जिल्ह्यात ऑक्सिजन व आयसीयू बेड वाढविण्यावर भर द्यावा !




  • कोरोना संदर्भात आढावा बैठकीत ना.वडेट्टीवार यांचे निर्देश !


चंद्रपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात ऑक्सिजन व अतिदक्षता कक्षातील खाटा (आयसीयू बेड ) वाढविण्यावर भर द्यावा, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिलेत. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा खनिकर्म अधिकारी एस. एस. नैताम, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रु. वायाळ उपस्थित होते.

मनुष्यबळासाठी साताऱ्याच्या धर्तीवर जिल्ह्यात ई-निविदा प्रक्रिया राबवावी. सैनिकी शाळेतील चारशे बेड, व रुग्णालयातील 350 बेडसाठी लागणारे फिजिशियन, नर्स, स्वच्छता कर्मचारी व आवश्यक इतर कर्मचाऱ्यांची यादी अद्यावत करून घ्यावी. सैनिकी शाळेतील सिव्हिल कार्य येत्या दहा दिवसाच्या आत पूर्ण करावे, असे श्री. वडेट्टीवार म्हणाले.

आरोग्य विभागाला सूचना देताना श्री. वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यात 310 बेडचे काम पूर्ण झाले असून 110 ऑक्सिजन व 50 आईसीयु बेड कार्यान्वित आहेत. जिल्ह्यात स्वतःला होम आयसोलेशन करणे बऱ्यापैकी वाढलेले आहे. त्यासोबतच ब्रह्मपुरी तालुक्यात 75 बेड तयार असून लवकरच ऑक्सिजनची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात येईल त्यामुळे जवळपासचे सिंदेवाही, सावली, नागभीड ब्लॉक कव्हर होतील.

बाधितांना सेवा देताना डॉक्टर दोन तासाच्या वर पिपीई घालून कार्य करू शकत नाही. त्यामुळे योग्य ती सेवा बाधितांना देण्यासाठी दर दोन तासाने डॉक्टर बदलावे, अशा सूचना खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर यांनी प्रशासनाला दिल्यात. जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना विश्वासात घेऊन कोविड संदर्भातील उर्वरित कामे पूर्णत्वास आणावी, असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

Post a Comment

0 Comments