माझ्या झाडीची आंबिल
लई परसिद्ध होती
वाटी दुधाची म्हणून
लेकरे गिरत होती
भाषा हे असं माध्यम आहे की ते माणसाला माणसाशी जोडून ठेवते . जगामध्ये हजारो भाषा बोलल्या जातात . प्रत्येक देशाची , राज्याची , जिल्ह्याची भाषा वेगवेगळी असते . तशी चंद्रपूर , गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांत झाडीबोली बोलल्या जाते . विशेषत: या चार जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात ही झाडी बोली बोलल्या जाते . बोलीभाषा देखील अनेक आहेत . या बोलीभाषांनी प्रमाण भाषा समृद्ध होत असते असे मला वाटते . या पार्श्वभूमीवर आमचे मित्र श्री. सुनील पोटे यांनी लिहीलेला कवितासंग्रह ' आंबील ' इतक्यात पुन्हा एकदा वाचून काढला . खरे म्हणजे दि. 11/9/2021 रोजी राजुरा येथे प्रतिभावंतांच्या कवी संमेलनामध्ये गेलो असता सुनील पोटे यांची भेट झाली . त्यांनीच तेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचा ' आंबील ' हा कवितासंग्रह मला दिला . त्यावरील मुखपृष्ठ पाहून यामधील कविता ग्रामीण जीवनावर लिहिल्या गेल्याचे समजून आले . त्यांनी कवितासंग्रह दिल्यावर पंधरा वीस दिवसांनी मी तो वाचून काढला . काही काही कविता मला चांगल्याच भावल्या . तेव्हाच ठरवले होते की या कवितासंग्रहावर आपण आपल्या पध्दतीने काहीतरी लिहिले पाहिजे . मग आठ दिवसांपूर्वी पुन्हा एकदा हा कवितासंग्रह वाचून काढला. कवी सुनील पोटे आपल्या मनोगतामध्ये लिहितात ,
" माझ्या काव्यसंग्रहाचे नाव ' आंबील ' आहे . झाडीपट्टीत आंबील हा पदार्थ जेवणाचा अविभाज्य भाग होता. आता आंबील दुर्मीळ झाली आहे . आंबील शीर्षक असलेली कविता मी पहिल्यांदा झाडी बोलीतून लिहिली तेव्हा मनात आले की झाडीतील असे बरेच शब्द , चांगल्या प्रथा , चालीरीती लोप पावत आहेत . त्यांना जिवंत ठेवण्याचे काम कवितेच्या माध्यमातून करण्याचा संकल्प केला त्याच कविता या संग्रहात आहेत ."
तसे पाहिल्यास ग्रामीण भागात माणसे शहराच्या तुलनेत अजूनही जास्त प्रेमळ आहेत. कारण बहुसंख्य शेतकरी म्हणजेच अन्न पिकवणारे अजूनही ग्रामीण भागातच राहतात . ते दाते आहेत . म्हणून त्यांच्यातील मायेचा ओलावा आजही टिकून आहे . याच मायेच्या ओलाव्याने श्री. सुनील पोटे यांनी झाडीपट्टीतल्या ग्रामीण जीवनाचे वर्णन करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत . कारण या कवितांमधील आयुष्य त्यांच्या आईवडिलांनी प्रत्यक्ष जगलेलं आहे आणि त्यांनीदेखील त्यांचे नाते झाडीच्या मातीशी अजुनही जोडून ठेवले आहे . या कवितासंग्रहामध्ये असे अनेक शब्द आहेत की जे ग्रामीण भागात किंवा झाडीपट्टीत वापरल्या जातात . जसे की ढोबर , चूल , फनकट , मोरी (मोळी) , दरन, रेंगी ,शेन , काजर , पाटावरुला , दंडार इत्यादी शब्दांवर त्यांनी कविता लिहून झाडीपट्टीत राहणारे लोक कसे प्रेमाने राहतात ते दर्शविले आहे .याचबरोबर या कवितांमध्ये त्यांनी आपले गाव खेड्यात गेलेलं बालपण , प्रेम , रिवाज , भावाभावांतील हिस्से वाटण्या , झाडीचा महिमा , पोट , माहेर , स्त्रियांचे दु: ख , जुन्या प्रथा , संयुक्त कुटुंब ,आठवणी , बुवाबाजी इत्यादी विषय हाताळून त्यावर कविता केल्या आहेत .
