- 'घनकचऱ्याचे गांभीर्य सत्ताधाऱ्यांना नसल्याचा विरोधकांचा आरोप !
- भिम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांच्या उपोषणानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत नेमली चौकशी समिती !
- निष्पक्ष चौकशीनंतर 'कोणी-कोणी खाल्ला कचरा!' होईल निष्पन्न!
- चौकशी समितीमध्ये गडचांदूर न.प. व्यतिरिक्त अन्य कर्मचा-यांना प्राधान्य देण्याची मागणी !
गडचांदूर (वि.प्र.) आज गुरुवार दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत गडचांदूर न.प. च्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेमध्ये ठेवण्यात आलेल्या विषयसुचीमध्ये गडचांदूर च्या घनकचऱ्यातील भ्रष्टाचाराचा विषय नसल्यामुळे अनेक शंका-कुशंका होऊ लागल्या आहेत. सत्ताधारी घनकचऱ्यातील भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप विरोधक करीत घनकचऱ्यातील भ्रष्टाचाराविषयी विशेष सभा घ्यायला हवी होती, परंतु नगराध्यक्षाला घनकचऱ्याचे गांभीर्य नाही, त्यामुळे विरोधकांची विशेष सभेची मागणी अमान्य करण्यात आली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे तर विरोधकांनी विशेष सभेची मागणी नियमांत राहून केलेली नसल्याची बाब सत्ताधारी समोर करीत आहे. एकंदर घनकच-याच्या भ्रष्टाचारामुळे गडचांदूर नगर परिषद मागील काही महिन्यांपासून चांगलीचं चर्चेत राहिली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी भिम आर्मी ने जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी घनकचऱ्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी गडचांदूर न.प. समोर अत्रत्याग आंदोलन केले होते. महत्वाचे म्हणजे शिवसेना व भाजपच्या २ नगरसेवकांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला होता आणि एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण ही केले होते. ७ दिवस चाललेल्या या अत्रत्याग आंदोलनाची जिल्हास्तरावर दखल घेण्यात येवून राजुराचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून या भ्रष्टाचाराची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याचे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी महोदयांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे गडचांदूर घनकचरा कंत्राटदारांसोबत न.प. ने भ्रष्ट कर्मचारी-अधिकारी व काही जनसेवक यांची हातमिळवणी असल्याचा आरोप होत आला आहे. त्यामुळे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही घनकचरा भ्रष्टाचाराची न.प. कडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही किंवा आरोपाची चौकशी करून कंत्राटदाराला दंडित करण्याचे औदार्य ही दाखविण्यात आले नाही असा स्पष्ट आरोप गडचांदूरवासी करीत आहे. चौकशी समितीच्या चौकशीनंतर कोणी-कोणी खाल्ला कचरा!' हे समोर येईल अशी अपेक्षा गडचांदूरकर करीत आहेत.
चौकशी समितीमध्ये गडचांदूर न.प. व्यतिरिक्त अन्य
अधिकाऱ्यांना प्राधान्य द्यावे-मागणी !
गडचांदूर मधील घनकचरा भ्रष्टाचाराची राजुराचे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार आहे. या चौकशी मध्ये भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्रांची छेडछाड होवू नये याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने गडचांदूर न.प. च्या कर्मचाऱ्यांना डावलून अन्य ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा, कंत्राटदारांकडे प्रारंभापासून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन व अन्य बाबीसंबंधात कंत्राटी कामगारांच्या बयाणाला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर चे माननिय जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे करण्यात आली असून या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी झाल्यास कंत्राटदारांवर मोठा दंड आकारला जाऊ शकतो व त्याला काळ्या यादीत टाकण्यात येवून न.प. ती भ्रष्टाचारी कर्मचारी-अधिकारी यांचेबर ही गाज कोसळू शकते अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
सत्ताधारी-विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप !
गडचांदूर च्या घनकचऱ्याच्या भ्रष्टाचारासंबंधात विशेष सभा घेण्यात यावी अशी मागणी विरोधकांद्वारे करण्यात आली होती. परंतु गडचांदूरच्या प्रथम नागरिक काँग्रेसच्या नगराध्यक्षांनी या मागणीला गांभीर्याने घेतले नसल्यामुळे ही विशेष सभा घेण्याचे टाळण्यात आले. सत्तारूढ पक्षातील काही पदाधिकारी यांची न.प. तील काही भ्रष्ट कर्मचारी व अधिकारी यांचे कंत्राटदाराशी आर्थिक हितसंबंध जुळले असल्यामुळे तक्रारी, आरोप होत असतांना ही सत्ताधारी यावर गंभीर नाहीत व गडचांदूकरांच्या आरोग्याशी खेळत आहे. कोरोना बाधितांची संख्या ही गडचांदूर मध्ये धोकादायक आहे. परंतु शहरातील घनकचऱ्याच्या विल्हेवाटीचे कंत्राट असलेले कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे गडचांदूरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डेंगू-मलेरियासारख्या साथीचा रोगाचे प्रमाण याठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरला असून सत्ताधारी मात्र 'आर्थिक मलिंदा' खाण्यात मग्न असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. सर्वसाधारण सभेमध्ये विषय सुचीमध्ये हा विषय नसला तरी या गंभीर विषयावर आम्ही चर्चा घडवून आणू असे मत ही विरोधकांनी यावेळी व्यक्त केले. विरोधकांनी विशेष सभेची मागणी करतांना प्रोटोकॉल चे पालन केले नाही. एक तृतीयांश विरोधकांनी ही मागणी करायला हवी होती. शिवसेना-युती व भाजप च्या संपूर्ण नगरसेवकांनी अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. मग विशेष सभेची मागणी करताना फक्त तीन नगरसेवक व एकाच स्विकृत सदस्यांनी या मागणीवर स्वाक्षरी कशी केली? सर्वच विरोधकांनी विशेष सभेची मागणी करायला हवी होती, परंतु तसे झाले नाही. यातच खरी गोम दडली आहे. या संदर्भात आता चौकशी समिती नेमण्यात आली आहे. राजुराचे उपविभागीय अधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखालील समिती या भ्रष्टाचाराची चौकशी करणार आहे. घनकचरा कंत्राटाची सुरुवातीपासुनचं चौकशी करायला हवी. भ्रष्टाचार झाला असेल तर तो आत्ताचं झालेला नाही. तो पूर्वीपासून होत आहे, तो लपविण्यासाठी विरोधक आज या राजकीय खेळ्या खेळीत असल्याचा पावित्रा सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. गुरुवार दि. १५ ऑक्टोबर च्या सर्वसाधारण सभेमध्ये घनकचरा भ्रष्टाचारावर काय चर्चा होईल? याकडे गडचांदूरकरांचे लक्ष लागले आहे.
0 Comments