झाडीबोली साहित्यिकांची धूळवड ! #The dust of literary writers!



पलाश (पळस)

केशरी फुलास वेड लागले कुणाचे
रंग घेउनी पलाश पेटले उन्हाचे

फक्त तीन पर्ण घेत डोलते डहाळी
हासतात गर्द गुच्छ पूर्व ग्रीष्म काळी
भार सोसतात वृक्ष आपल्या ऋणाचे
रंग घेउनी पलाश पेटले उन्हाचे

आज सांडली 'फुले न रक्तबीज' खाली
बीज निर्मितीस पुष्प वाहती पखाली
रान मुग्ध पाहण्यात सोहळे तृणाचे
रंग घेउनी पलाश पेटले उन्हाचे

पुष्प घालता जळी त्वचा विकार जाई
स्वस्थ ठेवण्या मुलास झाड माय होई
पूर्ण अंग वृक्ष श्रेष्ठ औषधी गुणाचे
रंग घेउनी पलाश पेटले उन्हाचे

रंगपंचमीस रंग खेळतात सारे
श्याम राधिकेसवे फुटे नवे धुमारे
प्रीत वाटतात पुष्प विश्व स्पंदनाचे
रंग घेउनी पलाश पेटले उन्हाचे

मंजिरीस झोंबले वनाग्नि जाळ पेटे
पूर्व फाल्गुनी फुलास मान थोर भेटे
'प्रीत वाट' सांगतात सूत्र जीवनाचे
रंग घेउनी पलाश पेटले उन्हाचे


-प्रशांत भंडारे,  आमडी, बल्लारपूर





मी केसांचा झुपका आता ठेवत नाही
तेल वाचते धुण्यास पाणी लागत नाही
पत्नी माझी शांत स्वभावी समजदारही
जुई माळते कधी मोगरा माळत नाही
ठेच्या सोबत भाकर खातो लाळ गाळुनी
पिझ्झा बर्गर कधी कुणाला मागत नाही
रागाने तर तापत असतो लाव्ह्यावानी
हात लावून पहा तरी मी लासत नाही
चौकामध्ये डरकाळी तर वाघावानी
घरी बिचारा मच्छर सुद्धा मारत नाही


✍️ सुनील पोटे, दिघोरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या