अखेर "त्या" वृत्तासंदर्भात "खबरकट्टा न्युज पोर्टल" वर गुन्हा दाखल!

संपादकाला अटक व जमानतीवर सुटका !


चंद्रपूर : आज शुक्रवार दि. ८ मे ला "खबरकट्टा न्युज पोर्टल" वर राजुरा पोलिस स्टेशन येथे अपराध क्र. 285/2020 अन्वये भादंवि कलम 188, 505(1) (ब), 505 (2) सहकलम 52, 54 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. खबरकट्टा च्या संपादकाला या संबंधात अटक करण्यात येवून त्यानंतर त्यांना जमानत मंजूर करण्यात आली. पुढील तपास राजुरा पोलिस करित आहेत. 7 मे रोजी चंद्रपुरात नांदेडहून पळालेले कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण भरती करण्यात आले आहे व त्यामुळे अनेकांना त्याची बाधा होऊ शकते अश्या आशयाचे वृत्त या न्यूज पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले होते, त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली, प्रशासन खडबडून जागे झाले, काही अवधीतच पोलीस विभागाने सदर वृत्त खोटे असल्याचा मेसेज मिडीया प्रतिनीधींना पाठविला. सायंकाळी अधिकृत प्रेस नोट काढली, त्यानंतर लगेच जिल्हाधिकारी महोदयांनी खोट्या अफवा पसरविणाऱ्या पोर्टल वर गुन्हे दाखल करण्याचे पोलीस अधीक्षकांना निर्देश दिल्याची शासकीय प्रेस-नोट काढण्यात आली व वरील कारवाई "खबरकट्टा न्युज पोर्टल" वर करण्यात आली. आता तपास, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रीया असे संविधानाप्रमाणे प्रक्रीया सुरू राहील-होईल. नांदेड येथून आलेले काही सरदारांना चंद्रपूरातील गडचांदूर येथून आणून चंद्रपूरात क्वारनटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. सदर व्यक्तींचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा होता. सदर व्यक्ती रूग्ण आहेत की नाही याची पडताळणी अहवाल येण्यापूर्वीच हे वृत्त सोशल माध्यमावर व्हायरल झाले होते. त्यानंतर या व्यक्तींना नांदेड येथे हलविण्यात आले. या तिन व्यक्तींचा व्हीडिओ त्यानंतर समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्यांच्या मते ते केटीसी या कंपनीत चालक म्हणून काम करित होते. सिमेंट वाहतुकीसाठी त्यांच्या गाड्या चालायच्या. परंतू त्यांची कधीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही व त्यांनी पळ ही काढला नाही. त्यांची बदनामी करण्यात येत असल्याचे त्यांनी या व्हीडीओमध्ये सांगीतले आहे. तपासणीत काय होईल याची पर्वा नाही, परंतु आमची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावे, अशी मागणी ही त्यांनी या व्हीडीओच्या माध्यमातून केली होती.लाॅकडाऊन च्या काळामधील माध्यमांच्या (?) काही नोंदनीय(!) घडामोडी !

