दुसरी लाट अनुषंगाने कोरोना नियंत्रण पुर्वतयारी करा !



  • जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे यंत्रणेला निर्देश !
  • चाचण्यांचे प्रमाण, गृहभेटी द्वारे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे !
  • जास्त जनसंपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या तपासण्या कराव्या!
  • गरजेपेक्षा ५० टक्के औषधे नेहमी जास्त उपलब्ध ठेवावी !

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सद्यस्थितीत कमी होत असली तरी जागतिक स्तरावर अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली दिसून येत आहे. या अनुषंगाने पुढील दोन-तीन महिन्यात भारतात देखील अशी लाट येण्याबाबत विविध माध्यमातून तर्क लावण्यात येत आहेत. मात्र याबाबत सध्या काही पुर्वानुमान लावता येत नसले तरी खबरदारी म्हणून जिल्ह्यात कोरोना नियंत्रणाची पुर्वतयारी करून ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यंत्रणेला दिले असून या पार्श्वभूमीवर पुढील सूचना निर्गमित केल्या आहेत..
प्रत्येक तालुका आणि महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात कोरोना उद्रेकाच्या सध्याच्या उतरणीच्या काळातही प्रयोगशाळा सर्वेक्षण सक्षमपणे सुरू ठेवावे. सर्वेक्षणामध्ये कोणताही हलगर्जीपणा न करता आय.सी.एम.आर संस्थेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार संशयीत रुग्णांच्या प्रयोगशाळा चाचण्या करण्यात याव्या. याकरिता प्रत्येक तालुका आणि मनपा क्षेत्रात प्रयोगशाळा चाचणी केंद्र कार्यान्वित करावे.
दुसऱ्या लाटेसंदर्भातील सतर्कतेचा इशारा वेळेवर मिळावा यासाठी फ्ल्यु सदृश्य रुग्णांचे सर्वेक्षण नियमितपणे करण्याची आवश्यकता आहे. अधिक प्रमाणत फ्ल्यु सारखे आजार असणारे रुग्ण आढळणाऱ्या भागात प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवावे. तसेच गृहभेटीद्वारे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक वेगाने व युध्दपातळीवर करण्यात यावे .
आपल्या व्यवसायाच्या निमित्याने ज्या व्यक्तींचा जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क अधिक असतो, अशा व्यक्तींच्या माध्यमातून कोविड आजाराचा प्रसार अधिक वेगाने होतो, हे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे. दुसरी लाट येण्यामध्येही अशा सुपर स्प्रेडर व्यक्ती महत्वाची भूमिका बजावू शकतात, हे लक्षात घेऊन अशा व्यक्तींचे सर्वेक्षण आणि प्रयोगशाळा तपासणी प्राधान्याने करण्याची आवश्यकता आहे. या व्यक्ती पुढील प्रमाणे असू शकतात. छोटे व्यावसायीक गटामधील- किराणा दुकानदार, भाजीवाले तसेच पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे इतर विक्रेते, हॉटेल मालक आणि वेटर्स. घरगुती सेवा पुरविणारे - वर्तमानपत्रे, दुध घरपोच करणारी मुले, घरगुती काम करणाऱ्या मोलकरणी आणि इतर नोकर, गॅस सिलेंडर वाटप करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिक विषयक कामे, नळजोडणी दुरुस्ती अशी घरगुती कामे करणाऱ्या व्यक्ती, लॉन्ड्री, इस्त्रिवाले, पुरोहित. वाहतुक व्यवसायातील लोक - मालवाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पो चालक, रिक्षाचालक इत्यादी. वेगवेगळी कामे करणारे मजूर - हमाली, रंगकाम, बांधकाम करणारे मजूर. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर कंडक्टर आणि इतर कर्मचारी. हाऊसिंग सोसायटी मध्ये काम करणारे सेक्युरिटी गार्ड, सुरक्षारक्षक, आवश्यक सेवा पुरविणारे शासकिय निमशासकीय कर्मचारी तसेच पोलीस, होमगार्ड इत्यादी. अशा विविध गटांमधिल व्यक्तींचे समूह स्वरूपात सर्वेक्षण तसेच प्रयोगशाळा तपासणी केल्यामुळे कोविड आजाराच्या प्रसाराचा वेग रोखण्यामध्ये यश मिळू शकते. याकरिता नियोजनबध्दरीत्या हे विविध समूह तपासण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन प्रयोगशाळा तपासणीमध्ये किमान 50 टक्के नमुने हे या गटातील व्यक्तींचे असावेत, या दृष्टीने नियोजन करावे .
