लखनऊ येथील राष्ट्रीय जलवायू परिषदेत राज्याचे वनमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या भाषणाने टाळ्यांचा कडकडाट थांबता थांबत नव्हता!
लखनऊ (प्रति.) : ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाची ओघवती शैली साऱ्यांनाच आकर्षित करते. उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरातील श्रोतेही त्यांच्या भाषण शैलीने प्रभावित झाले. भाषण सुरू झाल्यापासून अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर श्रोते टाळ्या वाजवून दाद देत होते. तर भाषण संपल्यावर बराच वेळ श्रोते टाळ्या वाजवत राहिले. टाळ्या थांबत नसल्यामुळे निवेदिकेलाही काही मिनिटे थांबावे लागले. लखनऊ येथे इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे दोन दिवस राष्ट्रीय जलवायू परिषदेत नाम. मुनगंटीवार यांच्या प्रभावी भाषणादरम्यान उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यापूर्वीही आंध्र प्रदेशच्या प्रदूषण विभागातील एका अधिकाऱ्याने मुनगंटीवार यांना भेटून "आपल्याला भेटून मी धन्य झालो." असे म्हणत वनमंत्र्याच्या कार्याची प्रशंसा केली याची माध्यमांनी म्हणावी तशी दखल घेतली नाही.
बालपणापासून आपल्या पैश्यांची बचत कशी करायची, याचे संस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे रक्षण करणे हे देखील आपल्या संस्कारात असायला हवे, असे प्रतिपादन करताना पर्यावरण रक्षणासाठी कुणाचा शोध घेत असाल तर एकदा आरश्यापुढे उभे राहा, तुमचा शोध संपून जाईल, असे आवाहन राज्याचे वनमंत्री मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. या परिषदेतील द्वितीय सत्र ‘पर्यावरण संवर्धनात विधिमंडळाची भूमिका' या विषयावर होते. यामध्ये ना. श्री. सुधीर मुनगंटीवार प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतीश महाना, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी चौबे, उत्तर प्रदेशचे वन व पर्यावरण मंत्री डॉ. अरुण कुमार, उत्तराखंडचे वन व पर्यावरण मंत्री सुबोध उनियाल, उत्तर प्रदेशचे वन व पर्यावरण राज्यमंत्री के.पी. मलिक, उत्तर प्रदेश वन व पर्यावरण विभाग प्रमुख मनोज सिंग, वन विभाग प्रमुख ममता संजीव दुबे, वन व पर्यावरण विभागाचे सचिव आशिष तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पर्यावरणाच्या समस्येचे समाधान अमेरिका, ब्रिटन, जपान किंवा चीनला सापडणार नाही. 'वसुधैव कुटुम्बकम्' म्हणणाऱ्या भारतावरच हे समाधान शोधण्याची जबाबदारी आहे. आणि आज विश्वगौरव मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मानननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कर्मभूमी असलेल्या उत्तरप्रदेशातील या परिषदेत पर्यावरण बदल आणि ग्लोबल वॉर्मींगवरील उत्तर आपल्याला मिळणार आहे, असा विश्वासही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या दोन दिवसीय परिषदेत फक्त चिंतन करून चालणार नाही तर त्या चिंतनाचे जनआंदोलनात रुपांतर करावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. हवामान बदलाचे मानवी जीवनावरील परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे गांभीर्याने प्रत्येकाने याची काळजी घ्यायलाच हवी, असे ते म्हणाले.
हक्क लक्षात राहिले, जबाबदारी विसरले!
भारताचे संविधान अस्तित्वात आल्यापासून सर्वसामान्य माणूस असो, महापौर असो वा कुणी मंत्री असो, प्रत्येकाने संविधानात स्वतःचे अधिकार शोधले. आपल्याला असलेले अधिकार जाणून घेतले. पण याच संविधानात पर्यावरण, जलप्रदूषण, वन्यजीवसंवर्धन यासंदर्भात आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या आपण सोयीने विसरलो. फक्त हक्क लक्षात ठेवले. मनापासून भारत माता की जय असा नारा आपण लावत असाल तर संविधानातील जबाबदारी विसरू नका, असे आवाहन ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सरकारमध्ये वनमंत्री शेवटच्या पाचमध्ये मोजला जायचा. मी मंत्री झालो तेव्हा वनखात्याचे आणि वनमंत्र्यांचे महत्त्व समजावून सांगितले. कारण ज्या अॉक्सीजनच्या जोरावर इतर विभाग चालतात त्यांना ऑक्सिजन देण्याचं काम वने करतात. पर्यावरण रक्षणाचं काम वनखात्याच्याच माध्यमातून होतं, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्र सरकारचे वनखात्याचे बजेट २०१४ मध्ये २६५ कोटी रुपये होते, ते आज २ हजार ७०० कोटी रुपये आहे, असेही त्यांनी सांगितले. मी वनमंत्री असताना महाराष्ट्रात ५० कोटी वृक्ष लागवड केली. कांदळवनाच्या वृद्धीसाठी प्रयत्न केले. यावर्षी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थसंकल्पात कांदळवनाच्या वृद्धीसाठी विशेष तरतूद केली, याचा अभिमान आहे, अश्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
जगात सर्वात जास्त वाघ भारतात!
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी देशभरातील वाघांची संख्या सांगितली. यामध्ये जगातील एकूण वाघांपैकी ६५ टक्के वाघ भारतात असल्याचे ते म्हणाले. मला तर विशेष आनंद याचा आहे की, महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ कुठे असतील तर ते माझ्या जिल्ह्यात आहे. अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.
राष्ट्रीय जलवायू परिषदेत सहभागी झाल्याबद्दल उत्तर प्रदेशचे वन व पर्यावरण मंत्री डॉ. अरुण कुमार सक्सेना यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना अयोध्येच्या राममंदिराची प्रतिकृती भेट दिली. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण व विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी लखनऊ विमानतळावर ना. सुधीर मुनगंटीवार यांचे श्रीरामाची मूर्ती देऊन स्वागत केले. तर राज्यमंत्री रवींद्र जायस्वाल यांच्यावतीने त्यांच्या मुलानेही श्रीरामाची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले.
0 टिप्पण्या