राज्यात लाचखोरीत महसूल व पोलीस विभाग अग्रस्थानी ! Revenue and police department in the forefront of bribery in the state!


महसूल विभागात तलाठी तर पोलीस विभागात सर्वाधिक पोलीस हवालदारांचा समावेश !

नागपूर : राज्यात लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून लाचखोरीत महसूल विभाग पहिल्या तर पोलीस विभाग द्वितीय स्थानावर आहे. गेल्या सहा महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३४ सापळे रचले. त्यात ६०५ शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. एसीबीच्या संकेतस्थळावर ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. लाचखोरांमध्ये महसूल विभागात सर्वाधिक तलाठी तर पोलीस विभागात सर्वाधिक पोलीस हवालदारांचा समावेश आहे. 

गेल्या सहा महिन्यात महसूल विभागात १०४ लाचखोरीचे सापळे रचले गेले. त्यात १४२ लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. यामध्ये वर्ग तीनच्या ८७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस विभागात ७९ सापळे रचले गेले. यात १०९ लाचखोर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यात ८४ पोलीस हवालदारांचा समावेश आहे. तिसऱ्या स्थानावर पंचायत समिती असून येथे ४५ सापळे रचण्यात आले. ५९ लाचखोर अधिकारी- कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर लाचखोरीत महापालिका, वीज महामंडळ आणि शिक्षण विभागाचा क्रमांक लागतो. नागपूरचा क्रमांक सातवा नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोरीचे गुन्हे दाखल झाले असून तब्बल ९१ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सापळे रचण्यात आले. लाचखोरीत द्वितीय स्थानावर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर असून प्रत्येकी ७४ लाचखोरीचे गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या स्थानावर ठाणे (५४) असून नागपूरचा (४३) सातवा क्रमांक लागतो. 

नागपूर परिक्षेत्रात अनेक तक्रारदारांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सापळा कारवाईमध्ये हा जिल्हा शेवटच्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.. नागपूर  परिक्षेत्रात  वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सहा जिल्ह्याचा समावेश आहे.

*महासंचालकांचा संदेश!  *

   लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे.  शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल.   समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे.

   जय हिंद! जय महाराष्ट्र!

श्री. निकेत कौशिक (भापोसे), (अतिरिक्त कार्यभार), महासंचालक,

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य.

Post a Comment

0 Comments