MPSC परीक्षा उत्तीर्ण पोलीस कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित !



  • 1285 पोलिस कर्मचाऱ्यांना पीएसआय होण्याची प्रतिक्षा !
  • पगार तोच चालेल, हक्काची पदोन्नती द्या, सरकार ला कळकळीची विनंती!

आम्ही पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालो. आमच्या अर्ध्या अधिक सहकाऱ्यांना पीएसआय म्हणून पदोन्नतीसुद्धा मिळाली. मात्र, उर्वरित पोलिस कर्मचाऱ्यांना अद्याप पदोन्नती मिळाली नाही. आम्हाला आहे त्याच पदाचा पगार चालेल; पण आमच्या हक्काची पदोन्नती आम्हाला द्या, अशी विनवणी पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. एका शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देऊन न्यायाची अपेक्षा केली आहे.

चंद्रपूर : मागील काही वर्षांपासून एमपीएससी ची परिक्षा उत्तीर्ण होऊन ही जवळपास 1285 पोलिस कर्मचारी पीएसआय पदोन्नतीपासून वंचित असल्याची बाब समोर आली आहे. स्व. आर.आर. पाटील गृहमंत्री असतांना हे पोलिस कर्मचारी ही परिक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर सरकार बदलली, नवे गृहमंत्री आले परंतु पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीकडे दुर्लक्ष झाले. आत्ताचे गृहमंत्री नाम. अनिलजी देशमुख हे सुद्धा राष्ट्रवादी काॅंग्रेसचेच गृहमंत्री आहेत, त्यांनी या बाबींकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, या आशयाचे निवेदन नाम. देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना रा.काॅं.क्री. सेल द्वारे देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे देशाची सद्यस्थिती बघता हक्काची पदोन्नती द्या, आहे त्या पुर्वीच्या पगारावर सुद्धा काम करण्याची तयारी असल्याचे नुकतेच एका शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देऊन न्यायाची अपेक्षा केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, पदोन्नती आणि सेवानिवृत्तीमुळे राज्य पोलिस दलात जवळपास १५
हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑगस्ट २०१६ मध्ये ८२८ पदासाठी पोलिस उपनिरीक्षकांची जाहिरात काढली होती. या परीक्षेत राज्यातील जवळपास ३०
हजार उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. तर यामध्ये २९०३ उमेदवार लेखी आणि मैदानी चाचणी उत्तीर्ण झाल्याचा अहवाल एमपीएससीने दिला होता. या उमेदवारांपैकी १६२८ उमेदवारांना पहिल्या टप्प्यात पदोन्नती देत पीएसआय बनविण्यात आले होते. तर उर्वरित १२८५ पोलिस कर्मचारी पीएसआय पदोन्नतीच्या दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरले होते. मात्र, चार वर्षांपासून ते कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. कोरोनासारख्या महामारी दरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांनी प्राणाची बाजी लावून कर्तव्य पार पाडले आहे. बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यासाठी पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांची उणीव भासत आहे. नव्याने पदभरती होणे शक्य नसल्यामुळे पीएसआय पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या १२८५ पोलिस कर्मचाऱ्यांना लगेच पदोन्नती देऊन अधिकारी पद देण्यात यावे, अशी मागणी पात्र पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

२०१६ मध्ये पीएसआय परीक्षा उत्तीर्ण पोलिस कर्मचारी अद्याप पोलिस कॉन्स्टेबल पदावरच कर्तव्य बजावत आहेत. फक्त पीएसआय पदोन्नती दिल्यास कॉन्स्टेबलच्याच पगारावरही काम करण्यास कर्मचारी तयार आहेत. त्यामुळे शासनावर आर्थिक बोजासुद्धा पडणार नाही. पीएसआयची पात्रता असतानाही कॉन्स्टेबल म्हणून काम करीत असल्यामुळे मानसिक खच्चीकरण होत असल्याची खंत पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गृहमंत्र्यांनी घ्यावी दखल सध्या पोलिस विभागातील रिक्त अधिकाऱ्यांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. गृहमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे १२८५ कर्मचाऱ्यांना न्याय मिळून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. गृहमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विविध प्रकारच्या येणाऱ्या संकटामध्ये कर्तव्य बजावतांना पोलिसांवरील ताण वाढत असतो. त्यातचं आत्ताच्या कोरोना महामारीमुळे पोलिस विभागावरील जबाबदारी आणि ताण वाढला आहे. त्याची भेट म्हणून गृहमंत्र्यांकडून त्यांना ही पदोन्नती मिळेल, या अपेक्षेवर हे पोलिस कर्मचारी आहेत.

Post a Comment

0 Comments