- आदिवासी बांधवांना अंधारात ठेवून लाखोंची कमाई !
- बँक अधिकारी व भुमाफियांची मिलीभगत, वरिष्ठ स्तरावर चौकशीची नागरिकांची मागणी !
जिवती (प्रति.)
पहाडावर स्थित चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील पाटण येथे मागील काही वर्षापासून आदिवासी बांधवांच्या जमिनीवर कर्ज घेणारी गैरआदिवासी भुमाफियांची टोळी सक्रिय असून या व्यवसायातून आदिवासी बांधवांना अंधारात ठेवून लाखो रूपयांची माया जमविणाऱ्या भुमाफियांना बँक अधिकाऱ्यांची 'अर्थ'पूर्ण सोबत मिळत असल्यामुळे आदिवासी बांधवांची अक्षरशः लुट करण्यात येत असून यापूर्वी सदर प्रकरणासंबंधात पाटण पो.स्टे. येथे तक्रारी करण्यात आल्या व नंतर आपसी समझौत्यामधून त्या तक्रारी मागे घेण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या गैरप्रकारात वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांचा सहभाग हा अत्यंत चिंतेचा विषय आहे.
- असा होतो व्यवहार !
जिवती तालुक्यातील पाटण येथे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतात. अल्पशिक्षीत असलेल्या या आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीवर त्यांना बँकेमार्फत शासकीय योजनांवर कर्ज दिले जाते. त्यासाठी या शेतकरी आदिवासी बांधवांचे सात-बारा कोरा असणे अनिवार्य आहे. पहिल्या वर्षी घेतलेले कर्ज दुसऱ्या वर्षी पूर्णपणे परतफेड करता न आल्याचा लाभ येथील भुमाफियांकडून घेण्यात येत आहे. आदिवासी बांधवांचे थकित कर्ज बँकेमध्ये भरून दुसऱ्या वर्षी च्या कर्जातील काही वाटा स्वतः ठेवायचा आणि काही आदिवासी बांधवांना द्यायचा असा गोरखधंदा आहे. मिळालेल्या माहितीनुसार ६०:४० असा वाटा या भुमाफिया व आदिवासी बांधवांचा याठिकाणी असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासोबतचं शेतात पिकणाऱ्या वस्तु ही त्यांनाच विकायचा या शर्तीवर हा व्यवहार केला जातो. महत्वाचे म्हणजे यातील काही आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीचे सात-बारा हे वर्षानुवर्षे या भुमाफिया दलालांपाशीचं गिरवी ठेवण्यात येत असल्यामुळे परस्पर या भुमाफियांकडून बँकेमधून आदिवासी बांधवांच्या नावाने कर्जाची उचल केली जाते. किती कर्ज उचलले व किती शिल्लक आहे याची साधी कल्पना ही या भोळ्या-भाबड्या आदिवासी बांधवांना नसते, ही यातील खरी शोकांतिका आहे.
- पाटण येथील बँक अधिकाऱ्यांचा व्यवहार संशयास्पद !
महत्वाचे म्हणजे पाटण येथे स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा आहे. पुर्वीपासून कर्जाची उचल याच बँकेतून होत असल्यामुळे आदिवासी शेतकरी बांधवांचा या बँकेशी व्यवहार जुळलेला आहे. याचाच लाभ पाटण येथील भुमफियांकडून घेतला जात असल्याचे सांगण्यात येते. अनेक वर्षापासून या व्यवसायात कार्यरत असलेले या स्थानिक भुमाफीयांनी या व्यवहारातून करोडो रूपयांची माया कमविली आहे. शासनस्तरावर शेतकऱ्यांसाठी बँकेचा व्यवहार हा अत्यंत पारदर्शक करण्यात आला असला तरी या शेतकरी बांधवांचा अशिक्षीतपणाचा फायदा व बँक अधिकाऱ्यांशी संगनमताने पाटण येथील हे भुमाफिया दलाल गब्बर झाले आहेत. बँकेसोबत दलाली व आदिवासी बांधवांची फसवणुक अशा दुहेरी कामातून आदिवासी बांधवांची लुट थांबविण्यात यावी, अशी मागणी आता होवू लागली आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जप्रकरणे मंजूर करण्यात येतात. मागील महिन्यात पाटण येथील किती आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीवर कर्जाचे वितरण करण्यात आले व ते त्यांच्यापर्यंत पोहोचले कां? याची प्रत्यक्ष चौकशी वरिष्ठ स्तरावर करण्यात यावी, अशी मागणी नुकतीच चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली असून पुढे काय होते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
0 Comments