- आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
चंद्रपूर महानगरपालिकाअंतर्गत येणा-या इरई नदीवर केबल स्टेड ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले असून हा ब्रिज आता लोकसेवेत रूजु झाला आहे. या ब्रिजखाली ब्रिज कम बंधा-याच्या बांधकामासाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातुन केलेली आहे.
चंद्रपूर महानगराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची स्वतंत्र व्यवस्था नाही. चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्रासाठी तयार करण्यात आलेल्या इरई धरणातुनच पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी आता कमी पडू लागले आहे. दुसरीकडे परिसरातील कोळसा खाणीमुळे भुगर्भजलपातळी देखील खालावत चाललेली आहे. ही पातळी वाढून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करता यावा म्हणून शहरातुन प्रवाहीत होणा-या इरई नदीवर ब्रिज कम बंधा-याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर यासंदर्भातील निवेदन उपमहापौर राहूल पावडे यांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे सादर केले. नागरिकांची ही रास्त मागणी पूर्ण व्हावी म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिज कम बंधा-यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वीच दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार या कामासाठी १० कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. चंद्रपूर स्थित दाताळा रोड इरई नदीवर ब्रिज कम बंधारा बांधण्याकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अंतर्गत नविन चंद्रपूर शहराच्या विकास या योजनेअंतर्गत १० कोटी रूपये निधी मंजूर करावा, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातुन केली आहे.
0 टिप्पण्या