जमेल तर तुम्ही सुध्दा,सायनामाईड द्या! श्रेष्ठ दान केल्याचा,फोटो काढून घ्या.



covid-19-कोरोना या भयावह बिमारीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिकेसारखी महासत्ता, इटली सारखा आरोग्यसंपन्न देश आज या महामारीने हैरान झाला आहे. आता तर डब्ल्यू.एच.ओ. (w.h.o.) सारखी जागतिक स्तरावरची आरोग्य संघटना या समोर हात टेकतांना दिसत आहे. बहुतेक देशांनी संचारबंदी (lock down) जाहीर केली आहे. भारतातही जवळपास एक महिन्याच्या कालावधीपासून संपूर्ण व्यवहार बंद आहे. घरातील कर्ता पुरुष घरी बसला आहे. आपआपल्या परीने शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न मध्यम- सर्वसाधारण गटातील कुटुंबात करत आहे परंतु परिवाराचे, मुला-बाळांच्या पोटापाण्याच्या विवंचनेने या सर्वसाधारण परिवारातील कर्त्या पुरुषाला ग्रासलेले आहे. शासनाने आपल्यापरीने अन्नधान्य पुरविण्याचे, कोणतेही कुटुंब उपाशी राहू नये यासाठी जेवण, अन्नधान्य व जिवनावश्यक किट वाटपाचा उपक्रम सूरू केला आहे. काही सामाजिक संस्थांनी, सेवाभावी व्यक्तींनी प्रसिद्धीची हाव न ठेवता या उपक्रमात हिरीरीने भाग घेतला, हीच भारतीय संस्कृती आहे. समाजसेवेची भान असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी ही यात पुढाकार भाग घेतला. काही औपचारिकता protocol पाळत आहेत. काही समाजकंटकांनी हा प्रसिद्धीचा स्टंट म्हणून फोटोसेशन करण्याचे उपद्व्याप सुरू केले आहे. गरिबी व गरिबांची थट्टा सुरू आहे. सोशल मीडियावर अशा फोटोची आता मोठी धूम दिसत आहे. आपल्या संस्कृतीत याला स्थान आहे कां? आपल्या जवळच्या पैशाने ही समाजसेवा होत आहे का? दुसऱ्याकडून भीक मागून स्वतःचे फोटो व्हायरल करणारी एक जमात आज बघायला मिळत आहे, आपल्या संस्कृतीला-विचाराला शोभणारी ही बाब आहे कां? याचा विचार आज या भिकार प्रवृत्तींनी करायला हवा. "उजव्या हाताने दिलेले दान, डाव्या हाताला ही होऊ न देणे" हा विचार जोपासणारी संस्कृतीत आज ही आपण जगत आहोत. काही समाजसेवी मात्र याला अपवादही आहेत. अनेक संघटना, समाजसेवी व्यक्ती कोणतीही प्रसिद्धी न करता यात सहभाग घेत आहे. गरिबांची मदत करण्यास समोर आले आहेत व येत आहेत. शेवटच्या माणूसही या जिल्ह्यात उपाशी राहू नये यासाठी झटणारे अनेक बघायला मिळतील.

काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एका रुग्णाला एक केळी देतांना एका बेनामी शेठ चा फोटो मोठ्या स्तरावर सोशल मीडियावर व्हायरल झाला. नागपूर काटोल येथील कवी सुरेश राठोड यांनी याच परिस्थितीवर आपल्या काव्याच्या माध्यमातून अत्यंत बोलक्या शब्दात अशा भिकार समाजसेवकांना आपल्या लेखणीने *अरे थूss अशा प्रवृत्तीवर....!*  अशा शब्दबाणाने झोडपले आहे. त्यांची तीच कविता आमच्या सुज्ञ वाचकांसाठी....!




अरे थूss अशा प्रवृत्तीवर....!
.............. धिक्कार .........।...
----------------------------------------------
काल सुरेश शेठ आला,
केळ देऊन गेला!
लाखमोलाचा एक,
फोटो घेऊन गेला...!!१!!

तोचं फोटो आज,
गृपवर आला!
मदत कशी करावी,
बोध देऊन गेला....!!२!!

शायनिंग इंडियामध्ये,
गरीब होनं पाप!
एक केळ देणारा तो,
शेठजी झाला बाप!!३!!

असे समाजसेवक आता,
गल्लोगल्ली झाले!
गरीब दीन दुबळ्यांना,
अच्छे दिन आले...!!४!!

