रोजंदारीवरील मजूर, बेघर, शहरी स्थलांतरितांना करोनामुळे दिल्लीत काम नसल्याने दोन वेळच्या जेवणाची वानवा होऊ लागली आहे. अशा दिल्लीतील लाखो गरिबांना मोफत जेवण देण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी शुक्रवारी जाहीर केला. २१ दिवसांच्या टाळेबंदीत लोकांना खाद्यान्न मिळण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना केली आहे.
रोजच्या जेवणाचीच भ्रांत पडल्याने शेकडो मजूर पायी आपापल्या गावी निघाले आहेत पण, अनेक मजुरांनी तेही शक्य नसल्याने त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गरिबांसाठी २३४ तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये जेवणाची मोफत सुविधा देण्यात आली असून शनिवारपासून २२५ सरकारी शाळांमध्ये ही सविधा उपलब्ध केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली सरकारने दररोज २० हजार लोकांना मोफत जेवण पुरवले आहे. शुक्रवारी ही सुविधा २ लाख लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. शनिवारपासून ४ लाख गरिबांना दोन वेळचे जेवण मोफत दिले जाणार असल्याची माहिती अरिवद केजरीवाल यांनी दिली.
वेगवेगळ्या राज्यांमधून लोक दिल्लीत येऊन रोजंदारीवर काम करतात. टाळेबंदीमुळे त्यांच्याकडे काम नाही, पसाही नाही. या सर्व मजुरांना जेवण देण्याची जबाबदारी दिल्ली सरकारची असून ती पूर्ण केली जाईल. प्रत्येक शाळेमध्ये किमान ५०० लोकांना दोन वेळा जेवण दिले जाईल. धार्मिक संस्था, खासगी संस्था, नागरी संघटनांच्या माध्यमांतून दिल्लीतील गरीब उपाशी राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे केजरीवाल म्हणाले.
प्रतिदिन एक हजार नव्या रुग्णांसाठी सज्जता
करोनाच्या साथीने तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला तर मात्र करोनाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू शकते. हे लक्षात घेऊन दिल्ली सरकारने ५ डॉक्टरांच्या गटाने कृती आराखडा तयार केला आहे. प्रतिदिन एक हजार नवे रुग्ण आले तरीही त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दिल्ली सरकार सज्ज असेल, असे केजरीवाल यांनी सांगितले. परिस्थिती गंभीर बनत गेली तर त्याचा सामना कशारीतीने करायचा याचा आढावा घेण्यात आला आहे. प्रतिदिन १०० नवे रुग्ण आले, त्यांची संख्या प्रतिदिन २०० झाली, समजा ती ५०० रुग्णांवर गेली तर प्रत्येक टप्प्यामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणती व्यवस्था केली पाहिजे याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. दिल्लीत आत्तापर्यंत करोनाबाधितांची संख्या ३९ झाली असून त्यातील ६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
0 Comments