उद्घाटनाच्याच दिवशी पुन्हा एक दारु दुकान पाडले बंद !नगरसेवक पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात नागरिकांनी उचलले पाऊल !

चंद्रपूर : दाताळा रोडवरील जगन्नाथबाबा मठासमोरील देशी दारू दुकानाचा मुद्दा सर्वत्र गाजत असताना बुधवारी नागपूर रोडवरील डॉ. राम भारत यांच्या बाल रुग्णालयाला लागून सुरू झालेले देशी दारू दुकान नागरिकांनी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात बंद पाडले.
दाताळा रोडवर दुकान सुरु करताना गुप्तता पाळण्यात आली होती. त्याप्रमाणे नागपूर रोड वरील महालक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये सुरू झालेल्या देशी दारू दुकानाबद्दलही गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र बुधवारी सकाळी दुकानाचे उद्घाटन झाल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. नागरिकांनी तातडीने नगरसेवक देशमुख यांना बोलावून दुकान बंद पाडले. त्यानंतर दुकान मालकांनी पोलिसांना पाचारण केले. परंतु, नागरिकांनी पोलिसांसमोर ठाम भूमिका घेतल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून दुकान बंद ठेवण्याचे निर्देश पोलिसांनी सदर दुकानदाराला दिले. यावेळी जनविकास युवा आघाडीचे अक्षय येरगुडे, विशाल बिरमवार यांच्यासह स्थानिक नागरिक अमित पुगलिया, डॉ. राम भारत, नितीन झाडे, साजिद मिर्झा, अभिजीत मोहगावकर, निलेश लोणारे, शंकर अग्रवाल, सचिन लोणारे, बालसरे, पांडे, आमटे, सलीम शेख आदी उपस्थित होते.

उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी अडचणीत सापडणार !
एखाद्या दुकान किंवा इमारतीमध्ये व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्या इमारतीला किंवा दुकानाला वाणिज्य वापराची मंजुरी स्थानिक प्राधिकरणाकडून घेणे आवश्यक असते. दाताळा रोडवरील प्रवीण जुमडे तसेच नागपूर रोडवरील बाळाभाऊ सम्मनवार व महादेव ढेंगळे यांच्या इमारतींना केवळ निवासी बांधकामाची मंजुरी असतानाही देशी दारूचे दुकान स्थानांतरित करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट कारभाराबद्दल लवकरच पुराव्यासह गौप्यस्फोट करणार असल्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा देशमुख यांनी केला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अनेक अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

अवैध दुकानाविरुद्ध ७२ तासाचा अल्टिमेटम ,!

निवासी इमारतीमध्ये दुकानाचे अवैध बांधकाम करून देशी दारूचे दुकान सुरू केल्यामुळे नगरसेवक देशमुख यांनी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना पत्राद्वारे अवैध दुकानाचा वाणिज्य वापर करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. महालक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या बांधकामाच्या मंजुर नकाशाची प्रत देत पुन्हा एकदा ७२ तासाचा अल्टिमेटम देशमुख यांनी आयुक्त मोहिते यांना दिला असल्याची माहिती निलेश पाझारे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

Post a Comment

0 Comments