मोहुर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वातील चमुने दाखविले माणुसकीचे दर्शन !!
चंद्रपूर (वि. प्रति. )
शासकीय पगार मिळतो म्हणुन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारे अनेक अधिकारी-कर्मचारी असतात. परंतु माणुसकी जोपासत एखादे कर्तव्य पार पाडणारे क्वचितचं बघायला मिळतात. असेच माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना मोहुर्ली वन परिक्षेत्रात घडली.
हिंस्त्र प्राण्यांचे वास्तव्य असलेल्या मोहुर्ली च्या जंगलात ३१ डिसेंबर २०२२ ला एक मानसिक अवस्था ठिक नसलेली व्यक्ती काही पर्यटकांना दिसली. त्या पर्यटकांनी याची माहिती मोहुर्ली वनपरिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना दिली. संतोष थिपे यांनी लगेच एक पथक बनवुन त्या वेडसर व्यक्तीचा घनदाट जंगलात शोध घेण्यास प्रारंभ केला. हा वेडसर इसम पथकाला बघून पुन्हा जंगलात पळून जात होता. वाघ, बिबट, अस्वल यासारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर असलेल्या मोहुर्ली जंगलात पथकाला पाहुन पळून जाणाऱ्या त्या वेडसर इसमामुळे वन विभागाच्या पथकाचा तणाव वाढत होता. अखेर वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांचे नेतृत्वातील वनपाल संजय जुमडे, वनरक्षक सुरेंद्र मंगाम, वनरक्षक आकाश राठोड, वनरक्षक विखुल जनबंधु आणि वनमजूर यांना मदत म्हणून पोलीस पाटील रामकृष्ण साखरकर, राजू दशरथ ढवळे यांच्या सहकार्याने बनविण्यात आलेल्या शोध पथकाने रात्रं-दिवस शोध मोहिम राबवुन मंगळवार दि. ३ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ४ वाजता राजेश चरणदास मेश्राम (४८), रा. मोहुर्ली यास पकडून त्याच्या कुटूंबांच्या स्वाधिन केले. हिंस्र प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असलेल्या मोहुर्ली जंगलात वेडसर इसमासाठी रात्रं-दिवस शोध मोहिम राबवून त्याला पकडून कुटूंबाच्या स्वाधिन करणे म्हणजे अद्याप मानवता जिवंत आहे हे दर्शविणारी ही घटना संतोष थिपे यांच्या चमुने पार पाडली, त्यांच्या चमुचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्र शासन वनविभागातर्फे वन्य प्राण्यापासून जीवितहानी झाल्यास मृतकाच्या कुटूंबाला लवकरात लवकर अर्थसहाय्य मिळावे यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात "वनविभागाचा मदतीचा हाथ" हि मोहीम राबविली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी वेडसर इसमासाठी राबविलेली शोध मोहीम हा वन विभागाचा अनोखा प्रयोग ठरला आहे या शोध मोहिमेमुळे वन विभागाची प्रतिमा नक्कीच उंचावली आहे.
संतोष थिपे आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. वनविभागातील त्यांच्या उत्कृष्ट कार्य प्रणालीमुळे नुकतेच त्यांचा वनविभागाकडून सन्मान ही करण्यात आलेला आहे. कर्तव्यासोबतचं माणुसकी जोपासत निष्ठेने आपले कार्य करित राहणारे स्थानिक गडचांदूर येथील संतोष थिपे हे चंद्रपुर जिल्ह्यासाठी व वनविभागासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. यापुर्वी ही कर्तव्यावर असतांना वाघाशी त्यांनी फक्त काठीने सामना केला होता. त्यावेळी ही ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते.
1 Comments
खूप छान. अशा लोकांमुळेच हे जग टिकून आहे. श्री संतोष थिपे ह्यांच्या कार्याला मानाचा मुजरा.
ReplyDelete