✨ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासन सक्त
✨ पालकमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
✨ 40 आरोग्य कर्मचाऱ्यांची चमू सक्रिय
✨ रुग्णाच्या कुटुंबीयांचे नमुने तपासणीसाठी
✨ रुग्ण नोकरी करत असलेले अपारमेंट सील
✨ इलाज केलेले डॉक्टर होम कॉरेन्टाइन
✨ 7 किमीच्या बफर झोनमध्येही तपासणी
चंद्रपूर दि. ३ मे : चंद्रपूर महानगरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर काल रात्रीपासून प्रशासनाने कृष्ण नगर संजय नगर दर्गा वार्ड सील केले आहे. रात्रपाळीतील चौकीदार म्हणून काम करत असलेल्या इमारतीतील 6 कुटुंब होम कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. कुटुंबातील अन्य तीन सदस्यांचे स्वॅब नमुने तपासणीला पाठविण्यात आले असून अडीच हजार कुटुंबातील परिसरात 10 हजार लोकांची दुपारपर्यंत तपासणी करण्यात आली आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन ,आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी देखील चार वाजता जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्ण नगर परिसरातील एक रुग्ण काल पॉझिटिव्ह आला आहे. 1 मे रोजी छातीमध्ये दुखत असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निमोनिया सारखे लक्षणे असणाऱ्या या रुग्णाचे स्वॅप 2 मे रोजी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 3 मे रोजी हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्यानंतर रुग्ण रहात असलेल्या कृष्णनगर, संजय नगर,दर्गा वार्ड, आदी 1O हजार लोकसंख्या वस्तीतील अडीच हजार कुटुंबाची आज सकाळी ७ वाजता पासून दुपारी २ पर्यंत 40 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चमूने तपासणी केली आहे. पुढील 14 दिवस दररोज या भागात तपासणी करण्यात येणार असून प्रत्येक चमूच्यामागे एक डॉक्टर काम करणार आहे. या परिसरात येण्या-जाण्याचा फक्त एकच मार्ग सुरू असून ॲम्बुलन्स वगळता कोणतीही वाहने आतमध्ये जाऊ दिले जात नाही. या परिसरात कंटेनमेंट प्लन सुरू करण्यात आला आहे. यासोबतच या परिसराच्या बाहेरील 7 किलोमीटर परिसरातील सर्व भाग बफर झोन म्हणून संबोधित करण्यात आला असून या ठिकाणी देखील पुढील 14 दिवस ताप व आजाराबाबतची माहिती गोळा केली जाणार आहे. या परिसरातील चौकशी मोहिमेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाच्या कुटुंबात त्यांच्यासह चार सदस्य असून पत्नी व दोन मुलांचे देखील नमुने घेण्यात आले आहे. उद्या सायंकाळपर्यंत त्यांच्या नमुन्याचा अहवाल येणार आहे. शिवाजीनगर परिसरात एका अपार्टमेंटमध्ये रात्रपाळीतील चौकीदार म्हणून हा रुग्ण काम करत होता. रात्री १० ते सकाळी ६ या काळात सुरक्षारक्षक म्हणून तो कार्यरत असायचा. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सहा कुटुंबातील 28 लोकांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. पाचव्या दिवशी या 28 नागरिकांचे नमुने घेण्यात येणार असून तपासणीला वैद्यकीय नियमानुसार पाठविण्यात येणार आहे.
23 एप्रिल पासून त्याला ताप जाणवत होता. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याला आयसोलेशन वार्ड मध्ये विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णावर ईलाज केलेल्या काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे . सोबतच या रुग्णाच्या प्रवासाचा मागोवा घेतला जात आहे. तथापि, गेल्या पंधरा दिवसांपासून चंद्रपूर बाहेर तो गेलाच नसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात एक वैद्यकीय चमू गेल्या पंधरा दिवसात हा रुग्ण कुठे कुठे गेला होता या संदर्भातली चाचपणी करत आहे.
दरम्यान आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार सर्वेक्षण अधिकारी सुधीर मेश्राम यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी ४ वाजता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला. हा संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 मे रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 125 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील 117 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 106 नमुने निगेटिव्ह निघाले असून १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 10 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 34 हजार 900 आहे. यापैकी 2 हजार 672 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 228 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 216 आहे.
0 टिप्पण्या