मिळाला नाही, असे या घटनेत प्रत्यक्षदर्शींनी अनुभवले आहे. पोलीस आल्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त मजुरांना उपचारासाठी दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. Lock down च्या नियमांना तस्कर आणि काळाबाजार करणाऱ्यांनी धाब्यावर बसविले आहे. लॉक डाउन नंतर देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, काही विभागाचे जबाबदार मंत्री, विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचे राजकीय नेते हे सक्रीयरित्या कार्य करतांना दिसत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अन्य काही विभागाचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याला कोरोना मुक्त ठेवण्यापासून आपले कर्तव्य ठामपणे बजावीत आहे. सद्यपरिस्थीतीत जिल्ह्यामधील कोरोना अपडेट हे दिवसातून दोन वेळा देवून जिल्हावासियांना आश्वस्त करण्याचे कार्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत आहे परंतु त्यांच्या अधिनस्त असलेले काही अधिकारी-कर्मचारी मात्र फक्त ड्युटी बजावीत आहेत. कागदोपत्री "ओके" दाखविण्याच्या हा खेळ जिल्ह्याला येणाऱ्या काळात डोकेदुखी ठरणार असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
ऑनलाइन पद्धतीने वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली जात असल्याच्या सूचना दिल्या गेल्या आहे. आज कोणतीही वाहने रस्त्यावर धावत आहेत. कोळसा, रेती, दारू याची खुले आम तस्करी होत आहे. तशा कारवाया ही पोलीस विभागाकडून करण्यात आले आहेत. लाॅकडाऊन नंतर आरटीओ विभागाने अशा कोणत्या ही वाहनावर कारवाया केल्या असे ऐकण्यात आले नाही. संपूर्ण आरटीओ विभाग चौकशीचा विषय आहे. आयसोलेशन मध्ये गेल्यासारखी या विभागाची स्थिती आहे. आरटीओ कार्यालयाने लाॅक डाऊन दरम्यान वाहनांना दिलेल्या परवानगीचे दर्शनी भागाचा संबंधित अधिकाऱ्यांना नंबर द्यायला हवे. परंतू "या नंबर वर इनकमिंग कॉल ची सुविधा नाही. पूर्वी रिचार्ज करा." असे म्हणण्याची वेळ आज आरटीओ अधिकाऱ्यांची झाली आहे.
बाहेर जायचे असल्यास काढावी लागणारी परवानगी, शासकीय व अन्य सेवाभावी संस्थांसाठी शासकीय वाहनांमध्ये इंधन देण्यात यावे अशा पेट्रोल पंप धारकांना असलेल्या सूचना, जीवनावश्यक वस्तू साठी लागणारे परवाने या साऱ्या बाबी लाॅकडाऊन दरम्यानच बंधनकारक करण्यात आल्या आहेत. जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेर वाहतुकीसाठी वाहनांना परवानगी देण्याची जबाबदारी आरटीओ कार्यालयाला देण्यात आली आहे. कितीतरी वाहने बिना परवानगीने आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चालत आहेत. आरटीओ विभागाचे यावर कोणतेही नियंत्रण नाही.
0 टिप्पण्या