संजय मारकवारांचा मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी !



  • घातपाताची शक्यता असल्याचा आरोप !
  • कांग्रेस व भाजपाची सखोल चौकशीची मागणी !

चंद्रपूर : मूल पंचायत समिती सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व संजय गांधी निराधारचे अध्यक्ष संजय मारकवार यांचा स्वत:च्या दुचाकीने खेडी सावली रोडवर गावाकडे येत असताना अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मूल तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
संजय मारकवार त्यांच्या शरीरावरच्या जखमा पाहता घातपात झाल्याची दाट शंका आहे. याकरिता पोलिस अधीक्षकांमार्फत निष्पक्ष चौकशी लावून लवकरात लवकर छडा लावावा. करिता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चंदू पाटील, मारकवार, घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावर, अखिल गांगरेड्डीवार, पवन निलमवार, दशरथ वाकुडकर, अनिल निकेसर सरपंच, जालिंदर बांगरे सरपंच, योगेश शेरकी सरपंच, प्रदीप कांबळे, रूपेश मारकवार, महेश गायकवाड, समस्त काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व राजगडवासी उपस्थित होते.
मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान पं.स. सदस्य असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय पा. मारकवार हे (0६ डिसेंबर) रविवारी रात्रीच्या सुमारास सावली तालुक्यातील खेडी रस्त्यावर संशयास्पदरित्या जखमी अवस्थेत पडून आढळल्याने कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. परंतु शव विच्छेदनाच्या तपासणीअंती मृतकाच्या डोक्याला मागेपुढे लोखंडी सळीने मारल्याचा जखमा दिसून आल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर येत आहे. संजय मारकवार यांचे मोठे बंधू राजू मारकवार यांनी यापूर्वीच दाखल केलेल्या या तक्रारीची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मूल तालुका भाजपच्या शिष्टमंडळाने आज उपविभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
एका जागरूक आणि लोकहितासाठी नेहमी धावून जाणार्‍या लोकप्रतिनिधीची अशी निर्घृण हत्या होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. करिता, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीतर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी जि. प. अध्यक्षा संध्या गुरनुले, पं. स. सभापती चंदू मारगोणवार, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमालाताई भोयर, उपनगराध्यक्ष नंदू रणदिवे, भाजपा शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रविण मोहुर्ले, मुन्ना कोटगले, नगरसेविका वंदना वाकडे, लिना बद्देलवार, कल्पना पोलोजवार, शिल्पा रामटेके यांसह आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments