साहित्य संमेलनात गुंजला राष्ट्रभक्तीचा स्वर!!कवी प्रशांत भंडारे याच्या शब्दार्पण कवितेने गाठला रसिकांच्या मनाचा तळ!

कोठारी- बल्लारपूर तालुक्यातील लहानश्या आमडी या गावातील शिक्षक म्हणून सेवेत असलेले प्रतिभावान कवी प्रशांत मंगरू भंडारे यांनी उदगीर जिल्हा- लातूर येथे दिनांक 22, 23, 24 एप्रिल 2022 रोजी संपन्न होत असलेल्या 95 या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपल्या 'शब्दार्पण' या कवितेचे नुकतेच सादरीकरण केले. स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना आपल्या कवितेतून त्यांनी भावपूर्ण शब्दश्रद्धा अर्पण केली.
*आजन्म सोसली दुःखे, स्वातंत्र्य भारतासाठी*
*मी अर्पण करतो ओळी , त्या अमर हुतात्म्यासाठी*
अतिशय सुंदर वीर रसातील, अंगावर रोमांच आणणारे सादरीकरण व यथार्थ वर्णन रसिक साहित्य श्रोत्यांना आपलेसे करून गेले. टाळ्याच्या प्रचंड कडकडाटात रसिकांची दाद या कवितेची उत्कटता दर्शवून गेली.
*रोमांच स्फुरावे अंगी स्मरताच क्रांतीची गाथा,*
*डोळ्यात तिरंगा येतो टेकतो त्या पुढे माथा*
अशा देशभक्ती आणि शब्द अलंकारांनी नटलेली वृत्तबद्ध कविता श्रोत्यांच्या मनात घर करून गेली. प्रत्येक सानथोरांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणारी ठरली या अप्रतिम कवितेबद्दल त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सन्मानासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments