डाॅ. अशोक जिवतोडे : शिक्षण क्षेत्रातला दीपस्तंभ ते विदर्भवादी व ओबीसी नेता ! Dr. Ashok Jivtode: A beacon in the field of education to Vidarbha and OBC leader!


साधारणत: १९५०नंतरचा काळ असेल. मुंबई व चंद्रपूर हे परस्पर विरुद्ध टोकाला. एक पूर्वेला तर दुसरा पश्चिमेला. चांदा हा क्षेत्रफळाने तर मुंबई हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा. पश्चिमेकडून येणारे शिक्षणाचे वारे मुंबईच्याच भाग्याला. म्हणून मुंबई ही आधुनिक जगाशी स्पर्धा करू शकली. चांदा जंगलांनी वेढलेलाच. खनिज द्रव्यांनी नटलेला; परंतु शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागासलेला. शिक्षणाचा गंधही न पोहोचलेला. आदिवासी जिल्हा हे संबोधन होते. मागासलेला म्हणून सुखसोयींनी वंचित. शहराच्या ठिकाणी मर्यादित शाळा. खेड्यात दूरदूरपर्यंत माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. खेड्यातील तरुण शिक्षणापासून वंचित असायचे. विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमता असूनही बुद्धीचा विकास लोप पावत होता. शहरापासून खूप दूर असणाऱ्यांना पुढचे शिक्षण सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. अज्ञानाची ज्ञानाकडे वाटचाल होण्याऐवजी अज्ञानाची अज्ञानाकडेच वाटचाल सुरू होती. एसटी तर सोडाच, साधा सायकलचा रस्ताही नव्हता. अशातच १९५३ मध्ये चांदा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून शिक्षणमहर्षी श्रीहरी बळीराम जिवतोडे यांनी चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटविली. एका किरायाच्या खोलीत जनता विद्यालय, चंद्रपूर सुरू झाले. शहरातच नाही, तर जिल्ह्यातील कोनाकोपऱ्यांत शाळा उघडून शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी उघडी करून दिली. चंद्रपूर जिल्हा शैक्षणिक विकासाच्या रथावर स्वार झालेला होता. अवघ्या पाच वर्षांत म्हणजे १९५८ मध्ये चांदा शिक्षण प्रसारक मंडळाने चंद्रपुरात जनता महाविद्यालयाच्या रूपाने उच्च शिक्षणाची सोय करून दिली. अल्पावधीतच संस्थेचा वटवृक्ष झाला. आजघडीला चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात विविध अभ्यासक्रमांची तीन महाविद्यालये, पाच व्यावसायिक महाविद्यालये, पाच कनिष्ठ महाविद्यालये, एक अध्यापक महाविद्यालय आणि २० शाळा आहेत. हजारो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून घडले आणि घडताहेत. ते आज देशातच नाही तर जगाच्या काेनाकोपऱ्यांत मोठमोठ्या हुद्द्यांवर आहेत. हा व्याप सांभाळणे सोपे नव्हते. या संस्थेची धुरा सचिव म्हणून डाॅ. अशोक जिवतोडे यांच्याकडे आली. त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई अशोक जिवतोडे याही त्यांच्या खांद्याला खांदा लावून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. या दाम्पत्याने या संस्थेचे गतवैभव टिकवण्याचे मोठे काम केले आहे. डाॅ. अशोक जिवतोडे हे उच्चविद्याविभूषित आहेत. एम.काॅम., एम.एड., एम.फिल. (वाणिज्य), एम.ए. अर्थशास्त्र, पीएच.डी. (शिक्षणशास्त्र), पीएच.डी. (वाणिज्य) हे शिक्षण त्यांनी घेतले आहे. डबल पीएच.डी. करणारे विदर्भातील ते एकमेव आहेत. मागील सुमारे ३० वर्षांपासून डाॅ. अशोक जिवतोडे यांनी या संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात करिअर लाॅन्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी शिक्षणाची आवड निर्माण केली. ही संस्था म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचीच नव्हे, तर विदर्भाची शान आहे. डाॅ. अशोक जिवतोडे यांनी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचा डोलारा सांभाळताना समाजसेवेचे व्रतही जोपासले. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे सुरूच असतात. यासोबत देशातील एका मोठ्या वर्गाला न्याय मिळावा म्हणून डाॅ. अशोक जिवतोडे यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी ओबीसी चळवळ उभारली. दिल्ली ते गल्लीपर्यंत ओबीसी बांधवांच्या न्यायासाठी अधिवेशने घेऊन सर्वांना एकसूत्रात बांधण्याचे मोठे काम ते करीत आहेत. सोबतच विदर्भ राज्य व्हावे, यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातला दीपस्तंभ, समाजसेवक, विदर्भवादी ते ओबीसी नेता अशी ओळख निर्माण करण्यात डाॅ. अशोक श्रीहरी जिवतोडे यशस्वी झाले आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत असल्याने डाॅ. अशोक जिवतोडे यांना मोठे बळ मिळत आहे.






Post a Comment

0 Comments