दारूचा पाश...! Alcohol trap...!


माज्या हिस्स्याचा दंड आन घर मले आतास पायजे, मले येगरा राहाचा आहे.' दारू चढल्याने धड बोलता येत नोयते. तरी गाल व डोरे सुजून पिवरा पडलेला राम्या गंडलत गंडलत बापासी झगडत होता. 'कायचा मसनाचा मानुस गऱ्यात पडला, सकत नाई कमवाची आन निस्या चढली गमवाची. ' मनत चंद्रा नवऱ्याला वनाडत घरात नेन्याची खटपट कराची. तसा राम्याला अंकीन जोर चढाचा. फुगलेला पोट धापा टाकत होता, विखरलेले केस काट्यासारके उबे झालेले, कितीक दिवस दारूच्या घामान आंगोड करून कपडे पोतेऱ्यावानी किटलेले. 'कोनाले मी मोजत नाई, साला येकयेकाची साजरी जिरवतो.' मनुन बापाव मारल्यासारका धावून जानारा रामा आदिस पेवू - पेवू जिरून गेल्याने मदातस तनगडून पडला का तलमला होहे न डोरे वटारल्यावानी बायकोक पाहे . बायकोनं उचलला कां अजून तावरतीवर करत 'पयसे दे नाईत माजा हिस्सा टाक'. मनत राम्या बापावर बोंबले. चंद्रिला आगोटत नाई असा पाऊन 'आन व खुटीचा चराट, इदूराले बांदल्यासीवा याची उराटी जा नाई.' मनत सका उठला. गुनान चराट आनतले रामाचा डोकलत पटरना सुरूस होता . 'नास कराले पोटी जलमलास, कोटी मानान जाचा नाक ठेवला नाई.' तरपायाची आग मस्तकात गेल्याने सकान रामाच्या मुस्काडात येक जोरदार सनकवली तसा रामाला दिवसा चालन्या दिसून कोलांडया खात खाली पडला. सकाने रामाच्या बकोटीला धरले, चंद्रि व गुनाने दोनी पाय धरून रामाची वरात घरात आनली. रामा मासरीवानी ईदरत सुटन्याचा प्रयत्न करत होता. पन पेवू - पेवू फोसफोस झालेला किती तगनार । तिगानी त्याचे हात पाय बाजला बांदुन काहाडले. ईदरु ईदरु येकदाचा निपचित पडला आन गुनाच्या आसवांना पारावर उरला नाई. 'कोनता पाप केला न पोटी असा रोइ जलमला.' या तिच्या स्यब्दातील यातना घराच्या भीती हेलावून टाकत होत्या.

हे सुद्धा वाचा : 👉👉 होळीच्या सप्तरंगी प्रेमरंगात रंगु या !!

हे सुद्धा वाचा : 👉👉 सावधान.....! अनुचित प्रकारांवर 'पोलिस' दादाचा राहणार 'डोळा' !

रामाची दारुची लत दिवसेंदिवस घरात बोवारी घुसल्यावानी वाहाडत होती. आयटीया करून पोरगा नवकरी लागली नाई त रिकामा राउ नये यासाठी सकान सायकल स्टोर टाकून देला. त्यास वक्ती रामाला कलापथकात काम कराची संधी भेटली. त्याच्या आंगच्या कलाकाराने लवकरस कलापथक फेमस केला तसा गवीत येक येक घातक घूट जवड करत होता. त्यास नादात सायकल स्टोर डूबला, दारूच्या सवकासाठी इकायला सादा बुलुट का पोक उरला नाई. पन कलापथकाच्यामिसान पीरमात पडलेली चंद्रिका बायको मनुन टिकली ती आता घटकी घटकीला सोताच्या फुटक्या कर्मान तिरतिर तुटत आसव पित जगते. कलापथकाच्या मालकाने तर तजून रामाला कदीचेस हाकलून देले. रामाच्या दारूने घरातस नाई त गाव अन नात्यागोत्यात इतके कारनामे करून ठेवले की सका आन गुना उजरमाथ्याने फिरायला भेवतात. 'पोरगा वाया गेला, पयलपासून ख्याल केल्याले असी पारी आली नसती.' असे लोकायचे बोलने आयकून पेसीमानी लागून दोगेही तोंड कोटी लपवू अस्या गतीला आले. चंद्रि कितीक पायापोटी कराची पन रामा थोड्या अटीवर थांबून पुना 'येरे माज्या मांगल्या' लाजलज्जा बाजूला ठेऊन तर्र होऊन यायचा. मग कायचेस भान उरत नसून फक्त न फक्त दारूदिसायची. माय, बाप आन बायको यांचे हाल दिसाचे नाई. हातात पडले ते इकून आपली सवक भागन्यासी मतलब. घराचा दार करून बसलेला रामा उतरली की लान पोरासारका ढसाढसा रडाचा पन घटकीतस भट्टीवर दिसाचा.

