‘वंदे मातरम चांदा’ तक्रार निवारण यंत्रणा जिल्ह्यात कार्यरत ! 'Vande Mataram Chanda'
चंद्रपूर (का. प्र. ) : तक्रारी व अर्ज घेऊन एखाद्या कार्यालयात "खेट्या" मारणे नागरिकांसाठी नविन बाब नाही. परंतु सर्वसामान्यांना आता शासकीय कार्यालयातून या "खेट्या"पासून उसंत मिळणार असून चंद्रपूर येथे कोणतीही तक्रार किंवा अर्ज हा ऑनलाईन करता येणार असून ‘वंदे मातरम चांदा’ तक्रार निवारण यंत्रणा जिल्ह्यात कार्यरत करण्यात आली आहे.
शासकीय कार्यालयातील प्रलंबित अर्ज व तक्रारींच्या आधारे कार्यालयाची गुणवत्ता निश्चित होण्यासाठी तसेच नागरिकांना शासनाच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण होण्याकरिता व तक्रारीचे जलद गतीने, सोयीस्कर व प्रभावी निवारण करण्याकरिता ‘वंदे मातरम चांदा’ तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तक्रार नोंदविण्याकरीता टोल फ्री क्रमांक आणि पोर्टल या दोन्ही बाबींचे उद्घाटन करण्यात आले आहे. चंद्रपूर चे पालकमंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्या संकल्पनेतून हि तक्रार निवारण प्रणाली राबविण्यात येत असून याची निर्मिती जिल्हा माहिती कार्यालय यांनी चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात केली आहे.
महिनाभरात कोणत्या विभागाशी संबंधित कशा प्रकारच्या तक्रारी येतात, त्याची पडताळणी करावी. या यंत्रणेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व टीमला संवेदनशील राहणे आवश्यक आहे. जो विभाग वेगाने समस्यांचे निराकरण करेल, त्या विभागाचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे, यासारखे उपक्रम राबविल्यास इतरही विभागांना चालना मिळेल. सदर यंत्रणा सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यात विश्लेषण करा. तक्रारींचे स्वरूप काय आहे, ते तपासा. तक्रारी विविध प्रकारच्या येऊ शकतात, त्याचे निराकरण संवेदनशीलपणे करावे, अशा सूचना पालकमंत्री नाम. मुनगंटीवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
ही प्रणाली जिल्ह्यातील नागरिक व प्रशासन यामधील दुवा सारखे काम करेल. ‘वंदे मातरम चांदा’ ही स्मार्ट ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तयार केली असून, या अंतर्गत सर्व सरकारी विभाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका देखरेखीखाली येणार आहे. सदर व्यासपीठ लोकाभिमुख प्रशासनाच्या बाजूने काम करेल आणि शासन यंत्रणेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करेल. वंदे मातरम चांदा ही तक्रार दाखल करण्याची योजना असून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या थेट देखरेखीखाली असणार आहे.
0 टिप्पण्या