Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

झाडीबोलीचे सौंदर्य आणि साहित्यिक मूल्य वाढविणारा कवितासंग्रह : "लिपन"चंद्रपुर : कवी लक्ष्मण खोब्रागडे यांचा बावन्न कवितांचा समावेश असलेला *लिपन* कवितासंग्रह झाडीबोलीतील बावन्न अंगांनी सजलेला बावन्नकशी (इसरा) मौल्यवान दागिना होय .

वैनगंगेच्या काटावर तलावाच्या पाटावर
सजली नटली झाडी माजी
इसरा हीवऱ्या साजावर

अस्सल झाडीपट्टीतील वास्तव साध्याभोळ्या माणसांच्या जीवनशैलीवर , देहबोलीवर , समाजव्यवस्थेवर आणि चराचरातील लौकिक व अलौकिक शक्‍तीवर सूर्यप्रकाशासारखा उजेड पाडून झाडीबोलीचा महिमा कवीने मराठी साहित्याच्या क्षेत्रात उजागर केलेला आहे .
लिपन म्हणजे मातीच्या , कुडाच्या घरांची लहान-मोठी भगदाड (भोक) बूजविण्याकरिता शेणामातीचा केलेला गिलावा होय.
आरणभात आणि चुनकन्याची जाणीव असलेला कवी मनाच्या गाभाऱ्यातून येणाऱ्या भावनांना हिरव्या झाडीतील रानमेव्याचा साज -शृंगार करून परिपूर्ण भावार्थ आणि आशयाने आपल्या कवितांमधून मांडणी केलेली आहे . प्रमाणभाषेच्या तुलनेत कुठेही कमी न पडणारा कवी बोलीभाषेत म्हणतो -

कितीक माजले वयरी अजूक
झिनझिण्या आनत टाकून चुना
सडक मोकरी स्वास स्यातीचा
खमक्या धीरात फक्त लढ म्हणा

'इरकड' कवितेत बदलत्या समाजव्यवस्थेवर घाव घालताना कवी म्हणतो -

बापजाद्यापासून कईक घाव झाले
लिकापडी करणारे बोके गब्बर झाले
घाम जिरे कोनाचा तूप भापले कोनी
घाटा नाइ कस्टाले होम लगीत झाले

हृदयातून निघालेल्या भावनेला बोलीभाषेत मूर्तरूप देऊन फाटक्या संसाराला ठीगळ लावणाऱ्या मायेच्या काळजातील भाव कवी जिवंतपणे मांडतो आहे .

चिंद्यावानी फाटलेला मन
ताटवा बनून गुंडला
विचाराच्या आडोस्याला
डेरीभोवती मांडला
तरी टपून बसलेला
टोचणारा वारा घुसतोय

झाडीपट्टीतील साध्या सरळ माणसांची सामाजिक , आर्थिक स्थिती भयावह आहे . आणि त्यांच्या साध्या- भोळ्या स्वभावाचा फायदा सेठ - सावकार निरंतर घेत असतात . अशा वेळेस कवी आपल्याच माणसांना 'अडाणचोट' म्हणून प्रसंगी शिव्या सुद्धा देतो .

जिमिन नामिक कनस पिकली
कनसासकट माणसं विकली
कसा सुटला दलालाईचा लोट
चिवड्यापुरता तुले ठेवला
कसा रायलास अडाणचोट
    
किंवा

धुपारनी ओवारुन करत बसला देव 
अजवरी लुबाडला तरी नाइ आली चेव

झाडीबोलीचे कवि लक्ष्मण खोब्रागडे म्हणजे झाडीबोली साहित्याला पडलेले एक नवे स्वप्न आहे . त्यांचा बोलीभाषेतील शब्दांचा आवाका फार अधिक आहे . किटन , इरकड , चकवा , फुटाऱ्या ,  काजरी , गउर , मारबत ,काला , तरजोड , झुरी , जोगन्या , बूडपन  , मुकन्या , रूपदेखनी , तरफड , मुलुक , ताटवा , हिवऱ्या गर्भातील इसरा असे वैविध्यपूर्ण बोलीभाषेतील शब्द 'लिपन' कवितासंग्रहातील कवितांचे शीर्षक बनवून आपले वेगळेपण पटवून देत आहेत . कवीची कल्पना उच्च कोटीची असून कवितेतील प्रतिमा वाचक रसिकांना भूलवण पाडणाऱ्या आहेत .
           साध्या सरळ आशयाच्या काही कविता वाचन करताना वाचकाच्या डोक्याला मुंग्या येऊन मनाला मुंग्या डसल्याचा भास होतो.  कवी आपली कल्पना शक्ती पणाला लाऊन बर्‍याचदा समाज व्यवस्थेविरुद्ध मेंदूला झिणझिण्या याव्यात अशा आशयाची रचना करताना दिसुन येतो .