'दारू वाईट आहे, दारू सुटली पायजे.' यासाठी रामा कितीक येरा घरच्यांक बोलाचा. देवाधर्मासकट सप्पाईच्या आनाभाका घ्याचा. पन काई येक दोन दिवस थांबून आता जास्त घेत नाई थोडसी घेतो मनुन गिलासाला हात लावलेला रामा लुडकून घरी याचा. त्यासाठी पैसे नसले त वाटेल त्या थराला जाचा. कदी माय बायकोला बिमार पाडाचा त कदी कामाव येतो मनुन लोकाइची हाजी - हाजी करून खोटेनाटे बायने कराचा. बायरगावी कितीकदा भीक मागली. येकदा त येका नातेवाईकाकुन बाप मेला, त्याच्या सतीगतीसाठी मनुन पैसे मागून हा भट्टीत चित होऊन रायला अन तिकडे घरी सारे गनगोत रडत रडत जमा झाले होते. असली नसली इज्जत गमावलेला रामा दारूपाई मार खाऊन कितीक आवा बोवा, धागेदोरे केले. पन त्याचा पागलपन सरत नोयता. डॉक्टरान 'दारूकमी कर नाईत मरसिल.' मनुन सल्ला देला, तरी सत्तर किलोचा रामा पसतीस किलो होऊन कमरचा पँट सुतरीन लटकवे, पन हातातून सीसी सुटली नाई.

त्या दिवसी सेजारच्या गणपतक सेयरातून येक पावना आलता. रामाच्या घरचा कल्ला पाऊन तेथी आला. 'मी काई मदत करूकां ?' या त्याच्या आवाजाने ‘जमत असन त मले येवढाक जयर पाजा' मनुन सका बाहेर निगुन गेला. आलेला पावना दारूडा असून गेल्या पाच वर्स्यापासून दारूला हात लावत नाई हे गुनाला समजले होते. 'बापू काईतरी करा, मी तुमच्या पाया पडते. तुमच्यासारकी याची दारूसुटली त लई उपकार होतील.' गुना केविलवाना टोंड करत होती. 'तुमची इच्छा असेल त उपाय आहे.' मनत त्याने बाजला बांदलेल्या रामाचे हात पाय सोडले. आन दारुड्याइले दारूपासून दूर ठेवणाऱ्या येका मंडळाची माहिती देऊ लागला. मद्यपाश येक आजार कसा असतो. त्याने आपल्या अनुभवातून सांगले. चंद्रिका व गुना ध्यान देऊन आयकत होत्या. येका दारुड्याची भास्या दुसऱ्या दारूड्याच्या रिदयात घुसून रामाच्या डोऱ्यातुन आसव झरत होते. चतुर, धूर्त, लबाड चकमा देणारा आजार कसा थांबवून ठेवायचा, त्यासाठी येक दिवसाचा आधार घेत पयल्या घूटापासून दूर रायचा सोपा उपाव सापडला. सगरीक पयसा सारून न भेटलेला समाधान अनुभव कथनातून आस्यावाद निर्माण करून गेला. पावन्यानी यात काम करनाऱ्या काई सदस्यांचे व आपला फोन नंबर येका कागदावर लिहून रामाच्या हातात देला. 'गरज पडल्यास मदत मागायला कचरूनोको.' यावर काहीतरी गवसल्याच्या खुसीत रामाने होकारार्थी मान हलवली. सेयर खूप लाम असल्याने ऑनलाईन मिटिंग करण्याचा रामाने दिलेला सब्द घेऊन पावना बाराव्या पायरीचे काम करून चेहऱ्यावर नवे तेज भरत निगुन गेला.

