आरोग्य सेतू अॅप कुणी तयार केला?  • केंद्रीय सूचना आयोगाचीे एनआयसीला नोटीस !

  • आरटीआयच्या अर्जाचे स्पष्टपणे उत्तर का देण्यात आलेले नाही?

नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी लोकांकडून वापरात असलेले आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरकारकडून यांनी जनतेला आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास प्रोत्साहन दिलेले आरोग्य सेतू हे मोबाईल अँप नेमके बनविले कुणी? असा प्रश्न केंद्रीय सूचना आयोगाने मंगळवारी उपस्थित केला. कोट्यवधी लोकांची माहिती गोळा करणार्‍या आणि मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अँपबद्दल टाकण्यात आलेल्या आरटीआयच्या अर्जाचे स्पष्टपणे उत्तर का देण्यात आलेले नाही? असा प्रश्नही केंद्रीय सूचना आयोगाने विचारला.

आरोग्य सेतू अँपच्या वेबसाईटवर केलेल्या उल्लेखाप्रमाणे हे अँप नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर आणि आयटी मंत्रालयाने डेव्हलप अर्थात तयार केले होते. परंतु, याच संदर्भात आरटीआयद्वारे विचारण्यात आलेल्या एका अर्जाला उत्तर देताना मात्र आपल्याकडे अँपच्या डेव्हलपमेंटबद्दल माहिती नाही असे अजब उत्तर एनआयसीने दिले. त्यानंतर केंद्रीय सूचना आयोगाने एनआयसीला कारणे दाखवा नोटीस धाडली.

आरोग्य सेतू अँपच्या वेबसाईटवर नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरचे नाव आहे. असे असेल तर अँपच्या डेव्हलपमेंटबद्दल कोणतीही माहिती एनआयसीकडे का नाही? असा प्रश्न केंद्रीय सूचना आयोगाने एनआयसीला विचारला. आयोगाने या संदर्भात अनेक चीफ पब्लिक इन्फॉर्मेशन अधिकार्‍यांसहीत नॅशनल ई-गव्हनर्ंस डिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना तंत्रज्ञान मंत्रालय आणि एनआयसीला कारणे दाखवा नोटीस धाडली आहे. कोरोना संक्रमणादरम्यान कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी वापरण्यात येणार्‍या या अँपच्या वापराला मोदी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात आले होते. इतकेच नाही तर रुग्णांना तसेच लॉकडाऊन काळात प्रवाशांना हे अँप अनिवार्य करण्यात आले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करण्याची विनंती केली होती.

Post a Comment

0 Comments