१५ सप्टेंबर "अभियंता दिना" Engineer Day पुरते उरलेले सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या!



१९५५ मध्ये 'भारतरत्न' देण्याचे पत्र विश्वेश्वरया यांना पंतप्रधान नेहरूंकडून मिळाले. त्यावर उत्तर देताना ९५ वर्षांचे विश्वेश्वरय्या पंतप्रधान नेहरूंना लिहितात, 'तुम्ही मला 'भारतरत्न' हा देशाचा सर्वोच्च किताब देऊ करत आहात; मात्र मी एक गोष्ट स्पष्टपणे नोंदवून ठेवतो, 'अशी पदवी दिल्यावर आपल्या सरकारने केलेल्या कामाची स्तुतीच करीन, अशी तुमची अपेक्षा असेल तर मी तसे करणार नाही. अयोग्य कामावर मी टीका करणारच. हे तुम्हाला मान्य असेल तर आणि तरच मला पदवी द्या.' नेहरूंनाही हे परखड मत फारच आवडले.


आपण खरोखरीच ज्ञानयुगात असतो तर विश्वेश्वरय्या यांच्या कर्तबगारीचा वेध घेण्यासाठी सर्व भाषांतून असंख्य पुस्तके व वृत्तचित्रे समोर आली असती. धरण, पाणी योजना, पूल, मलनिःसारण यंत्रणा या त्यांच्या अभिकल्पांचा व नियोजनाचा आज कसा उपयोग होऊ शकतो? प्रचलित प्रकल्पांमध्ये उणीवा कोणत्या आहेत? त्यांना दीर्घायू व आपत्तीरोधक कसे करता येईल? आजच्या धोरणकर्त्यांनी या प्रश्नांवर खुल्या चर्चा घडवल्या असत्या; परंतु आपल्याकडे कंत्राटदारशाही रुजू झाल्यापासून (केव्हापासून या तपशिलात मतभेद असू शकतात.) 'विश्वेश्वरय्या हे फक्त १५ सप्टेंबरपुरते उरले आहेत.' अभिकल्प ते अंमलबजावणी सबकुछ ठेकेदार असा प्रायोजित कार्यक्रम असल्यामुळे अशा दीर्घायू योजनांच्या निर्मात्याला दुःस्वप्न ठरवून त्यांच्या विचारांची उपेक्षा चालू आहे.

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या आठवणीत 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये "अभियंता दिन" Engineer day साजरा केला जातो. मागील काही वर्षापासून साप्ताहिक "विदर्भ आठवडी" या दिनानिमित्त अभियंता व कंत्राटदाराच्या नाविन्यपूर्ण स्थापत्यशास्त्रातील कलाकृतींचा गौरव करणारा विशेषांक प्रकाशित करीत असतो. प्रसिद्ध लेखक अतुल देऊळगावकर यांनी विश्वकर्मा प्रकाशनाकडून प्रकाशित "ग्रंथाची द्वारी" मधील लेखाचे अंश आपल्या लेखाद्वारे मांडले आहेत. 15 सप्टेंबर पुरते विश्वेश्वरय्या आज मर्यादित असल्याचे वास्तव या लेखात पुराव्यादारे सादरीकरण करण्यात आले असून "अभिकल्प ते अंमलबजावणी सबकुछ ठेकेदार" अशी आज झालेली स्थिती यावरील सत्य मांडणारा लेख आमच्या "अभियंता दिन विशेषांक" वाचक असणारे अभियंता व कंत्राटदारसाठी हा अभ्यासपूर्ण विशेष लेख...!



