- जिल्ह्यात पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा व पालकमंत्री आशा किरण योजनेचा शुभारंभ !
- कोरोना काळातील जोखमीच्या कामासाठी जाहीर सत्कार !
चंद्रपूर,दि.3 ऑगस्ट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जोखीम पत्करून गावागावातील आपल्या भावा बहिणींचे रक्षण करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील 2 हजारावर आशा ताईंना राखीच्या पर्वावर पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा कार्यक्रमांतर्गत रोख पुरस्कार व सुरक्षा किट देवून राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याचबरोबर पालकमंत्री आशा किरण योजनेची घोषणा त्यांनी यावेळी केली. आशाताईंना व्यक्तिगत सेवा लाभ देण्याचा राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग आहे.
कोरोनाच्या काळामध्ये विविध आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत जिल्ह्यातील सर्व आशा स्वयंसेविका सातत्याने कार्यरत आहे. रक्षाबंधनाच्या पर्वावर आशा स्वयंसेवीकांचा सन्मान करण्याची घोषणा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केली होती.आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एका भावपूर्ण कार्यक्रमात आशा ताईंनी पालकमंत्र्यांना राखी बांधल्यानंतर या कार्यक्रमाची जिल्ह्यात सुरूवात करण्यात आली. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडून बहिणीला दिलेली ही छोटीशी मदत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले. आजच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा कार्यक्रम, पालकमंत्री आशा किरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला तर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, आ.किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर, उपाध्यक्ष तथा सभापती रेखाताई कारेकार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, अधिष्ठाता डॉ.राजेंद्र सुरपाम, जिल्हा परीषद सदस्य रमाकांत लोंढे तसेच आशा स्वयंसेविका, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमात खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर यांनी संबोधित करताना कोरोनाच्या काळामध्ये जोखीम पत्करून काम करणारे आशाताईंनी एक आदर्श निर्माण केलेला आहे. महाराष्ट्राच्या स्त्री परंपरेला साजेशी कामगीरी आशाताई दिवस-रात्र करीत आहेत.
जिल्हा प्रशासनातील सर्व चमू कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काम करीत आहे. गावागावात जाऊन जोखमीच्या ठिकाणी आशा स्वयंसेविका काम करीत आहेत,असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी यावेळी व्यक्त केले.
कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी धान रोवणी करताना पॅडी ट्रान्स प्लांटर व धान काढण्याकरिता पॅडी रिपरच्या उपयोगिते विषयक सादरीकरण केले.
अशा आहेत योजना :
आज ज्या दोन योजना सुरू झाल्यात व एका योजनेला बळकटी देण्याचे आवाहन केले ते पुढिल प्रमाणे.
पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा कार्यक्रम:
आशा प्रत्येक गावात व शहरात दररोज घरोघरी भेटी देऊन त्यांची स्थिती जाणून घेणे व दैनंदिन कार्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे असे काम नियमितपणे करीत आहे. यासोबतच आशा स्वयंसेविका यांना नेमून दिलेली कोविड व्यतिरिक्त इतरही कामे सुद्धा त्या करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार निश्चितपणे पडत आहे. नियमित कामासाठी आशा स्वयंसेविका यांना जो मोबदला दिला जातो. त्या व्यतिरिक्त प्रतिमहा रुपये 1 हजार मोबदला त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनान्वये कोविड-19 करिता अदा करण्यात येत आहे. परंतु कोविड-19 च्या अनुषंगाने देण्यात आलेली जबाबदारी व काम बघता सदर अदा करण्यात येत असलेला मोबदला अत्यल्प आहे. याकरिता पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी रक्षाबंधनानिमित्त आशा स्वयंसेविका यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून रोख रुपये 1 हजार 100 व रुपये 400 पर्यंत सुरक्षा किट असे एकूण रुपये 1 हजार 500 देण्यात आले. ही योजना पालकमंत्री आशा रक्षा कवच योजना या नावाने राबविण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे.
पालकमंत्री आशा किरण योजना:
मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्याकरिता बरेच निर्देशांक असून सदर निर्देशांकांपैकी जननी सुरक्षा योजना एक महत्त्वपूर्ण निर्देशांक आहे. ज्यामध्ये जी गर्भवती माता एससी,एसटी व बीपीएल गटात वर्गवारीत येते. त्या गर्भवती मातेला आशाने प्रसूतिपूर्व सेवा दिल्यास त्यांना रुपये 300 प्रसुती पश्चात सेवा दिल्यास व संस्थेत प्रसुती करता प्रवृत्त केल्यास रुपये 300 असे एकूण रुपये 600 मोबदला अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अदा करण्यात येतो.
सदरची योजना प्रत्येक आशा त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवित असून त्याव्यतिरिक्त इतर उन्नत गटात येणाऱ्या गर्भवती मातांना सुद्धा मोबदला मिळत नसला तरी त्या आपल्या स्तरावर प्रामाणिकपणे मातांना सेवा देत आहे. अशा उन्नत गटातील गर्भवती मातांना आशाने सेवा दिल्यास सदर कामाचा मोबदला त्यांना देण्यात येत नाही. त्यामुळे सदर मातेला सेवेपासून व आशा स्वयंसेविका यांना लाभापासून वंचित न ठेवता रक्षाबंधन या दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आशांना जननी सुरक्षा योजनेच्या निकषांना अधीन राहून उन्नत गटात येणाऱ्या गर्भवती मातांना प्रसुतीपूर्व व प्रसूतीनंतर सेवा दिल्यास एकत्रित लाभ म्हणून प्रति माता रुपये 200 देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री खनिज विकास निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठान मधून सदरची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा रक्षाबंधनाच्या शुभ दिनी करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना:
गर्भवती महिलांना व त्यांच्या प्रसूतीनंतर त्यांना पोषण आहार मिळावा व मातामृत्यू, बालमृत्यू दरात घट व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने 1 जानेवारी 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात योजनेची प्रभावीपणे यशस्वीरित्या अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत एकूण 40 हजार 769 इतक्या लाभार्थ्यांची नोंद केलेली आहे. तसेच एकूण 39 हजार 811 लाभार्थ्यांना 17 कोटी 41 लाख 41 हजार रुपये इतक्या अनुदानाचे वाटप करण्यात आलेले आहेत. राज्यस्तरावर प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. सदर योजनेच्या प्रसिध्दी साहित्याचे देखील यावेळी विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा अधिसेविका सुरेखा सुत्राळे तर आभार प्रदर्शन जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संदीप गेडाम यांनी केले.
0 टिप्पण्या