17 में पर्यंत शहरात काय सुरू-काय बंद!



चंद्रपूर, दि. 14 मे : चंद्रपूर शहरामध्ये 2 मे रोजी रात्रपाळी काम करणारा एक सुरक्षारक्षक कृष्णनगर येथे पॉझिटिव्ह आढळला होता. तर 13 मे ला बिनबा परीसरात 23 वर्षीय मुलगी पॉझिटीव्ह आढळून आली होती. हा परीसर प्रशासनाने सील केलेला असून हे दोन्ही परीसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत केलेले आहे. त्यामुळे फक्त चंद्रपूर शहरात जीवनावश्यक वस्तु विक्री व वितरण इत्यादी आस्थापना, दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना, दुकाने पुर्ण:त बंद राहतील.

महाराष्ट्र राज्यांतर्गत कोरोना विषाणुचा (कोविड-19) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असुन महाराष्ट्र शासन, आरोग्य विभागाद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता साथरोग प्रतिबंध कायदा,1897 लागु करून त्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यात आली आहे व त्याकरिता अधिसुचना व नियमावली निर्गमित करण्यात आल्या असून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) चे कलम 144 चे अन्वये जिल्हयात दिनांक 11 मे2020 पासुन ते 17 मे 2020 पर्यंत आस्थापना संबंधाने आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.

कोरोना विषाणुचा (कोविड-19) प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच चंद्रपूर शहर व संपूर्ण चंद्रपूर तालुक्यात जीवनावश्यक वस्तु विक्री व वितरण इ. आस्थापना, दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना, दुकाने सुरु झाल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. परंतु, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर क्षेत्रात खालील सुचनांसह सदरचा प्रतिबंधात्मक सुधारीत आदेश खालील प्रमाणे लागू केलेला आहे.

जीवनावश्यक असलेल्या या बाबी कार्यरत राहतील :

अत्यावश्यक किराणा सामान, दुग्ध-दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, पार्सल स्वरुपात काऊंटर तसेच इतर मार्गांनी विक्री, वितरण व वाहतुक करण्यास परवानगी राहील.

जिवनावश्यक खाद्य पदार्थ, किराणा, दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतुक, ब्रेड, पळे, भाजीपाला,अंडी, मांस, मासे, बेकरी, पशु खाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.परंतु, आपले दुकान, आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

जीवनावश्यक वस्तु विक्री व वितरण इ. आस्थापना, दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना, दुकाने पूर्णतः बंद राहतील.

महानगरपालिका यांचेकडुन प्राप्त झालेले परवानाधारक फेरीवाले यांचे ठेले,दुकाने पुर्णत: बंद राहतील. सलुन/स्पा/केस कर्तनालय या आस्थापना सुध्दा पुर्णत: बंद राहतील.

महानगरपालिका क्षेत्राकरीता प्रवासी वाहतुकीकरिता रिक्षा, ऑटो रिक्षा बंद राहील. चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही नागरिकास अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर जाणे आवश्यक असल्यास चारचाकी वाहनात चालक व इतर 2 व्यक्तींना परवानगी राहील व दुचाकीवर एकच व्यक्ती प्रवास करु शकते.

शासकीय,निमशासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी,कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, नर्स, पॅथॉलॉजीस्ट, मेडीकल स्टोअर्स, रुग्णवाहिका व इतर सर्व कर्मचारी आणि अंत्यविधीसाठी  सदरचे आदेश हे लागू राहणार नाही.

शेती विषयक उत्पादन,सुविधा,आस्थापना संबधाने या बाबी कार्यरत राहतील :

सर्व प्रकारचे शितगृहे, वखार, गोदामा संबधित सेवा, घाऊक वितरणासाठी आणि सदर बाबीशी संबंधित पुरवठा साखळी.

कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत यांचेशी संबधीत कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती वा राज्य  शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी,बाजार विशेषत: कापुस, तुर व धान खरेदी, विक्री आस्थापना,दुकाने सुरू राहतील.

शेतकरी व शेत मजुर यांचे कडून करण्यात येणारी शेती विषयक कामे, मासेमारी व मस्त्यव्यवसाय संबधी सर्व कामे व शेती विषयक अवजारे, यंत्र विक्री व दुरुस्ती संबधीत मान्यताप्राप्त दुकाने,आस्थापना (किमान मनुष्यबळासह) सुरू राहतील.

शेती संबधीत यंत्रे, अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजुर वर्ग, केंद्र (कस्टम हायरिंग सेंटर- सीएचसी).

खते, किटकनाशके व बियाणे यांचेशी निगडीत उत्पादन व पॅकजीग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग,आस्थापना,दुकाने.शेतमाल आणि अन्य वस्तुंची आयात-निर्यात आणि वाहतुक.राज्यांतर्गत व आंतरराज्यीय कृषी,फलोत्पादन संबधीत अवजारे, यंत्रे जसे पेरणी, कापणी यांची वाहतुक सुरू असणार आहे.

जीवनावश्यक वस्तु विक्री व वितरण इ. आस्थापना,दुकाने या व्यतिरिक्त शेती संबधीत बी-बीयाणे, खते, किटकनाशके यांचेशी निगडीत उत्पादन व पॅकेजींग आणि किरकोळ विक्री संबधीत उद्योग,आस्थापना,दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहतील व रविवारला सदर दुकाने पुर्णत: बंद राहतील.

उपरोक्त प्रमाणे परवानगी देण्यात आलेले कामाचे ठिकाण, सार्वजनिक स्थळी, दुकाने,आस्थापना, प्रतिष्ठाने येथे कार्यरत कामगारांस,कर्मचारी तसेच सुविधेचे लाभ घेणारे सर्व नागरीक यांनी कायम मास्कचा वापर करणे तसेच आरोग्य सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील.

आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860चे कलम 188, 269, 270, 271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात  येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेले कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.

सदरचा आदेश दिनांक 14 मे ते दिनांक 17 मे या कालावधीकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिका,चंद्रपूर चे क्षेत्राकरीता लागू राहील.

Post a Comment

0 Comments