झाकलेल्या पदरात
 पोपडे कदी असतात
 वकवकलेल्या नजरा
 मुंगीसारख्या डसतात
 दिसतात लिपलेल्या भिंती
 अजूनही उघड्यावर

        वैनगंगेच्या काठावर आणि तलावांच्या पाटावर नटून-थटून हिरव्याकंच निसर्गरम्य परिसरात माजी कष्टकरी माय माऊली हिरवा चुडा हातात घालून आपल्या घरधन्या सोबत आवताला हात धरून चालताना तिच्या हातावरचा हिरवा गोंदन बहरलेल्या निसर्गासारखा तिच्या मनाला आनंद देतो . या सजलेल्या प्रसंगाचे हिरवेगार वर्णन करताना कवी म्हणतो -


चुडा सोबते आउत हाती
कस्टकऱ्यांची सुपीक माती
गोंदनातले देऊर किल्ले
हरव्या मनाच्या बुरजावर
सजली नटली झाडी माजी
इसरा हिवऱ्या साजावर

            'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही'म्हणून खेड्यापाड्यातील तरुणांना आपला स्वाभिमान जागविण्याकरिता तसेच खर्‍या-खोट्याची जाणीव व्हावी यासाठी कवी 'पुस्तक' कवितेतून ग्रंथाचे महत्त्व पटवून देतो .

ग्रंथ फाडतो अंदार
भरे उजेड डोईत
साती असावा मायेचा
सत्य हातात माईत

            माणुसकीला सर्वांगाने लिपणारे 'लिपन' बये तू दुर्लक्षित म्हणून मायेच्या कष्टकरी व मातृत्वाचे ऋण न फेडता आपण तिला कसे दुर्लक्षित करतो , याचे हृदयद्रावक चित्रण कवीने कवितेमधून केलेले आहे .

किती पिसाल पिसाल
माज्या बयेले अजुक
गेली अरदी झिजून
हाड मोडले नाजूक

तसेच

खुटा समजून झिंज्या
बाप बागवते खाली
आदमुसी माय माजी
नाइ कस्टात थकली

     रुपखणी , गुणखणी असा बावन्नखणी असलेला 'लिपन' कवितासंग्रह 'गउर' कवितेतून खेड्यातील सासुरवाशीण स्त्रियांचे सांस्कृतिक दर्शन घडवीत , बैलपोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी मारबत हाकलताना कवी म्हणतो -

मारबत बोंबलत किती जोर जोरात धरून
कोणता फरक पडते गोस्टी घरच्या घरून

बैल भोडा महादेव रायते झुलीत सजून
नंदी निर्जीव केला मान हालवते अजून
बेगड भुलून बेगडीची येते चमकत दुरून
टीलमिलीच्या आवाजी निगे वरात घरून

      गावखेड्यातील लहान लहान गोष्टीवर कवीची सूक्ष्म नजर आहे . खोटेपणाचा आव आणून भोंदाडून खाणाऱ्या भोंदू साधू , भगताचे वर्णन ' आंगात घुमून' या कवितेत हुबेहूब केले आहे . तर 'झुरी' कवितेत वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे यासाठी झुरणी लागलेल्या बापाचे वर्णन चपखलपणे नर्मविनोदी भाषेत सुंदर केले आहे . काही प्रमाणात नर्मविनोद करणे हा कवीचा स्थायीभाव असावा , असे दिसून येते . 'जोगन्या' कवितेत कवी म्हणतो -

सपनातल्या फेसात इरुन गेली साबन
कुर्चीच्या जोगन्या लागल्या तरफडे बबन

      सृष्टीचे गीत गाणारी 'प्रीतपसारा' ही सर्वांगसुंदर कविता- 
प्रितपसारा अनुभवताना पावसाच्या धारा झरझरणारा आनंद देतात . तर मातीला सुटलेला गंध मनाला बेधुंद करून सोडतो . मातीच्या गर्भात पेरलेले सपन मिरगाच्या पावसाने पूर्ण होताना पाहून शेतकऱ्याच्या घामाला सुद्धा कस्तुरीचा सुगंध सुटलेला आहे . आणि पाना कोंबातून हिरवे सपन फुलून धरणीमाय आणि कष्टकरी शेतकऱ्यांची घरधनीन दोघेही हिरवा पातळ नेसून सजल्या आहेत . असा सर्वांगसुंदर प्रितपसारा लक्ष्मण खोब्रागडे यांनी उभा केला आहे .

