मर्जीतल्या कंत्राटदारासाठी काही पण करण्याची मनपा अधिकाऱ्यांची भूमिका ! The role of municipal officials to do anything for the favored contractor!सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेमध्ये पाणीपुरवठ्याच्या कंत्राटाबाबत केला खळबळजनक गौप्यस्फोट ! 

शहरातील अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम मे. संतोष कन्स्ट्रक्शन या एजन्सीला देण्यात आलेले आहे. सुमारे 230 कोटी रुपयांच्या या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर  एक वर्ष योजना चालविण्याची जबाबदारी संतोष कन्स्ट्रक्शन कंपनीकडे असल्याचे करारात नमूद आहे. अजूनपावेतो शहरात  अमृतची योजना पूर्ण झालेली नाही. शहरातील सर्व नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुद्धा सुरू झालेला नाही.  अमृत योजना अपूर्ण असतानाही संतोष कन्स्ट्रक्शन ने जवळपास पूर्ण 220 कोटी रूपयांचे देयके मनपाकडून वसूल केले. आता पुढील एक वर्ष ट्रायल घेण्याच्या जबाबदारीतूनही अमृतच्या कंत्राटदाराला मुक्ती देण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी  केला असल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी करीत याविरोधात मागील काही दिवसापासून जनजागृती आंदोलन पुकारले आहे, काल बुधवार दि. २८ जून रोजी पत्रकार घेऊन  खळबळजनक गौप्य्स्फोट केला. 

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मर्जीतील कंत्राटदाराच्या हितासाठी आडमार्गाने पाणीपुरवठ्याच्या कामाचे खाजगीकरण करण्याचे कट कारस्थान रचले असल्याचा आरोप (भाजप वगळून) मनपाच्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी केलेला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांनी अजून पर्यंत याबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र इतर सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पाणीपुरवठ्याच्या कंत्राटाबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला. पाणीपुरवठ्याच्या एकाच कामासाठी एकाच वेळी 3 कंत्राट देण्याचा मनपाचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस चे दिपक जयस्वाल, विनोद लभाने,काँग्रेस चे अशोक नागपुरे, बापु अन्सारी, गोपाल अमृतकर,प्रदिप डे,मनोरंजन रॉय, प्रसन्न शिरवार, काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता अग्रवाल, सकिना अन्सारी,विना खनके, शिवसेनेचे आकाश ऊर्फ पिंटू साखरखर, अपक्ष नगसेवक हनुमान चौखे, उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये देशमुख यांनी तीनही निविदेच्या प्रती प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीरपणे दाखविल्या. तीन महिन्यात एकाच कामासाठी तीन वेगवेगळ्या निविदा काढून तीन कंत्राटदारांची नेमणूक करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे 'एक फुल तीन माली' असा प्रकार असल्याचा आरोप यावेळी देशमुख यांनी केला. पाणीपुरवठा योजना चालविण्याकरिता नुकतीच एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली.या निविदेमध्ये इरई धरन ते तुकुम जलशुद्धीकरण केंद्र ते बाबुपेठ-दाताळा सम्पवेल येथील सर्व यंत्रसामुग्री-उपकरणे चालविणे व त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे अशा कामांचा स्पष्ट उल्लेख आहे.शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी सदर कंत्राटदाराकडे असल्यामुळे पाईपलाईनची देखभाल-दुरुस्ती, गळतीचे काम सुद्धा त्याच कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे.सर्व यंत्रसामुग्री-उपकरणांची विद्युत व यांत्रिकी देखभाल दुरुस्ती करणे सुद्धा अपेक्षित आहे. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेने एप्रिल 2023 मध्ये पाईपलाईन जोडणी,गळती दुरुस्ती इत्यादीसाठी एक वेगळी निविदा काढलेली असून ती अंतिम टप्प्यात आहे. मे 2023 मध्ये पाणीपुरवठा योजनेतील विद्युत व यांत्रिकीच्या देखभाल दुरुस्ती करिता कंत्राट देण्यासाठी पुन्हा एक निविदा मनपा प्रशासनाने काढली.या दोन्ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कमी दराच्या कंत्राटदारांची निवड सुद्धा झालेली आहे. एकाच कामासाठी तीन कंत्राटदार नेमण्याचा अनोखा विक्रम मनपा प्रशासन करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये देशमुख यांनी केला. मर्जीतल्या कंत्राटदारासाठी 'काय पण' हीच मनपा अधिकाऱ्यांची भूमिका असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

Post a Comment

0 Comments