"हादसा'" बनके बाजार में आ जायेगा ! जो नहीं होगा वो "अखबार" में आ जायेगा !!




चंद्रपूर (वि.प्रति.)

"हादसा" बनके बाजार में आ जायेगा।
जो नहीं होगा वो "अखबार" में आ जायेगा।।
चोर, उचक्कों की करो कद्र।।
न जाने कोन कौनसी सरकार में आ जायेगा ।।

प्रसिद्ध शायर डॉ. राहत इंदौरी यांचा हा प्रसिद्ध "शेर" जिल्ह्यात सद्यस्थितीत घडणाऱ्या घटनांना (हादसा) तंतोतंत जुळणारा आहे. माध्यमांमधून जिल्ह्यात रोजचं लाखोंची दारू मुद्देमालासह पोलिस विभागाच्या जाळ्यात आल्याचे वृत्त वाचणात येते, परंतु आरोपी मात्र "फरार" राहतात, हे रोजचं होऊन बसलेले आहे. हे "कोड" सुटता सुटेना. वाहन चालकांना अटक करून लाखोंचा दारूसाठा पोलिस मालखान्या(?)'त जमा केला जातो. "मोहऱ्यां"ना ताब्यात घेऊन "उदोउदो" करणाऱ्यांचे हात "म्होरक्या"पर्यंत कां पोहोचू शकत नाही ? हा यक्षप्रश्न जिल्हावासियांसमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यात मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात हत्या झाल्यात-घडल्यात. मनोज अधिकारी, सुरज बहुरिया, राजु यादव, घुग्घूस येथील शुभम फुटाणे सारख्या हत्यांनी चंद्रपूरकरांना हादरवून सोडले. दारू, कोळसा यासारख्या व्यावसायिक स्पर्धेतून वर्चस्वाच्या लढाईसाठी यातील काही हत्या झाल्याचे सांगण्यात आले, तसे वृत्त ही झळकलेत. आरोपींना ताब्यात घेऊन ही तपास यंत्रणांच्या हाती मात्र "भोपळाचं" लागला. समाजसेवक मनोज अधिकारी, अभियांत्रिकी चा विद्यार्थी घुग्घूस चा शुभम फुटाणे यांच्या हत्येचे मुळ कारण अद्याप ही जिल्ह्यातील पोलिसी तपास यंत्रणेला कळू शकले नाही, याला काय म्हणायचे ? जिल्ह्यात दारू, कोळसा, रेती, बंदी असलेला सुगंधित तंबाखू याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. पैशाच्या लालसेने या व्यवसायात अनेक अपराधी प्रवृत्तींनी प्रवेश केला आहे. "साखळी" च्या माध्यमातून हे व्यवसाय जिल्ह्यात सुरू आहेत. मुद्देमालासह लाखोंची दारू रोजचं जिल्ह्यात पकडल्या जाते. दारू पुरवठा करणाऱ्या मुख्य "म्होरक्या"च्या मुसक्या आवळण्यात संबंधित विभाग मात्र "ढेप'" खात आहे, हे त्रिकाल सत्य आहे. लाखोंची दारू काही दिवसानंतर नष्ट करण्यात येते, पकडलेला मुद्देमाल ही सुपूर्दनाम्यावर न्यायालयातून सोडविला जातो. तस्करांना दारू तस्करी करण्यास पुन्हा "रान" मोकळे आहे. कोणत्याही रेती घाटांचा लिलाव झालेला नसून ही मोठ्या प्रमाणात रेती तस्करी जिल्ह्यात सुरू आहे. संबंधित विभागांकडून काही प्रमाणात रेती चे वाहन पकडल्या जाते, त्यावर दंडात्मक कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या रेती चा लिलाव करण्यात येतो, त्यातून लाखोचा महसुल मिळाला असे वृत्त झळकते, परंतु करोडो चा शासनाचा महसुल बुडविणाऱ्या रेती तस्करांवर होणारी कारवाई ही नगण्य आहे. "तेच-ते" तस्कर यात सक्रिय आहेत. महिन्याकाठी करोडो रूपयांची उलाढाल यात होत असते, राजकीय वलयामुळे या अवैधधंद्याना जिल्ह्यात खतपाणी मिळाले आहे, असे बोलल्या जाते आणि त्यात तथ्य ही आहे. मिळणाऱ्या करोडो रूपयांच्या मायेने अपराधी प्रवृत्तीची हिंमत वाढली आहे. अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यास ही ते मागे-पुढे पाहत नाहीत, ही बाब सामाजिक हितासाठी घातक आहे. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.


  • गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक रहायलाचं हवा-उपमुख्यमंत्री

काही दिवसांपूर्वी पुणे-कोथरूड येथील गुंड गजा मारणे ची निघालेली रॅली त्यानंतर घडलेला घटनाक्रम हा महाराष्ट्रासाठी भूषणावह नक्कीच नाही. पोलिसांनी असे प्रकार खपवून घेवू नयेत, गुन्हेगारांवर त्यांचा वचक रहायलाचं हवा अशी संतप्त प्रतिक्रिया त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गजा मारणे यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून गज्या मारणे फरार झाला आहे. नुकतेच काही दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात तर एका गुंडाने भर दिवसा दारू पिऊन उधम मजविला, शस्त्र घेऊन रस्त्यावर धिंगाणा घातला, एवढ्यावरचं तो थांबला नाही तर पोलिस स्टेशन मध्ये जाऊन सामानाची नासधुस करीत चक्क ठाणेदारांच्या खुचींवर ही तो विराजमान झाला, या घटना पोलिस विभागाची "अब्रु" काढणाऱ्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात घडणाऱ्या अपराधी प्रवृत्तीवर पोलिसांनी कोणतीही तमा न बाळगता योग्य ती कारवाई करायलाच हवी.



चोर, उच्चकों की करो कद्र....!!

काही महिन्यांपूर्वी नदी घाटावरून संबंधित अधिकाऱ्यांनी रंगेहात रेतीचे वाहन पकडले. त्यानंतर एका स्थानिक लोक प्रतिनिधीने आपल्या पदाचा वापर करीत त्या अधिकाऱ्याला ते वाहन सोडण्यास भाग पाडले. नुकतेचं दिवसांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून लाच घेतांना एका तथाकथित समाजसेवक-राजकारण्यास पकडल्यानंतर त्याची चुकी माफ करण्यात यावी, यासाठी एका लोकप्रतिनिधीने केलेली करतुत ही त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. लोकांनी त्यांना जनतेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडून दिले आहे, हे बहुतेक असे लोकप्रतिनिधी विसरल्याचे दिसत आहे. स्वतः आपणचं "राजे" आहोत या भ्रमात असणाऱ्यांना ही संबंधित अधिकाऱ्यांनी वचक दाखवायलाच हवा. ज्यांना हाथकड्या पडायला हव्या, ते "पांढरपेशे" आज समाजात दिमाखाने मिरवितांना दिसत आहेत. म्हणूनचं...

"हादसा" बनके बाजार में आ जायेगा।
जो नहीं होगा वो "अखबार" में आ जायेगा।।
चोर, उचकोंकी करो कद्र।
न जाने कोन कोनसी सरकार में आ जायेगा ।।

हा प्रसिद्ध शायर डॉ. राहत इंदौरी चा "शेर" जिल्ह्यातील घडणाऱ्या घटनांवर तंतोतंत जुळणारा आहे, यात संशय नाही.

Post a Comment

0 Comments