मागील 40 दिवसांपेक्षा ही जास्त अवधीपासून देशात कोरोना या आजारामुळे संचारबंदी लागली. भविष्यात विचार ही केला नसेल अशी अकल्पनीय ती घटना होती. काही मोजके सोडून बाकी सगळेच आपल्या घरामध्ये भीतीयुक्त वातावरणात माध्यमांवर विश्वास ठेवून काय घडत आहे, हे बघत होते आणि विचार करत होते. कुणालाही बिनाकामाने व बिना परवानगीने बाहेर निघण्याची मनाई होती. ज्या मोजक्या लोकांना यामध्ये सूट दिली होती, त्यामध्ये प्रसार माध्यमे हा महत्त्वाचा घटक होता. भारताचे प्रधानसेवक नरेंद्रजी मोदी यांनी संचारबंदीची घोषणा करतांना दिलेल्या आपल्या पहिल्या संबोधनात माध्यमांचा विशेष उल्लेख करून त्यांना बातम्या संकलनासाठी देण्यात येत असलेली "सुट" जाहीर केली. खरे पाहता, माध्यमांनाही आपले कौशल्य व आपल्यावरील विश्वास दाखवण्याची ही वेळ होती. काय घडत आहे व मग काय घडणार आहे याची माहिती सामान्य माणूस माध्यमांकडून अपेक्षा करीत होता. माध्यमांवर दाखवले-वाचले तेच सत्य याशिवाय त्याच्यापाशी पर्याय नव्हता. बहुतेक जबाबदार अधिकाऱ्यांनी संपर्कात न येता आगंतुकांना फोनवर माहिती देण्याचे कार्य यावेळी प्रामाणिकपणाने केले, यात काही संशय नाही. एखादा अपवाद वगळता प्रसिद्धी माध्यमांनाही बाहेर जाण्याचे काही कारण ही नव्हते. तेच जिल्ह्यातही घडले. अगदी शेवटपर्यंत चंद्रपूर जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये होता, त्यामुळे विशेष वृत्ताचे असे कोणते ही कारण नव्हते. वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी आपले कर्तव्य बजावत वेळेचे भान न ठेवता चंद्रपूरसाठी स्वतःला वाहून घेतले होते. चेहऱ्यावर कोणताही ताण-तणाव नाही, कोणतीही निराशा नाही ही त्यांची "रित" साऱ्यांनाच भावणारी होती. "ग्रीन झोन" जिल्हा ही त्यांच्या याच कार्याची पावती होती. "शोध घ्यावा" किंवा "शोध पत्रकारिता करावी" असे काही या 40 दिवसांमध्ये होतेच नाही. कोरोनाशिवाय अन्य कोणत्याही बातम्या प्रकाशित झाल्या नाही व दाखविण्यात आल्या नाही. मधात एक घटना घडली आणि चंद्रपुरातील एका व्यक्तीचा नागपूर येथे मृत्यू झाला. तो मृत्यू काही माध्यमांनी "उताविळ" पणे चर्चेचा विषय बनविला. माध्यमांना शासकीय माहितीशिवाय या काळामध्ये सोर्स नव्हते. कोरोना विषयीची अधिकृत माहिती शासनाच्या निघणार्‍या "प्रेस नोट" मधून अधिकृतपणे दिली जायची. जिल्हा आरोग्य विभाग सदर माहिती जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून ती माहिती डीआयओ च्या माध्यमातून प्रसिद्धी माध्यमांपर्यंत यायची व नंतर ती न्यूज पोर्टल, इलेक्ट्रॉनिक चॅनल, वृत्तपत्र या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचायची अशीच सरळ-साधी पद्धत सुरू होती. चंद्रपूर चे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रोज सायंकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील घडामोडींच्या व्हिडिओ प्रसारित करायचे, डीआयओ च्या माध्यमातून वृत्त प्रकाशित व्हायचे, ही रोजची बातम्या संकलनाची रोजची पद्धत होती. घरी येणारे वृत्तपत्र दुसऱ्या दिवशी यायचे, त्यामुळे नागरिकांना उत्सुकता असायची ती आज काय झाले याची? आणि हीच उत्सुकता "झटपट वृत्त" देऊन स्थानिक न्यूज पोर्टल भरून काढू लागले. साहजिकच "न्यूज पोर्टल" चे "व्हिवर्स" वाढले, वाचकांची संख्या वाढली, परंतु त्यातून आर्थिक उत्पन्न वाढले नाही, ही वास्तविकता आहे. मग "व्हिवर्स" वाढविण्याच्या "सबसे तेज च्या" नादात साहजिकचं झटपट बातम्या देण्याकडे "न्युज देणाऱ्यांचा" ओघ ही वाढला.