अकाडात सरावनी पावसाच्या धारा
सुटे मातीला सुवास वाहे थंड वारा

नाचते बेहोस मनी पिसाऱ्यात मोर
धनी येकटा सेतात हाकलत ढोर
पान कोंबात फुटले हिवराकंच मारा
सुटे मातीले सुवास वाहे थंड वारा

            प्रेयसीच्या आगमनाने झालेला खेड्यातील प्रेम वेड्या तरुणाचा कल्पनाविलास कवीने 'कल्पना'कवितेत लीलया रेखाटलेला आहे .

रिता होतो मनातून जवा तू आलीस
कारजाच्या ठोक्याला कल्पनेचा पालीस

           याचबरोबर म्हातारपणात येणारी अगतिकता 'बूडपन' या कवितेतून मनाला भिडणारी आहे . पण बापाला नंदादीपाची उपमा देऊन कवी म्हणतो-

अंदार वादराचा कदी वाटला न ताप
नंदादीप आयुस्याचा झिजतो रे बाप

       कवी लक्ष्मण खोब्रागडे यांनी 'लिपन' कवितासंग्रहातून समाजमनाचे प्रत्येक कोपरे उकलून पाहिले आहे नव्हे तर समजून उमजूनच प्रत्येक घटकांची उकल केलेली आहे. यात 
 स्वातंत्र्याचा होम मांडणारे बापू , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीतील माय रमाई , गनपतीचा काला आणि आपले सगळे सगे सोयरे ज्यांच्याशिवाय जगणेही अशक्यच अशा घटकांचा अंतर्भाव केलेला आहे.

सावरा गोंधड । कुना मनु माजे ।
सोसवेना वजे । दुराव्याचे ।।

कुना मनु माजे । सगेस सोयरे ।
उगीस घाबरे । संकटात ।।

              मानवजातीच्या प्रत्येक खपलीत कवीने लिपन भरण्याचे काम केले आहे . बावन्नकशी अशा या कवितासंग्रहात साहित्यातील नानाविध रसांसोबत खेड्यातील मूरसणाऱ्या देखण्या स्त्रीचे वर्णन श्रुंगाररसात मुसमुसणारे केलेले आहे .

लचक मारे कमरेचा हिसका
नारीच्या नकऱ्यात बसे ठसका
               
किंव्हा

झाले रुदयाचे पानी तुज्या डोर्‍यात तराना
किती नजर नसिली नजरेत घुसताना
असा होऊन दिवाना कसा उडला जमाना
करी घावेल साजनी तिने सादला निस्याना

          एकंदर सर्वच क्षेत्रात कवीची लेखनी झाडीबोलीच्या दिमाखदार शब्दफुलांनी नजाकतीसह बहरून आलेली आहे . कवी लक्ष्मण खोब्रागडे स्वतःच्या मर्यादा आणि जगरहाटीचा येणारा अनुभव यांची सांगड घालण्यात सक्षम आहेत . झाडीबोलीविषयी त्यांचे सर्वश्रुत असलेले प्रेम अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा लिपन कवितासंग्रह अवश्य वाचावा . झाडीबोली भाषेतील अनेक अशा साहित्य संस्कृतीमध्ये 'मोरगाडकार' म्हणून प्रसिद्ध असलेले कवी लक्ष्मण खोब्रागडे लिपन कवितासंग्रहामधुन सुद्धा आपला ठसा उमटवतील , यात शंकाच नाही . समाजाला उदात्ततेने शब्दांचे दान देऊन झाडीबोलीचा गौरव वाढविणाऱ्या कवीला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन ।

*प्रा. विठ्ठल चौथाले*
        चामोर्शी
जिल्हा- गडचिरोली

Post a Comment

0 Comments