- सामाजिक पुरूषार्थ वाढवणारा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना लढा
- सफाई कामगार, चालक, सहायक, सर्वानीच केली जोखमीची कामे
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितावर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या कोरोना योध्दांचे कौतुक जिल्ह्यातील सामान्य नागरिकांपासून सर्वाना आहे. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक बाधीताला मानसिक समाधानापासून तर वैद्यकीय उपचार करून 10 दिवसात तंदुरुस्त करून घरी पाठवण्याचे दायित्व या संपूर्ण चमूने अत्यंत जोखमीने पूर्ण केले आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय, हस्तांतरीत करण्यात आलेले रूग्णालय, वन अकादमी व अलगीकरण,विलगीकरण कक्षातील सगळ्या जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या सफाई कामगार पासून तर वैद्यकीय तज्ज्ञ सर्वांचा समावेश आहे. खरे तर या आजाराच्या काळात शासकीय यंत्रणेचे संवेदनशील मानवी स्वरूप ठळकपणे पुढे आले आहे. या कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र लढत आहेत. या काळात खऱ्या अर्थाने कोविड योद्धा म्हणून डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी पासून तर चतुर्थश्रेणी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, चालक, सहायक आणि अनेक अनुलेखीत कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात असतानाही समाजाची सेवा केली आहे. या सर्वांप्रती, त्यांच्या कुटुंबाप्रती सर्व समाज कृतज्ञ आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, यांच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिक्षक डॉ.भास्कर सोनारकर, मुख्य फिजीशीयन आणि आईसोलेशन वार्ड तज्ञ डॉ.सचिन धगडी, कान नाक घसा तज्ञ डॉ.आशिष पोडे, मुख्य परीसेविका तुलसी कुमरे या सर्वांची रॅपीड टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय टीम, डॉक्टर्स,परीचारिका,वार्ड बॉय वैद्यकीय कर्मचारी पासून तर रुग्णालयांमधील सफाई कामगार कोरोनाच्या काळात डोळ्यात अंजन घालून रुग्णांच्या सेवेत अविरत कार्य करीत आहेत.
या काळात वैद्यकीय अधिक्षक डॉ.भास्कर सोनारकर रुग्णालयातील सर्व आरोग्य सुविधेपासून तर रूग्णांना कोणत्याही प्रकारची समस्या येवू नये व रूग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी 24 तास कार्यरत असून रूग्णालयाची सर्व जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
डॉ.आशिष पोडे यांच्यासोबत डॉ.सचिन भिलवणे, डॉ.कुणाल कापर्तिवार व त्यांची चमू जिल्ह्यात येणारे संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्याचे काम करत आहेत.यांची प्रमुख भूमिका संशयित रुग्णांचे नाक, घशाचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी नागपूरला पाठविणे. त्याचप्रमाणे, डॉ.बंडू रामटेके व त्यांची चमूसुध्दा क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे नाक, घशाचे स्वॅब नमुने घेण्याचे काम करते.
संशयित रुग्ण यांची आरोग्य तपासणी करणे, जिल्ह्यातून बाहेर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी छातीरोग तज्ञ डॉ.सौरभ राजूरकर व त्यांची चमू करीत आहेत.नमुने वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी पाठविले जातात. नमुने वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी राहुल रामटेके व विशाल डोर्लीकर या वाहनचालकांची आहे. सकाळी 6 व संध्याकाळी 6 या दोन वेळी नमुना तपासण्यासाठी पाठवल्या जाते.
परराज्य, जिल्ह्यातून जिल्ह्यात येणारे नागरिकांनाची नोंदणी करणे तसेच प्राथमिक तपासणी करून लक्षणे आहेत किंवा नाही यावर संस्थात्मक किंवा गृह अलगीकरणात ठेवणे व त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे. तसेच संस्थात्मक अलगीकरणातील नागरिकांची दिवसातून दोन वेळा वैद्यकीय तपासणी केल्या जाते.या सर्वांची जबाबदारी अलगीकरण अधिकारी डॉ.राहूल भोंगळे यांची चमू अहोरात्र काम करीत आहे.
सुक्ष्म जीवशास्त्रज्ञ डॉ.भाऊसाहेब मुंडे यांच्याकडे स्वॅब नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर तो जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी आहे.कोविड केअर सेंटरचे नोडल ऑफिसर म्हणून डॉ. अविष्कार खंडाळे यांच्यासोबत बालरोग तज्ञ डॉ. भालचंद्र फालके यांच्याकडे बालरोग कक्षाची तर कोविड मार्गदर्शन केंद्राची जबाबदारी भास्कर झलके यांच्याकडे आहे.
