फी जमा करण्याबाबत सक्ती न करण्याचा सभेत निर्णय!  • शिल्लक फी साठी इन्स्टालमेंट चा पर्याय द्यावा!कोणतीही फी वाढ करु नये!
  • फी वसुलीसाठी घरी जाऊन तगादा लावू नये!
  • गरीबविद्यार्थ्याचा फी संबंधाने सहानुभुतीपूर्वक विचार व्हावा!

फी वाढीसंदर्भात जिल्हा परिषद येथे आढावा सभा

चंद्रपूर, दि.30 मे: जिल्ह्यातील शाळेची फी वाढ, फी भरणे संदर्भात आमदार यांचे प्रतिनिधी, संस्थाचालक,यंग चांदा बिग्रेड व पालक प्रतिनिधी यांची समन्वय सभा शिक्षणाधिकारी (माध्य) संजय डोर्लीकर व शिक्षणाधिकारी (प्राथ) दिपेंद्र लोखंडे यांचे प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दिनांक 22 मे रोजी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उपशिक्षणाधिकारी (माध्य)पूनम म्हस्के, उपशिक्षणाधिकारी (प्राथ) मोहन पवार,विस्तार अधिकारी शिक्षण गणेश चव्हाण, चंद्रपूर विधानसभेचे आमदार प्रतिनिधी प्रतीक शिवणकर, महिला प्रमुख यंग चांदा बिग्रेड वंदना हातगावर तसेच पालक प्रतिनिधी, विविध शाळेचे संचालक प्रामुख्याने उपस्थित होते.

या सभेमध्ये शिक्षणाधिकारी (माध्य) संजय डोर्लीकर यांनी शासन परिपत्रक दिनांक 30  मार्च 2020 व शासन निर्णय दिनांक 8 मे 2020 चे वाचन करून सविस्तर माहिती दिली.तर, शिक्षणाधिकारी (प्राथ) दिपेंद्र लोखंडे यांनी सभेमध्ये  आरटीई अॅक्ट 2009 प्रमाणे प्रवेश प्रक्रिया व फी संबंधाने मार्गदर्शन केले.

सदर सभेमध्ये फी वाढ बाबत,फी इंस्टालमेंट, चालू वर्षाची फी बाबत, फी सक्ती, चुकीचे मोबाईल संदेश, विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांच्या गृह भेटी, केवळ फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतून टी.सी.देणे, पालक, शाळा व शासन यांनी मिळून फी बाबत तोडगा काढणे, संस्थेला सहाय्य होण्यासाठी शासनाला आर्थिक मदत मागणे, शासन निर्णय पालकांना अवगत करणे, फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना टी.सी. न देणे इत्यादी बाबत चर्चा करण्यात आली.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये फी जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येवू नये. पालकांच्या सोईच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2019-20 व 2020-21मधील देय, शिल्लक फी वार्षिक, एकदाच न घेता मासिक, त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय दयावा.शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोणतीही फी वाढ करु नये, लॉकडाऊन कालावधीत गैरसोई टाळण्यासाठी पालकांना ऑनलाइन फी भरण्याचा पर्याय द्यावा.फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन तगादा लावू नये.अतिशय गरीब विद्यार्थी असेल तशी खात्री होत असेल तर फी संबंधाने सहानुभुतीपूर्वक विचार व्हावा, या बाबींवर चर्चा होऊन अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments