गडचांदूर शहरात बनावट तंबाखुची विक्री !



आशुतोष ढोके या शिक्षकाचा एल्गार!
  • बनावट तंबाखुमुळे कॅन्सरसारख्या आजारांमध्ये वाढ होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना घेवून २ ऑक्टोंबर ला ढोके गुरूजींचे आंदोलन !

चंद्रपूर (प्रति.)
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदी असलेला सुगंधित तंबाखूची आज खुले आम विक्री होत आहे. बनावट तंबाखूमुळे शौकीनांचे व नवतरूण युवकांच्या आरोग्याला धोक्यात टाकण्यात येत आहे. परंतु या व्यवसायाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गडचांदूर शहरामध्ये आशुतोष ढोके या शिक्षकाने या विरोधात एल्गार पुकारला असून नवतरूण, शैक्षणिक क्षेत्रातील युवकांना यापासुन आरोग्याच्या गंभीर धोका संभवत असुन कॅन्सर सारख्या आजाराचे रूग्ण गडचांदूर शहरात वाढत आहे, या गंभीर विषयावर ढोके गुरूजींनी यापूर्वी गडचांदूर पोलिस स्टेशन सोबतचं अन्य संबंधित विभागाकडे गडचांदूर शहरात बनावट तंबाखुची होत असलेली विक्री बंद व्हावी यासाठी तक्रारी केल्या आहेत, परंतु कोणत्याच विभागाने या गुरूजींच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर १२ सप्टेंबर २०२१ रोजी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे सदर गंभीर प्रकरणात दाद मिळावी अशी मागणी केली. मुनगंटीवार यांनी अन्न प्रशासन विभागाचे सहा. आयुक्त आयुक्त यांचेकडे गडचांदूर शहरात बनावट तंबाखु विक्रीची दखल घेण्यात यावी, या आशयाचे पत्र दिले. परंतु संबंधित विभागाकडून अद्यापपावेतो गडचांदूर शहरातील बनावट तंबाखू विकणाऱ्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

याविरोधात आशुतोष ढोके गुरूजींनी २ ऑक्टोंबर गांधी जयंती दिनी "गडचांदूर शहरात तंबाखू बॅन" यासाठी बस स्टैंड ते पोलिस स्टेशन पर्यंत रॅली चे आयोजन केले असून या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसोबतचं विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. एखाद्या शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे यासाठी अशा घातक वस्तुंची निर्मीती करणारे व विक्री करण्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागत असेल तर कारवाई करण्याची जबाबदारी असणाऱ्या संबंधित भ्रष्ट विभागासाठी ही लाजेची बाब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार निर्बंध असणाऱ्या सुगंधित तंबाखुची विक्री करणारे गडचांदूर शहरामध्ये ४ मोठे व्यापारी आहेत. गडचांदूर शहरात मुख्य रस्त्यावर या मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. बनावट तंबाखूची विक्री याच दुकानातून होत असते व त्याची माहिती पोलिस विभागापासून साऱ्याच राजकारण्यांना आहे. मग विद्यार्थी व नवयुवकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या या व्यापाऱ्यांविरोधात साऱ्यांनीच पुढाकार घ्यायला हवा, परंतु शिक्षणाचे पवित्र कार्य करणारे ढोके गुरूजी यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना घेवून अशा प्रकारे रस्त्यावर उतरावे लागत असेल तर स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणान्यांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. "ढोके सर ! आपले सोबत समाज उभा आहे, आपल्या या समाजहिताच्या कार्यात आमचा संपूर्ण सहभाग आहे. सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील मुख्य व्यापाऱ्याचा ३० वर्षापुर्वी गडचांदूर शहरात मोठा व्यवसाय होता. त्यावेळस सुगंधित तंबाखू बंद असलेल्या आत्ताचे तेलंगणा व त्यावेळसचे आंध्रप्रदेशामध्ये गडचांदुर शहरामधूनचं पुरवठा व्हायचा, तोच व्यापारी आज चंद्रपूर शहरातील सुगंधित तंबाखूचा आज मुख्य म्होरक्या असल्याची माहिती आहे.

  • बॅन असलेल्या सुगंधित तंबाखूचा व्यापार !
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये २०१२ पासून सुगंधित तंबाखुवर बॅन आहे. परंतु हा सुगंधित तंबाखू आज संपूर्ण जिल्ह्यातचं खुले आम विकल्या जातो. मुळ सुगंधित तंबाखूमध्ये मिलावट करून याची विक्री होत असून संपूर्ण जिल्ह्यात जयसुख, मनसुख, वसिम, जितेंद्र, गुप्ता, सदानंद, लक्ष्मी व राजुऱ्यातील अर्जुन हे व्यापारी या व्यवसायातील म्होरके आहेत. अनेकदा यासंदर्भात वृत्त ही प्रकाशित झालेले आहेत. अन्न प्रशासन विभागाने यापूर्वी यांचेवर कारवाई केली आहे. यांचे बनावट तंबाखूचे कारखाने, गोडाऊन याची संपूर्ण माहिती जिल्ह्यातील संबंधित विभागाला आहे. मुख्यालय असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये मुख्य मार्गावर या व्यापाऱ्यांचे गोडाऊन असल्याची माहिती आहे. "कुणाला किती ही सुचना द्या" या व्यापाऱ्यांवर कारवाई होतचं नाही, झाली तरी ती थातुरमातुर कारवाई होते. यापूर्वी एका मोठ्या राजकीय पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्याने स्वतः आपल्या कार्यकर्त्यांना सोबत एका व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर प्रत्यक्ष धाड टाकून त्याची माहिती संबंधित विभागाला दिली, गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आज त्यानंतर ही या व्यापा-यांचे व्यवसाय जैसे थे सुरू आहेत. सुगंधित तंबाखूचा मोठा व्यापार जिल्ह्यात फोफावला आहे. राजुरा तालुक्याला आता या व्यापाऱ्यांनी मुख्य केंद्र बनविले असल्याचे कळते. अन्न व औषध प्रशासन विभाग 'आमचेकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही.', म्हणून हात झटकतो तर पोलिस विभागाला स्वतःहुन या व्यवसायावर कारवाई करण्याचा अधिकार नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीनंतर पोलिस विभाग यात सहभागासाठी सामिल होत असल्याची माहिती आहे. परंतु मुख्यालयातील साऱ्याच मोठ्या व्यापाऱ्यांच्या पोलिस विभागातील अधिकाऱ्यांशी साटेलोटे असून दर महिन्याचा मलिदा घ्यायला हे कर्मचारी या व्यापाऱ्यांकडे आवर्जुन पोहोचत असल्याची विश्वसनिय माहिती आहे.
गडचांदूर शहरात आशुतोष ढोके या शिक्षकाने गांधी जयंती दिनी याविरोधात पुकारलेला एल्गार सुज्ञ जणांसाठी मोठा संदेश देणारा असुन शिक्षणाचे पवित्र करणाऱ्या एखाद्या शिक्षकाने तंबाखूच्या विरोधात पुकारलेले हे आंदोलन प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर 'थोबाडावर मोठा तमाचा' आहे.

Post a Comment

0 Comments