जनतेला सर्व प्रकारच्या रुग्णसेवा सुरळीतरित्या मिळण्याकरता तालुका रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये यासारख्या रुग्णालयांमध्ये कोविड तसेच नॉन कोविड अशा दोन्ही रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करुन त्याचा व्यवस्थित समतोल साधावा. प्रत्येक तालुक्यासाठी विशिष्ट कोविड निगा केंद्र, कोविड आरोग्य केंद्र आणि कोविड रुग्णालय निश्चित करावेत आणि रुग्णांना संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिकांचे नियोजन करावे. गरजेनुसार तातडीच्या वेळी कोचिडसाठी अधिकच्या खाटा तात्काळ उपलब्ध करण्यासंदर्भात कृती योजना तयार असावी.
कोविडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी प्रयोगशाळा नमुन्यांमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे शेकडा प्रमाण नुसार सतर्कतेचे इशारे लक्षात घेऊन त्यानुसार रुग्णोपचार सुविधा कार्यान्वित करणे आवश्यक आहे . रुग्ण संख्येनुसार तालुका आणि मनपा स्तरावर समर्पित कोविड रुग्णालये कार्यरत ठेवावीत. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे रुग्णालय आणि प्रत्येक शहरी प्रभाग / तालुका विभागातील एक रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित करावे. आवश्यकतेनुसार आणखी कोविड रुग्णालये कार्यान्वित करावीत. मल्टिस्पेशलिटी व्यवस्थापनाची सोय असणारी सर्व रुग्णालये कोविड रुग्णांसाठी कार्यान्वित करावीत.
प्रत्येक तालुक्याने आणि महानगपालीकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविडचा प्रादुर्भाव ज्या कालावधीमध्ये सर्वाधिक होता, त्यावेळी लागणारी औषधे आणि साधनसामुग्रीची गरज लक्षात घेऊन त्याच्या किमान 50 टक्के औषधे नेहमी उपलब्ध असतील, याची दक्षता प्रत्येक रुग्णालय स्तरावर तसेच तालुका आणि महानगरपालिका स्तरावर घेणे आवश्यक आहे. तसेच पुढील पंधरा दिवसांचा औषध व साधनसामुग्री स्टॉक हा बफर स्टॉक म्हणून उपलब्ध ठेवण्याची ही खबरदारी घेण्यात यावी. दैनंदिन ऑक्सिजनचे शिस्तशीर संनियंत्रण करावे व कोणत्याही कारणाने ऑक्सिजन पुरवठा अपुरा पडणार नाही, याची खातरजमा करावी.
ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे आणि ज्यांना अतिजोखमीचे आजार (Comorbidities) आहेत अशा व्यक्तींनी अनलॉक नंतरही आपला जनसंपर्क मर्यादित ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी, या मोहिमेअंतर्गत प्रत्येक तालुक्याने आणि महानगरपालिकेने अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण केलेल आहे. या व्यक्तींची यादी उपकेंद्र आणि वॉर्ड स्तरावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना देऊन त्याची साप्ताहिक तपासणी करण्यात यावी.
कोविड प्रतिबंध आणि नियंत्रणासंदर्भात क्षेत्रिय पातळीवर उपकेंद्र, वॉर्ड निहाय पथके कार्यरत असणे आवश्यक आहे. ही पथकांकडून घरगुती विलगीकरणात असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन व दैनंदिन मॉनिटरींग करणे अपेक्षित आहे.
सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी यातील प्रत्येकाचे सखोल कॉन्टॅक्ट ट्रेसिक होणे आवश्यक आहे . मार्गदर्शक सूचनांनुसार निकटसहवासितांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात यावी .
गर्दीच्या ठिकाणी किंवा समूहात आसताना मास्कचा अनिर्वाय वापर, हातांची स्वच्छता, नेहमी स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची नियमित स्वच्छता, दोन व्यक्तिमध्ये शारिरिक अंतर राखणे, भारतीय पध्दतीने अभिवादन करणे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान आणि थुंकणे टाळणे तसेच अनावश्यक प्रवास टाळावा.
समाजामध्यमांचा जबाबदारीने वापर करावा, अफवा, चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नयेत. अधिकृत स्त्रोतांकडुन माहिती घ्यावी. मानसिक ताण-तणाव टाळण्याकरीता मित्र, नातेवाईकांशी बोला, आवश्यक तेव्हा तज्ञांचा सल्ला घ्याव्या.
कोविडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात वरिल प्रमाणे तयारी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी संबंधीत यंत्रणेला दिले आहेत.

Post a Comment

0 Comments