Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

नियमांना डावलून 'अर्थ'पूर्ण रित्या वाटले दारू परवाने ?
दारबंदी विभागाचे 'माल'सुताऊ धोरणाची चौकशी व्हायलाचं हवी!
चंद्रपूरातील जगन्नाथ बाबा नगरातील दारू भट्टी व बियर शॉपीच्या विरोधात नागरिकांत रोष !

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील जगन्नाथबाबा मठासारख्या पवित्र श्रद्धास्थळावरील चौकात राम सेतू पुलालगत नवीन देशी दारुभट्टी व बियर शॉपीला परवानगी देण्यात आली आहे. या दारु दुकानाला परवानगी देणा-या जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात जनविकास सेनेचे व मनपाचे नगरसेवक पप्पु देशमुख आणि उपमहापौर राहूल पावडे यांच्या नेतृत्वात नागरिक आपला रोष व्यक्त करीत आहे. विविध प्रकारचे आंदोलन, भजन आंदोलन च्या माध्यमातून राज्य उत्पादन विभाग व जिल्हा प्रशासनावर हा रोष व्यक्त केला जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटविल्यानंतर 'जैसे थे' या तत्त्वावर जुने परवाने नूतनीकरण करण्याची मंजुरी मंत्रिमंडळाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिली होती. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र क्रमांक एमआयएस ११२०२१/९१/ सात दि. १ में २०२१ नूसार अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर दारू परवाने नुतनीकरणासंदर्भात निर्देश देण्यात आले होते, त्यात स्पष्टपणे महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ व शासन आदेश व परिपत्रक ०८/०६/२०२१ च्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे नमुद करण्यात आले आहे.सोबतचं अनुज्ञप्तीधारक विनंती करतील त्यांच्या अनुज्ञप्त्या दि. ३१.०३.२०१५ रोजी जिल्ह्यात जिथे कार्यरत होत्या त्याच जागेवर "जैसे थे" तत्वावर सन २०२१-२२ चे नुतनीकरण करण्यात यावे, अशा परवाना धारकाची प्रस्तावित जागा ही दि. ३१.०३.२०१५ रोजी कार्यरत असलेल्या मंजुर जागाच असल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय निरीक्षक व अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूरांचीच राहील, असेही नमुद करण्यात आले होते. परंतु आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक जुनी दुकाने नवीन ठिकाणी स्थानांतरित झाली आहेत तर अनेक नवीन दारूची दुकाने थाटण्यात आली आहे.


नुतनीकरणासाठी आलेल्या संपूर्ण अर्जाची त्वरित संबंधित निरीक्षकांनी आवश्यक ती चौकशी व मुळ मंजुरी जागेची नकाशाप्रमाणे व नियमानुसार असल्याची पडताळणी करून त्याचप्रमाणे सर्व पडताळणी व प्रमाणित स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल अर्ज सादर करावा. अपूर्ण अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध तात्काळ आवश्यक कारवाई करण्याची दक्षता संबंधित जिल्हाधिकारी व अधिक्षकांनी राहील असे आदेशात नमुद आहे.

अनेक ठिकाणी दारु दुकाना संदर्भात ज्या ठिकाणी दुकाने लागली आहेत त्या परिसरातील लोकांच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्या होत्या परंतु त्यावर कोणतीही कारवाई किंवा साधी चौकशी ही करण्यात आली नाही.

निर्देशित नियमांना दारुबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संधीला 'माल' सुतविण्याची नामी संधी समजून नियमांना डावलून जिल्ह्यातील अनेक दारू दुकानांचे नियमबाह्य रित्या "देवाणघेवाणी"तून नूतनीकरण केले. त्याबद्दलच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात व राज्य उत्पादन विभागात विविध संघटना, स्वयंसेवी संघटना यांच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या परंतु त्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली.
आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थान, देवस्थान, गर्दीची ठिकाणे असलेली दारू दुकाने यासंबंधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा अनेक दारू दूकानांचे परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरणासाठी कागदोपत्री योग्य ठरविण्यासाठी चार अंकी 'आकड्या' ची ही कमाल आहे, असे आता बोलल्या जात आहे.
विशेष बाब म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक म्हणून सागर ढोमकर हे पूर्वी कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागातून जिल्ह्यातून बदली झाली व त्यांच्या जागी नवीन अधीक्षक या ठिकाणी कार्यरत झालेत परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये निरीक्षक म्हणून असलेले जुनेच अधिकारी कार्यरत होते व 'जुने ते सोने' या धोरणाचा दारू व्यावसायिकांनी अवलंब करीत दारू दुकानांचे परवाने ची ‘खैरात’ स्वतःच्या पदरी पाडून घेतली. जिल्ह्यात दारूबंदी हटविल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या संपूर्ण तक्रारीची उच्चस्तरीय चौकशी केल्यास दारू दुकानांच्या नूतनीकरणाचे मोठे घबाड, करोडोंची झालेली उलाढाल याचा नक्कीच पर्दाफाश होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागात केलेल्या तक्रारी माहिती अधिकाराचा अर्ज याच्यावर कोणतीच दखल घेण्यात आली नाही, दारू परवाने नूतनीकरणासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती मागीतल्यानंतर "हा विषय आमच्या विभागाशी संबंधित नाही." असे पत्र या विभागातून अनेकांना मिळाले आहे.

चंद्रपूर शहरामध्ये जगन्नाथ बाबा नगर येथील देशी दारू दुकान, बिअर शॉपी याबद्दल उसळलेला जन आक्रोश बघता हा प्रश्न फक्त एका वार्डातील किंवा एका शहरातील नसुन संपूर्ण जिल्ह्याचा आहे याचा विचार करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जगन्नाथ बाबा नगरातील देशी दारू दूकान व बियर शॉपी यांनी त्यांच्या विभागाला सादर केलेली कागदपत्रे सार्वजनिक करून पारदर्शकतेचा पुरावा द्यायला हवा. राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी जिल्ह्यातील दारू दुकानांचे बोगस कागदपत्राद्वारे करण्यात आलेल्या नूतनीकरणाची उच्च स्तरावर चौकशी समिती नेमुन योग्य ती चौकशी करायला हवी व नियमबाह्य दुकानांचे परवाने नूतनीकरण करणाऱ्या व स्थानांतरण करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करायला हवी.

Post a Comment

0 Comments