चंद्रपूर, दि.20 मे: कोरोना आजाराच्या सद्यस्थितीतील प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जनजागृती व प्रभावी प्रसिद्धी अभियान राबविण्यास संदर्भात 19 मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सध्या अन्य जिल्ह्यातून राज्यातून नागरिक आपापल्या गावी पोहोचत आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून काटेकोरपणे लॉकडाऊन पाळणाऱ्या नागरिकांना पुढील काळामध्ये कोरोना संदर्भात जागरूक करणे व प्रत्येक घराघरांमध्ये यासंदर्भात माहिती पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वकष प्रसिद्धी आराखडा तयार करण्यासंदर्भात आज चर्चा करण्यात आली.
स्वयंप्रेरणेने विनामूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा अधिकाधिक समावेश करावा,तसेच काही क्षेत्रातील नामवंतांनी या समाजउपयोगी कार्यात योगदान घेण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हा प्रशासन यासोबतच आनंदवन येथील महारोगी सेवा समितीचे सदस्य देखील या बैठकीत सहभागी झाले होते.
कोरोना आजारा संदर्भात शहरातील व ग्रामीण भागातील आवश्यक अशा ठिकाणी प्रसिद्धी अभियान आणखी सक्रियतेने राबविण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश आहेत. राज्य शासनाकडून देखील या संदर्भात विविध उपाययोजना सुरू आहे. सोबतच स्थानिक स्तरावर देखील मोठ्या प्रमाणात प्रचार होण्याची आवश्यकता जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी यावेळी व्यक्त केली.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजारा, उपविभागीय अधिकारी चंद्रपूर मनोहर गव्हाळ, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी डॉ.प्रिती राजगोपाल, पुजा द्विवेदी, महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी, आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवनचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे उपस्थित होते.
दरम्यान, गोसेखुर्द, इरई इत्यादी धरणामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठा असतो. परंतु, पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये. यासाठी पाणीसाठ्याची व पुरा संबंधित पूर्वसूचना केंद्रीय जल आयोगाने तसेच पाटबंधारे विभागांनी संबंधित तहसीलदार यांना देण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका नगरपंचायती, नगरपरिषद यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मान्सून पूर्व नालेसफाई व इतर मान्सून पूर्व कामे पूर्ण करावी व कुठेही पाणी तुंबणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
पशुसंवर्धन विभागाने कोणत्याही जनावरांना रोग पसरू नये यासाठी दक्षता घ्यावी व तसे प्रयत्न करावे त्याचप्रमाणे जिल्ह्यात आजारा संबंधित प्रतिबंधात्मक उपाय योजना आरोग्य यंत्रणेने राबवावी व औषधांचा साठा कमी होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तसेच पावसाळ्यामध्ये झाडे पडून रस्ते अपघात होण्याची दाट शक्यता असते हे लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी प्रयत्न करावे.जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर व पावसाळ्यामध्ये सर्व नागरिकांपर्यंत अन्नधान्य पोचविण्यासाठी पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी संबंधितांना दिल्यात.
0 Comments