- वृक्ष लागवड करून वसुंधरेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करूया – आ. सुधीर मुनगंटीवार
या वसुंधरेने आपल्याला भरभरून दिले आहे तिला अल्पसे देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वृक्ष लागवड करणे आहे. वृक्ष लावणे हे ईश्वरीय कार्य आहे. गेल्या 5 वर्षात राज्यातील जनता, शासकीय व निमशासकीय कार्यालये, धार्मीक व सामाजिक संस्था आदी घटकांच्या सहकार्याने वृक्ष लागवडीची मोहीम राज्यभर राबविली. आज वनमहोत्सवासह हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आहे, डॉक्टर्स डे व पोस्टल डे आहे. आजचा दिवस हा वैशिष्टयपूर्ण दिवस आहे म्हणून आजच्या दिवशी वृक्ष लागवड करून वसुंधरेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न आपण करूया, असे आवाहन माजी अर्थ व वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 1 जुलै रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे चंद्रपूर शहरातील हवेली गार्डन परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी त्यांनी वृक्षारोपण केले. चंद्रपूरच्या महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, आयुक्त राजेश मोहीते, उपायुक्त विशाल वाघ, झोन सभापती शितल गुरनुले, कल्पना बगुलकर, चंद्रकला सोयाम, देवानंद वाढई, प्रशांत चौधरी, बंडू धोतरे, महानगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, कोरोना महामारीचा सामना करताना डॉक्टर्स आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहे. ख-या अर्थाने कोरोना योध्दा म्हणून डॉक्टर्स काम करीत आहे. पोस्टमन व पोस्टल कर्मचारी सुध्दा या प्रक्रियेत आपले योगदान देत आहे. कोरोनाशी लढताना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्राणवायुची आवश्यकता आहे. हा प्राणवायु वृक्षलागवडीच्या माध्यमातुनच आपल्याला लाभणार आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. आ. मुनगंटीवार यांनी वनमंत्री असताना वृक्ष लागवडीसंदर्भात जे बहुमोल कार्य राज्यात केले आहे. त्यापासुन प्रेरणा घेवून वनमहोत्सवाचे औचित्य साधुन आम्ही महानगरपालिकेतर्फे वृक्ष लागवड करीत आहोत. हे शहर हरीत, स्वच्छ व सुंदर राहावे यादृष्टीने आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला जनतेने साथ देण्याचे आवाहन महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी यावेळी बोलताना केले.
0 टिप्पण्या