"महिला संघटन काळाची गरज! Women's organization is the need of the hour!


"यत्र नार्यस्तू पूजन्ते ,रमन्ते तत्र देवता: " अशी नारी बद्दल ची महत्ती गायली जात असतांनाच , मातृशक्ती, स्त्रीशक्तीचा उदोउदो करणाऱ्या देशात मात्र स्त्रीचे लचके तोडून 35 तुकडे इतस्ततः फेकणाऱ्या, विकृतीचा कळस गाठणाऱ्या नराधमाला तात्काळ शिक्षा होत नाही ., जिच्या वर प्रेम करतो आहे असे जगाला सांगणारा प्रेमवीर भर रस्त्यात पेट्रोल फेकून  आपल्याच प्रेमिकेला जीवंत  जाळणाऱ्या विकृत मानसिकतेच्या चुबंक प्रेमविराला  शिक्षा होत नाही. स्त्रीच्याच उदरात स्त्री गर्भाचा अंश नष्ट करणाऱ्या  भक्षकाला  शिक्षा होत नाही.  कित्येक मुलींचा हुंडाबळीने जीव  गेला पण माणूसकीचा अधःपात करणाऱ्याला शिक्षा होत नाही.  
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल न. प. च्या माजी नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर यांनी ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लिहिलेला लेख....!


       गुन्हेगारास शिक्षा होईपर्यंत  कितीतरी वेळ निघून गेलेला असतो, मधल्या काळात  कोणती केस कुठपर्यंत गेली  याचा विसरही पडून जातो जनतेला.

आपापल्या कामात गर्क होऊन जातात. आणि तोपर्यंत पुन्हा-पुन्हा घडत जाते असेच-असेच काहीसे गुन्हे. निसर्गाच्या चक्राप्रमाणे उन्हाळा, हिवाळा पुन्हा पावसाळा प्रमाणे. 

       महिला अत्याचारावरील  हे चक्र कुठेतरी थांबले पाहिजे, महिलांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महिलांनी आवाज उठवायला पाहिजे. महिलांनी संघटन शक्ति वाढवली पाहिजे. सर्वच क्षेत्रातील महिलांनी  आपले संघटन मजबूत केले पाहिजे. मजबूत संघटनासाठी स्त्री स्वयंनिर्भर, स्वयंनिर्णय घेणारी, आत्मविश्वासू असली पाहिजे. स्वयंनिर्भर म्हणजे नोकरी करून महिन्याचा पगार आणणारीच  असली पाहिजे असे नाही तर , साधी गृहिणी जरी असली तरी पतीच्या पगारातून आपल्या कुटुंबाची काळजी घेवून पैशाचे योग्य नियोजन करून घराला पुढे नेणारी असली  पाहिजे .

        कुटुंबातील प्रत्येक संघर्षमय प्रसंगात योग्य  निर्णय घेणारी असली पाहिजे.  जिचे निर्णय कुटुंबासाठी हानीकारक न होता प्रगतीच्या मार्गाने जाते त्यावेळेस तिचा आत्मविश्वास दुणावतो  व त्या घरात गोकुळ नांदते. गोकुळ  नांदणे म्हणजे तरी काय हो, घरात आनंद, सुखसमृद्धीने घर भरून राहणे होय.

ज्या घरात अश्या स्त्रीया असतात सर्वांगपूर्ण ते कुटूंब सर्वतोपरी आनंदी असते. त्या घरात तिचा सन्मान होतो .सर्व घर तिला मानते म्हणजे काय तर तिला पुजले जाते. तिच्या घरी वैभव खेळते, ते कुटूंब प्रगती करू शकते ." यत्र नार्यस्तू पूजन्ते ,तत्र रमण्ते  देवताः  " ही म्हण सार्थ ठरते, हे केव्हा शक्य होते ज्या घरात स्त्रीला सन्मान मिळतो तेव्हाच. नाहीतर कितीतरी टोमणे तिच्यासाठीच असतात. 

" पायातली चप्पल",  "तिला काय समजते ", " मार्गातील धोंडा",  "डोक्यावरील ओझे", "नरकाचे द्वार", "भूईला भार", अश्या कितीतरी विशेषणांची बिरूदावली तिच्यासाठीच असते.

        आज शिक्षणामुळे स्त्रिया स्वयंनिर्भर तर बनल्या पण पुरुषी अहंकाराच्या बळीदेखील पडत आहे. "बळी तो कान पिळी " या म्हणीचा अर्थ असा आहे की, ज्या व्यक्तीकडे  सामर्थ्य किंवा  ताकद असते अशा माणसाचे इतर लोकांना ऐकावेच  लागते. असे सामर्थ्य महिलांनी आणायला पाहिजे.  त्यासाठी महिला संघटन काळाची गरज आहे. महिला संघटनेच्या माध्यमातून महिला अत्याचारा विरोधी आवाज उठविता येते, विना-विलंब  न्याय मिळविण्यासाठी भाग पाडता येते. एवढी ताकद महिला संघटनांच्या माध्यमातून आणता येवू शकते. 

             न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या महिला कामगारांनी "रूटगर्स" चौकात  एकत्र येवून आपल्या अधिकारासाठी लढा दिला म्हणूनच ,महिलांना कामाच्या ठिकाणी 10 तासांचा दिवस, कामाच्या जागी सुरक्षितता यांसोबत लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष प्रौढ स्त्री -पुरूषांना मतदानाचा हक्क इ. मागण्या पूर्ण  होवू शकल्या . 

              "अकेला चना भाड नही फोडता " ही एक हिंदी म्हण आहे . म्हणजे काय तर एक हरभरा जर विस्तवावर ठेवलेल्या ढोबरात  फुटाणा बनू शकत नाही तो जळून जातो. जर अनेक हरभरा दाणे , पसाभर दाणे टाकले तर त्या हरभऱ्याचे चांगले खाण्यायोग्य फुटाणे बनतात.  तद्वतच कुठलेही काम सांघिकपणे केले तर ते निश्चितच यशस्वी होते.  म्हणूनच संघटनेला फार महत्व आहे.

Post a Comment

0 Comments