चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : 31 मार्च च्या पहिल्या टप्प्यातून आता दुसऱ्या टप्प्याकडे आपण वळत असून या काळात अधिक रुग्ण मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाकडून देण्यात येणाऱ्या या निर्देशांचे पालन करावे व घरातून बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसून सध्या फक्त 32 प्रवासी निगराणी मध्ये आहे. सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून नागरिकांनी आता तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला अलिप्त ठेवणे महत्त्वाचे असून फारच अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हजरत निजामूद्दीन परीसरात गेल्या काही दिवसात आढळून आलेल्या 39 नागरीकांची यादी प्राप्त झाली आहे.या सर्व व्यक्तींशी संपर्क साधला असून यामधील एकाच व्यक्तीने दर्ग्यातील मरगजमध्ये सहभाग घेतला आहे.इतर व्यक्ती केवळ प्रवासी आहेत.त्यांचा मरगजशी संबंध नाही ज्या एका व्यक्तीचा संबंध आहे त्याला कॉरेन्टाईन करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये 33 शेल्टर होम मध्ये 3700 वेगवेगळ्या राज्यातील नागरिक आश्रयाला आहेत. या सर्वांच्या खानपानापासून तर राहण्यापर्यंतची व्यवस्था जिल्ह्यातील विविध भागात करण्यात आली आहे. या सर्व नागरिकांनी कोणतीही काळजी न करता पुढील आदेशापर्यंत आपल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात विपुल प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध असून स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत येणाऱ्या मदतीला जिल्ह्यामध्ये महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत वितरण केले जात आहे. हे वितरण केवळ निराश्रित, बेघर, विमनस्क व ज्यांच्याकडे कोणताच आधार नाही अशा लोकांसाठी आहे. या भोजन व्यवस्थेचा लाभ गरीब गरजू आणि निराधार लोकांनाच मिळाला पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना अन्नधान्य देण्यासंदर्भात राज्य शासनाकडून 31 मार्च रोजी नवीन निर्देश प्राप्त झाले आहे. या निर्देशानुसार माहे एप्रिल 2020 मध्ये फक्त माहे एप्रिल महिन्याचे धान्य वितरित केले जाणार आहे. हे धान्य विकत घेणाऱ्या नागरिकांनाच याच एप्रिल महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत ज्यांच्याकडे अंतोदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेची शिधापत्रिका आहे अशा लोकांना प्रतिमानसी 5 किलो तांदूळ मोफत वाटप केले जाणार आहे. जे लाभार्थी विकतचे धान्य घेतील अशाच शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केल्या,जाईल याची सर्व शिधापत्रिकाधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
शिधापत्रिकेवरील अन्नधान्य घेताना एकाच वेळेस 2 पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाही तसेच 2 ग्राहकांमध्ये 1 मीटरचे अंतर राहील याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुचाकी गाड्या बाहेर पडायला लागल्यामुळे नागरिकांना आता दुचाकी गाडी सुद्धा चालविण्यासाठी परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनाच फक्त संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या पासेस वर परवानगी मिळणार आहे. त्यामुळे घराबाहेर दुचाकी सुद्धा घेऊन पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बँकेतील गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सींग राखली जाईल यासाठी पीएम किसान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात वर्गकरण्यासंदर्भात बँक आता लाभार्थ्यांना एसएमएस'द्वारे माहिती देणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची बँकेतील गर्दी टाळल्या जाईल.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे तालुकास्तरावर प्रशिक्षण सुरू:
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे तालुकास्तरावर प्रशिक्षण सुरू आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत हे प्रशिक्षण आशा वर्कर पासून तर आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक केंद्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.
0 Comments