जमेल तर तुम्ही सुध्दा,
सायनामाईड द्या!
श्रेष्ठ दान केल्याचा,
फोटो काढून घ्या....!!५!

अरे थूss अशा प्रवृत्तीवर,
धिक्कार स्वातंत्र्याचा!
भट भटजी शेठजी,
पुजारी पुढाऱ्यांचा..!!६!!
==========================
©कवी *सुरेश राठोड*
【काटोल-नागपूर】
 *7350739565*
 ०८.०४.२०२०
---------+-------------
---------+-------------
नुकतीच एका दैनिकाने एक गरीब वस्तीतील अन्नासाठी लाचार असलेल्या काही महिलांचे सचित्र छायाचित्रं असलेले विस्तृत वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर त्या महिलांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आलेत. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने या संकटसमयी आपले कर्तव्य बजावीत आहे. कुणी अन्नधान्याच्या वितरणाने तर कुणी आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण आपली जबाबदारी पार पाडीत आहे, कुणाचा गवगवा होत आहे तर कुणी कर्तव्य निभावून पूण्य पदरात पाडून समाजसेवा करीत आहे. प्रसिद्धीची हाव हवी पण ती गरीबाची किंवा गरीबीची थट्टा करून नको. गरीब सक्षम असतो तर गरिबी येणार्‍या संकटाचा सामना करायला शिकवते. आज लखपत्यांपासून तर अरबपतींपर्यंत चे धनदांडगे lock झाले आहेत तर down समजला जाणारा गरीब व्यक्ती आपल्या दारासमोर येऊन रोज आपला कुडा-कचरा उचलून  कर्तव्य बजावित आहे. या व्हायरस ने साऱ्यांनाच त्याचे कर्तव्य-धर्म यांची जाणीव करून दिली आहे. Lockdown च्या काळात प्रत्येकाने फक्त शेजारधर्म भी निभावला तरी कोणीही उपाशी राहणार नाही यात दुमत नाही. 

आजच्या परिस्थितीचा आपण विचार करू या. पती-पत्नी व दोन मुले असे छोटे कुटुंब असणारा परिवार खाजगी क्षेत्रात कार्यरत पतीच्या कमाईवर दोन वेळेसचे सुखाने खात आहे. अशावेळी आलेल्या या संकटामध्ये एका महिन्याचे राशन त्यांनी घरी भरून ठेवले आहे परंतु कमवता पुरुष आज lockdown मध्ये घरी आहे. अन्नधान्य रेशन दुकानातून मिळत आहे जवळ असलेली तुटपुंजी रक्कम आता पुर्ण खर्च होण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा त्याला कूटूंबासाठी लागणार्या जीवनावश्यक समजल्या जाणाऱ्या तेल, तिखट, मीठ, साखर, पत्ती, साबण अशा जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे. शेजाऱ्यांनी फक्त माझा शेजारी कोणत्या अडचणीत आहे, हे समजून शेजारधर्म ही निभावला तरी कोरोना सारख्या महाभयंकर आजाराला आटोक्यात आणण्यात देशाला अवधी लागणार नाही आणि हे फक्त आपल्याच देशात होऊ शकते, याची जाणीव या देशातील सगळ्याच देशबांधवांना आहे. पैसा किती गरजेचा व महत्वाचा आहे, हे आजच्या परिस्थितीने साऱ्यांना शिकवले आहे. दान कसे करावे याचे उदाहरण भारताचे दानशूर उद्योगपती रतनजी टाटा, अजीज प्रेमजी सारख्या  उद्योगपतींनी दाखवून दिले आहे. सेवा कशी करावी हे आरोग्य विभागातील सेवकांनी दाखविले तर कर्तव्य कसे बजवायचे हे आज पोलीस विभागाने शिकविले आहे. आधुनिकता, सुसंपन्नता, श्रीमंती हे जिवंत राहिल्यानंतर कामी येते. आजची धडपड स्वत: जिवंत राहण्यासाठी आहे.  स्वतः सुदृढ आरोग्य ठेवून जिवंत राहा व शेजाऱ्यांनाही सुदृढ   ठेवा हा संदेश घेऊन बहुतेक हा व्हायरस संपूर्ण जगात पसरला आहे. आज प्रत्येकाला यातून काहीतरी शिकायचे आहे व नवा सूसंस्कृत समाज घडवायचा आहे हेच समजून पुढची वाटचाल करू या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या