त्यातचं ग्रीन झोन असलेला चंद्रपूर जिल्हा! सारेचं "नो टेन्शन" होते. शासनाच्या आदेशानुसार नंतर काही दिवस वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली. त्यावेळी स्थानिक न्यूज पोर्टल व इलेक्ट्रॉनिक माध्यमे प्रभावशाली व विश्वासाची ठरली व "रेस" मध्ये लागली. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील दोन रुग्ण इंडोनेशिया वरून आलेत व त्यांना नागपुरात क्वारनटाईन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या व भारत सरकारच्या शासकीय साईटवर चंद्रपुरात दोन रुग्ण असल्याची नोंद दाखवत होती. हा ही विषय उत्साही माध्यमांनी शहानिशा न करता दाखविला-प्रकाशित केला व चंद्रपूरकरांचे हृदय धडधडू लागले. पोर्टल व चॅनेलवर दाखविण्यात आलेल्या या वृत्तामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. त्वरित पालकमंत्र्यांना या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सत्य परिस्थिती ची माहिती द्यावी लागली, एवढा विषय चंद्रपूरकरांच्या जिव्हारी लागला होता. त्यावेळी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांनी कोणतेही वृत्त दबना आधारित किंवा शहानिशा केल्याशिवाय प्रकाशित करू नये अशी ताकीद दिली होती. संवेदनशील असणारा हा विषय आहे, माध्यमात प्रसारित होणारे वृत्त सामान्यांच्या हृदयाचे ठोके वाढवणारे असतील याचा काही माध्यमांना "व्हिवर्स" व "टिआरपी" वाढविण्याच्या नादात विसर पडला होता. जिल्हा प्रशासन "संवेदनशीलतेचे भान" ठेवून कोरोना संबंधित शासकीय अधिकृत वृत्त प्रकाशित करावे असे वारंवार माध्यमांना सांगत होता. संवेदनशील जनता मात्र शहानिशा न केलेल्या वृत्तामुळे या काळात फार वेळा विचलित झाली, त्याचे काहीही सोयरसुतक काही माध्यमांना नव्हते. त्यानंतर 2 मे रोजी मात्र कहरच झाला. चंद्रपुरात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. या रूग्णाचा "पॉझिटिव्ह रिपोर्ट" हा सोशल माध्यमांवर विविध व्हाॅटस अॅप ग्रुपवर फिरू लागला. गोपिनाय असलेला हा अहवाल "बाहेर" आला कसा हा जेवढा हा संशोधनाचा विषय आहे, तेवढाच तो माध्यमांवर असंवेदनशील पणे फिरविला गेला. त्यामुळे रुग्णाचे नांव, रुग्ण राहात असलेले स्थान, रुग्णाचे नातेवाईक या साऱ्यांना विनाकारण तणावात राहावे लागले, त्यासाठी जबाबदार कोण? याचा ही प्रसार माध्यमे या नात्याने विचार होणे गरजेचे आहे. ज्या परिसरात हा रुग्ण वास्तव्यास आहे, त्या परिसरातील लोकांवर ही याचा विपरीत परीणाम दिसत आहे, हा ही माध्यमांनी विचार करण्याचा विषय होता परंतु तसे झाले नाही. विविध अफवांनी या काळात जोर धरला. कोणतेही वृत्त प्रकाशित होतांना त्याची शहानिशा करूनच प्रकाशित व्हायला. एखाद्या वृत्तामुळे विनाकारण कोणी दुखावला जाऊ नये, विनाकारण कुठले आरोप होऊ नये? याची दक्षता बाळगणे हे सुद्धा जबाबदार प्रसिद्धी माध्यमांचे कर्तव्य आहे. आरोप करतांना त्याचा "सोर्स" काय याचा ही विचार व्हायला हवा. चंद्रपूरमधील कोरोना शी संबंधित काही वृत्त एका प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले होते, ते वृत्त कोणत्या आधार प्रकाशित झाले त्याची या निमित्ताने शहानिशा व्हायला हवी. प्रकाशित झालेले किंवा हाती आलेले प्रत्येक वृत्त सत्यच असते असे नाही, त्या वृत्ताची शहानिशा करूनच त्यानंतर वाचकांसमोर जायला हवे, ही जबाबदारी लोकशाही चा चौथा आधारस्तंभाशी "प्रामाणिक"पणे निगडीत असलेल्या सर्वांनीच पाळायला हवी.

Post a Comment

0 Comments