रुग्णालयातील परिचारिकांची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिसेविका मायाताई आत्राम तर,कोविड वार्ड मधील परिचारिकांची जबाबदारी मुख्य परीसेविका तुलसी कुमरे यांचेवर आहे.कोविड बाधित महिला बाधितांना उपचार व आवश्यक त्या सोयी सुविधा मिळाव्या यासाठी स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र तज्ञ दीप्ती श्रीरामे व त्यांची चमू काम बघत आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना तसेच रुग्णांना कोविड-19 बद्दल उपचाराविषयी मार्गदर्शन, समुपदेशन अॅम्बुलेंस सेवा,पाठपुरावा यासंदर्भातील सेवा, दूरध्वनीद्वारे तात्काळ पोहोचविता यावी यासाठी कंट्रोल रूमची सोय केली आहे. याची जबाबदारी सहाय्यक सनियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिक बारापात्रे त्यांच्यावर आहे. आतापर्यंत जवळपास 1 हजार 422 नागरिकांनी मार्गदर्शन सेवांचा लाभ घेतला आहे.
समाजसेवा अधीक्षक भास्कर झलके व त्यांची चमू यांच्यामार्फत जिल्ह्यातील अलगीकरणात असणारे नागरिकांचे समुपदेशन करतात. आतापर्यंत जवळपास 13 हजार 252 नागरिकांना समुपदेशन केले आहे. अतिदक्षता विभागाची जबाबदारी मंजिरी शिरपुरे व त्यांच्या चमूकडे आहे. यांच्या माध्यमातून रुग्णांना 24 तास लागणारी सेवा पुरविल्या जात आहे.
कोविड आयसीयूमध्ये रुग्णांना व्हेंटिलेशनची जबाबदारी बधिरिकरण तज्ञ डॉ.अमोल ठाकरे,डॉ.राजेश नागमोती व त्यांची चमू यांच्यावर आहे.जिल्ह्यातील रुग्णांना तात्काळ रुग्णसेवा मिळावी यासाठी 108 अॅम्बुलेंस जारी केलेली आहे. रुग्णांना त्यांच्या घरापर्यंत सेवा मिळावी याची जबाबदारी विभागीय समन्वयक डॉ. प्रशांत घाटे, जिल्हा समन्वयक डॉ. चेतन कोरडे व ॲम्बुलन्सचे वाहन चालक हे जोखीम पत्करत काम करीत असतात.रूग्णालयात स्वच्छता राहावी व कोणत्याही रुग्णाला स्वच्छतेमुळे त्रास होणार नाही याची जबाबदारी स्वच्छता पर्यवेक्षक संजू पिले यांच्यावर आहे.
चंद्रपूरमध्ये तीन उपजिल्हा रुग्णालय, दहा ग्रामीण रुग्णालय येथे कोविड केअर सेंटर कार्यान्वित आहे. या वैद्यकीय अधीक्षक यांच्या नेतृत्वात टीम कार्यरत आहे. यामध्ये मुल येथे डॉ. इंदुरकर, ब्रह्मपुरी येथे डॉ.पटले, चिमूर येथे डॉ.गेडाम, वरोरा येथे डॉ. उत्तम पाटील, सावली येथे डॉ. धुर्वे, बल्लारपूर येथे डॉ गजानन मेश्राम, राजुरा येथे डॉ.बाम्बोळे, भद्रावती येथे डॉ. किन्नाके सिंदेवाही येथे डॉ.झाडे, गडचांदूर येथे डॉ.नामपल्ली,गोंडपिंपरी येथे डॉ.पेंदाम,नागभिड येथे डॉ.खंडारे हे स्वॅब घेण्याचे कार्य करत आहे.त्यांच्या मदतीला प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यरत आहे.
कोरपणा डॉ.गायकवाड, गडचांदूर डॉ. गेडाम, राजुरा डॉ.कुळमेथे, बल्लारपूर डॉ. वावरकर, मुल डॉ.बाबर, सावली डॉ. मडावी, ब्रह्मपुरी डॉ.खिल्लारे, चिमूर डॉ.भगत, वरोरा डॉ.दुधे, भद्रावती डॉ.किन्नाके या सर्व वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयसोलेशन सेंटर कार्यान्वित आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके हे या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून आहे तसेच वरिष्ठ औषधी निर्माता विवेक माणिक यांच्या मार्फत औषधी व कोविडचे साहित्य पुरवण्यात येत आहे.
या योद्धयांचे वैशीष्ट्य म्हणजे आपल्या सारख्या सामान्य कुटुंबातून शासकीय यंत्रणेत दाखल झालेले हे नागरिक आहे. यांच्या मागे ही त्यांचा परिवार व व्यवहार आहे. मात्र अशावेळी मानवातील सर्वोच्च सकारात्मक गुणांचे दर्शन दाखवित यांनी दायित्व पूर्ण केले आहे. समाजातील एका प्रतिष्ठीत व्यवसायाचा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा या काळातील दायित्व, समाजाचे सामाजिक पुरूषार्थ वाढवणारे आहे.
0 टिप्पण्या