आंबील या पेयाला झाडीपट्टीतील विशेषत: ग्रामीण भागातील पुष्टीदायक अन्नपदार्थ म्हणून म्हटल्या जाते . या आंबीलचे वर्णन करताना आंबील ग्रामीण भागात कसे महत्त्वाचे पेय होते पण आता कोल्ड्रिंक्सच्या धंद्यामुळे आंबील कशी दुर्लक्षित झाली याची खंत ते व्यक्त करतांना ते लिहितात ,
" माझ्या झाडीची आंबिल
लई परसिद्ध होती
वाटी दुधाची म्हणून
लेकरे गिरत होती
तपनानं जीव पिसा
कालव कालव करे
व्हती आंबील औषधी
बेस लागे म्हणे सारे
मात तूत गेलं आत
माले तुले वर आले
केली आंबील कडले
धंदे कोल्ड्रिंक्सचे चाले "
' ढोबर ' या कवितेत ते म्हणतात जुन्या जान्या मडक्याची
तोंडी फोडून तयार
कडधान्ये तेथी भाजे
त्याले म्हणाचे ढोबर "
तर हे ढोबर आजी वर्षांनुवर्षे सांभाळून ठेवायची आणि लहर आली की काड्या चुलीत घालून कशी भाजायची हे सांगताना ते पुढे लिहितात ,
" आजी ढोबर ठेवाची
साल साल सांभाळून
हुक्की आली का भाजाची
काड्या चुलीत घालून ॥
तुटफूट सामानाले
आजी कामात आणाची
फाटलेल्या संसाराले
आजी रोजीस शिवाची ॥ "
स्त्री , मग ती ग्रामीण भागातली असो ,शहरी असो , शिकलेली असो की निरक्षर असो , तिच्या नशिबी नेहमी
दु : खच असते असा आशय असणाऱ्या काही कविता या संग्रहात आहेत . ' चूल ' या कवितेत ते म्हणतात ,
" चुलीवरी रांदण्याचे
तंत्र तुले अवगत
वल्हे लाकूड जारणे
नाय कोणाले जमत ॥
हाता आले किती फोड
कई जरले लुगडे
कष्टाळल्या पुस्तकाचे
सांग किती वाचू धडे ॥
बाय मातीच्या चुलीत
रोज जारुन सोताले
अन्न सिजवून देते
खाया गरम पोटाले ॥ "
आणि तिचं हे दु: ख ती निमूटपणे सहन करीत राहते . म्हणून
' हिरीचं पानी ' या कवितेत ते लिहितात ,
" धन्य तू गं माझे बाय
दु :ख हिरीत सोडते
सुख बालटी भरून
रोज घरात आणते ॥"
पण कवी आशावादी आहे . स्त्रीने आता दुबळे न राहता निर्भय बनावे असे त्यांना वाटते . चूल आणि मूल या मर्यादित संकल्पनेतून स्त्रीने बाहेर येणे कसे
गरजेचे आहे हे सांगताना कवी
' चूल मूल झाले जुने ' या कवितेमध्ये म्हणतात ,
" तू मर्दानी झाशीवाली
हो जिजाऊ शिवबाची
राहू नको तू दुबळी
धार हो तलवारीची ॥
ज्योतिबाच्या सावित्रीने
वाट दावली शाळेची
उंची गाठण्या नभाची
कास धर तू ज्ञानाची ॥
नव्या जमान्यात लेकी
चूलमूल झाले जुने
लढेल तोच टिकेल
नाहीतर माती होणे ॥"
कवी जरी आता शहरात राहातात तरी ते आपली मुळं विसरले नाहीत . आणि कुणीही आपली मूळं विसरू नये जरी तो कितीही मोठा झाला तरीही. आपल्या गावाच्या आठवणीत कवी कधी कधी रंगून जातात आणि आपलाच गाव बरा हे सांगताना ते लिहितात ,
" उभे घरं कौलारू
दारी सुवासिक सडा
मायबाप मज भासे
विठू रुक्माईचा जोडा ॥
शेतीवर सारा भार
दिनरात राबे हात
असो सावत्र चुलत
मिळे एकमेका साथ ॥
शेवटी आपल्या गावाची आठवण येते तेव्हा कवीच्या डोळ्यात अश्रू येतातच . ते म्हणतात ,
" आज राहून शहरी
मन गुंतले गावात
घासापुटं आठवण
बळी दिसतो घामात ॥ "
अशाच आशयाची ' गेलं खेडी बालपण ' ही कवितादेखील बालपणीच्या आठवणी जाग्या करणारी आहे व ती अत्यंत वाचनीय आहे . याशिवाय आणखी बऱ्याच कविता या कवितासंग्रहात आहेत त्या सर्वच वाचनीय आहेत. एकूणच कवी सुनील पोटे यांनी झाडीबोलीच्या कविता लिहून झाडीपट्टीतल्या माणसांच्या
दु:खांना वाचा तर फोडलीच आहे , पण झाडीपट्टीतली माणसे किती साधी , निष्कपट व प्रेमळ आहेत हेदेखील आपल्या अनेक कवितांमधून सांगितले आहे .
