पालकमंत्री आज घेणार कोविड-१९ च्या संदर्भात आढावा बैठक !



माजी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या कोविड-१९ च्या प्रतिबंधक उपाययोजनांच्या ४५ महत्वाच्या सुचना !

चंद्रपूर (वि.प्र.) : उपचाराविना व आरोग्य विभागाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे जिल्ह्यामधील कोरोणाग्रस्तांचा नाहक बळी जात आहे. यावर निर्बंध लागावा यासाठी अनेकदा आढावा बैठका झाल्या परंतु शासकीय यंत्रणा कागदावर आणखीन काही आणि कृतीत आणखी काही अशी स्थिती आज जिल्ह्यात आहे, यावर आता तरी निर्बंध लागणे गरजेचे आहे. आज जिल्ह्यात पालकमंत्री आढावा बैठक घेणार असून माजी पालकमंत्री यांनीही जिल्हा प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणाविषयी काय तोडगा निघतो, याकडे आत्ता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यात तरी जनप्रतिनिधींनी राजकारण बाजूला सारून आलेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी एकत्रित यावे, अशी अपेक्षा जिल्हा वासियांना अपेक्षा आहे.

आज मंगळवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार नागपूर येथून येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत कोविड-१९ संदर्भात उपाययोजना व नियोजनावर चर्चा करणार असून सिंदेवाही व ब्रम्हपूरी येथे ही पालकमंत्री कोविड-१९ संदर्भात आढावा घेणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अपुरे बेड, ऑक्सिजन ची कमतरता यामुळे कोरोना बाधितांना आपल्या जिवाला मुकावे लागत आहे. महत्वाचे म्हणजे याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लोकलेखा समितीचे अध्यक्ष आम.सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवार दि. १९ रोजी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नांवे ७ पानांच्या ४५ सुचनांचे निवेदन दिले असून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चाचणी, जनजागरण, लसीकरण या त्रिसुत्रीची अंमलबजावणी करण्यात यावी, अश्या सुचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मागील काही दिवसांपासुन कोरोना चा विस्फोट चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. चार आकडी संख्येमध्ये कोरोना बाधित रोज जिल्ह्यात मिळत असून मृतकांची संख्या ही घातक आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठे उपचाराविना तर कुठे ऑक्सिजनविना नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहे, त्यामुळे चंद्रपूरजिल्हावासियांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. मागील दोन दिवसांमध्ये बस आवारात, अॅम्बुलन्समध्ये, खाजगी चार चाकी वाहनांमध्ये कोरोनाबाधितांना बेड न मिळाल्यामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. आत्तापावेतो जिल्ह्यात ५५० च्या जवळपास मृत पावलेले आहे. कोरोना रूग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी मागणी जोरकसपणे होवू लागली आहे तर राज्य स्तरावरील राजकारणात होणाऱ्या टिका-टिप्पणीमुळे नागरिक वैतागले असून त्यांचा रोष जनप्रतिनिधींवर निघत आहे. त्या अनुषंगाने विद्यमान पालकमंत्र्यांनी कोरोना आढावा संदर्भात आयोजित केलेली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक व त्याच पुर्वसंध्येला माजी पालकमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला केलेल्या सुचना यावर आता जिल्हा प्रशासनाकडून काय पाऊल उचलले जाते, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. राज्यात कोविड-१९ वरून सुरू असलेल्या राजकीय मल्लयुद्ध थांबवून जिल्ह्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा हवालदिल झालेले सामान्य नागरिक करू लागले आहे.


Post a Comment

0 Comments