भूक, राग, थकवा, येकलेपना यावर मनाच्या तयारीने प्रामाणिकपने मोकऱ्या मनाने ऑनलाईन मिटिंग करत रामा येक दिवसाच्या जोरावर दारूपासून दूर राहू लागला. त्याला मद्यपाश आजार समजल्याने पयल्या घातक घुटापासून दूर राहून बारा पायऱ्या व बारा रूढीच्या माध्यमातून दारुबरोबर सोतातील गुन- दोसाचे पास सोडवू लागला. घरात आनंद वाहू लागला. घर, काम अन् मिटिंग यात गुंतलेला रामा पूर्वपदावर यायला लागला. त्याच्यात हुन्नर होतीस. नव्याने सुरूकेलेला सायकल स्टोर तीन वयात मोठी एजन्सी बनली. रामाचा रामासेट झाला. चंद्रिका दोन पोरायची माय बनली. सका आता दोन मजली बंगल्यासमोरील बंगइवर बसून गावातील लोकाइचा न्याय करत बसायचा. गुना लेकराच्या करतुतीवर नाज करत त्या भल्या मानसाला आसिर्वाद देत रायते. सारे आनंदात दाहाक वर्स सरत आली. दारूपासून दूर असलेल्या रामाने मिटिंगकडे कानाडोरा करायला सुरुवात केली. येकदाचा दारूड्या हा मरतले दारुड्या रायते, हे इसरला. मिटिंगची साथ सुटली न गपलत झाली.

रामा मोठा सेट बनला तरी एक कलाकार असल्याने गावच्या दंडारीत काम कराले लागला होता. दंडारीत काम करणारे रातभर आपला येक येक घुट सुरू ठेवतात . सुरुवातिला मिटिंगचा असर असल्याने रामाने तिकडे ढुकुनइ पायले नाई. पन सतत त्या वातावरणात रायल्यानं त्याचे मानसिक आकर्सन वाढत गेले. अस्या मनस्थितीत “बईनाचा वनवास" या दंडारीच्या प्रयोगवक्ती बाकीचे नोको मनतांना रामाने थोडसी घेतो मनुन पयला घुट घेतला अन आजार काम करू लागला. शारीरिक ओढ तीव्र झाली. शरीर दारू मागू लागले. रामा भावाचा फार्स करीत असल्याने त्याला जास्तीत जास्त स्टेजव रा लागे. अस्यातस पडद्यामागील लोकांनी सारी पेवून संपवली. रामा अदीकस अधीर झाला. त्याला थांबता येत नोयते, काय करावे. जसा त्याचा पार्ट आला, त्याने गाना सुरूकेला “जातो जातो मी बयनीले दांदराले ....!” आन लोकाइतुन गाना मनत निगुन गेला. लोकाइले वाटत होते दंडारीतील भाग असन. इकड गरा देनारे टाडकरी अन ढोलक्या "जातो मी बयनीले दांदराले ...!” मनु मनु थकले, टोंड टुकले. कोंबडा आरवला तरी भाऊ बयनीले दांदरून आला नाई. लोक तजून घरी निगुन गेले. सकारी सकारी गावभर येकस बोंब उठली रामा भट्टीच्या फाटकापासी चित झाला आहे.


झाडीबोलीत प्रकाशित होणारा लक्ष्मण खोब्रागडे यांच्या "झोडपा” या झाडीबोलीतील कथासंग्रहातील “पाश” ही एका दारूड्याच्या आयुष्यावर सत्य भाष्य करणारी झाडीबोलीतील कथा सुज्ञ वाचकांसाठी.....?

-लक्ष्मण खोब्रागडे, जुनासुर्ला, ता. मुल, जि. चंद्रपूर

९८३४९०३५५१

Post a Comment

0 Comments