भाषा मग ती प्रमाणभाषा असो की बोलीभाषा ती टिकलीच पाहिजे . कारण भाषेची पण एक संस्कृती असते . भाषा लोप पावली तर संस्कृतीदेखील लोप पावते . म्हणून या कवितासंग्रहाला शुभेच्छा देताना सेवानिवृत्त शिक्षक श्री .मुरलीधर वाकुडकर सरांनी थोडक्यात पण फार मार्मिक लिहिले आहे . ते म्हणतात , " पौराणिक , ऐतिहासिक स्थळ , बोलीभाषा नाहीशी होऊ नयेत .नवीन पिढीला प्राचीन भाषा , गोष्टी , चांगल्या प्रथा स्मरणात राहाव्यात म्हणून कवितेच्या रूपाने त्या जिवंत ठेवण्याचे मोठे काम या काव्यसंग्रहात केलेले आहे ."
प्राचीन काळात बहुसंख्य लोक निरक्षर असण्याचं कारण हेच होतं की ज्ञान किंवा शिक्षण ही मूठभर उच्चवर्णीयांचीच मक्तेदारी होती . कितीतरी समाजसुधारकांनी
बहुजन समाज जागृत झाला पाहिजे , शिकला पाहिजे म्हणून आपला देह झिजविला . त्यामुळे बहुजन समाज शिकू लागला , बोलू लागला आणि लिहू लागला . साहित्यनिर्मिती द्वारे आपल्या
दु: खांना जगासमोर आणू लागला . हे काम अनेक भाषांनी , अनेक बोलीभाषांनी केलेलं आहे . झाडीपट्टीतील बोलीभाषा पुरातन असल्यामुळे सध्याच्या विज्ञानयुगात लोप पावू नये यासाठी सुनील पोटे यांच्यासारख्या अनेक साहित्यिकांनी कथा , कविता , कादंबऱ्या लिहून झाडीबोली लोप पावणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि मला खात्री आहे की ही झाडीबोली लोप पावणार नाही . कारण याच संग्रहात शेवटी ' झाडीबोली ' या कवितेत झाडीबोलीची श्रीमंती वर्णन करताना एक आशावाद कवी सुनील पोटे व्यक्त करतात ,
" झाडीपट्टीच्या बोलीले
यक अनोखी झालर
नसे सुटी नी चिल्लर
झाडीबोली कलदार ॥
कोणी म्हणो गावंढळ
कोणी म्हणोत गावटी
बोलीमंदी झाडीबोली
जणू रूपवान नटी ॥
रानातल्या पानोपानी
खेड्यातल्या मनोमनी
झाडीबोलीचा डौलात
झेंडा फडकू गगनी ॥ "
हा झाडीबोलीचा झेंडा आकाशात नेहमी डौलाने फडकत राहो याच शुभेच्छा या कवितासंग्रहाच्या कवीला या निमित्ताने द्याव्याशा वाटतात.
-- अॅड. जयंत साळवे
( 2/4/2022)
आंबील - (कवितासंग्रह)
कवी - सुनिल पोटे (8329359894)
1 टिप्पण्या
Khupछान
उत्तर द्याहटवा