राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दिली जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती !



  • नागपूर विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक - 2020 !

चंद्रपूर : नागपूर विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक - 2020 चा कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित झाला आहे. यासंदर्भात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना निवडणूक कार्यक्रम व आदर्श आचारसंहितेबाबची सर्वसाधारण माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिली.

निवडणूकीची अधिसूचना 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे सुटीचे दिवस वगळून दिनांक 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. नामनिर्देशनपत्राची छाननी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर असून मतदानाची वेळ दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सुरू करण्यात येणार असून निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्याचा दिनांक 7 डिसेंबर 2020 असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राजकीय पक्षांनी सार्वजनिक सभा घेण्यासाठी संबंधीत प्रशासनाची परवानगी घ्यावी. कोरोनामुळे घरोघरी प्रचारासाठी केवळ पाच लोकांना तसेच रॅलीमध्ये देखील दर अर्धा तासाच्या अंतराने केवळ 5 वाहनांना परवानगी देण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याचे उपजिल्हाधिकारी खलाटे यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात 36 मुख्य मतदान केंद्र तर 14 सहाय्यक मतदान केंद्र असे एकूण 50 मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यात नोंदणीकृत पदवीधर मतदारांची एकूण संख्या 32 हजार 89 इतकी आहे.

उपजिल्हाधिकारी खलाटे यांनी आदर्श आचारसंहिता कालावधीत नवीन योजनांची घोषणा न करणे, शासकीय संदेश प्रणालीवरील राजकीय नेत्यांचे छायाचित्रे काढून टाकणे, शासकीय वाहनाचा प्रचारासाठी वापर न करणे, राजकीय पदाधिकाऱ्यांकडील शासकीय वाहने शासनजमा करून घेणे, कोणतेही उद्घाटन, भूमिपूजन सोहळा आयोजित न करणे यासह इतर महत्वपुर्ण बाबीवर आचारसंहिता कालावधीत काय करावे व काय करू नये यासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. बैठकीला विविध राजकीय पक्षाचे जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या