राजु बिट्टूरवार,
संपादक, विदर्भ आठवडी,
चंद्रपूर

आधुनिक भारताला आधारस्तंभ ठरवताना अनेक विद्वानांना काही क्षेत्रांचा विसर पडतो, त्यापैकी अभियांत्रिकी हे एक आहे. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आवाका व व्याप्ती पाहून 'हे सारे एक व्यक्ती करू शकते' हे वास्तव, दंतकथेसारखे अशक्यप्राय वाटू लागते. शेकडो अभियंते व अनेक संस्था करू शकणार नाहीत. अशी ती उत्तंग कामगिरी होती. कन्फ्युशियसने केलेली, 'तुम्हाला व्यक्तीचं नावसुद्धा माहीत नसेल, तरीही त्याच्या ज्ञानाचा लाभ जगभर पोहोचू शकतो आणि जगात बदल घडून येतो, तोच खरा युगप्रवर्तक ज्ञानी!' अशी व्याख्या त्यांच्याबाबतीत चपखलपणे लागू पडते. विसाव्या शतकाच्या आरंभी कलेच्या क्षेत्रात 'अल्प हेच अधिक आहे (लेस इज मोअर)' हा किमानतावाद (मिनिमलीझम - कुठल्याही बाबीचा कमीत कमी वापर) दिसू लागला होता. १९६० नंतर चित्रकला, संगीत या क्षेत्रातही किमानतावादी तयार झाले. आपल्याकडे त्या आधी ७५ वर्षे म्हणजे १८८५ मध्येच विश्वेश्वरय्या किमानतावाद वास्तवात उतरवला होता. द्रष्टे अभियंता, अभिकल्पक, अर्थनितीज्ज्ञ, नियोजक. शिक्षणतज्ज्ञ व आयुष्यभर गरिबांसाठी झटणाऱ्या अलौकिक विभूतीला आपण केवळ 'अभियंता दिन' साजरा करण्यापुरते मर्यादित करण्याचे कार्य करतो. विश्वेश्वरय्या (१८६१-१९६२) यांनी पिण्याचे पाणी, सांडपाणी, सिंचन व धरण यांची व्यवस्था करताना भांडवल व ऊर्जा यांचा अतिशय किमान वापर व्हावा, असा कटाक्ष ठेवला होता. या योजनांची शताब्दी उलटून गेल्यानंतरही त्या उत्तम चालू आहेत.
विश्वेश्वरय्या यांनी म्हैसूर राज्याची शिष्यवृत्ती मिळवून १९८१ ला पुण्याच्या कॉलेज ऑफ सायन्सेस' (कालांतराने ते 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग' झाले आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वेश्वरय्या हेच होते.) मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी पुणे हे राष्ट्रीय घडामोडींचे केंद्र होते. न्या. रानडे, टिळक, आगरकर, कर्वे यांच्या व्याख्यानांना ते आवर्जून जात असत. पुढे या सर्व प्रभृतींशी भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा केली आहे. या काळात त्यांनी मराठी शिकून घेतले. पुढे अभियंता झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने
त्यांच्यावर खानदेशचा कार्यभार सोपवला. (महाराष्ट्रात त्यांचे २८ वर्षे वास्तव्य होते.)
विश्वेश्वरय्या यांच्यासमोर धुळे येथे १६ किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा करण्याचे पहिले आव्हान आले. त्यांनी जलवाहिन्या आखून वक्रनलिका (सायफन) तत्त्वाने पाणी आणण्याचे ठरवले. त्या काळातही बांधकाम यंत्रणेत 'साचेबद्ध चाकोरी' करणारे कर्मचारी व ठेकेदार होते. 'नियमानुसार' जाणारे व अहंगंडाने उन्मत्त झालेले बिटिश अधिकारी आग्रह धरला. इतकेच नाही तर त्यांनी नीरा नदीवरही पाणी वाटप पद्धत यशस्वी करून दाखवली. १९०८ च्या मुंबई गॅझेटियरमधील नोंदीत 'नीरा कालव्यावरील ब्लॉक पद्धत राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न व सरकारचा महसूल वाढला. याचे श्रेय बुद्धिमान, कार्यक्षम व दक्ष अधिकारी विश्वेश्वरय्या यांना जाते,' अशी माहिती नमूद केली आहे. त्यामुळे त्यांनी कुकडी, मुठा, प्रवरा व गोदावरी येथे ब्लॉक पद्धत करण्याच्या योजना केल्या. पूर येताच पाण्याच्या दाबाने दरवाजे आपोआप उघडतील आणि पूर ओसरताच पुन्हा पूर्ववत होतील, असा कल्पक अभिकल्प विश्वेश्वरय्या यांनीच जगाला दिला. त्यांनी पुण्यासाठी खडकवासला धरण बांधून त्यावर सरकणारे स्वयंचलित दरवाजे (ऑटोमॅटिक गेट्स) बसवले आणि मित्रांच्या आग्रहामुळे त्याचे पेटंट प्राप्त केले.
विश्वेश्वरय्या यांची ही ख्याती ऐकलेल्या कोल्हापुरातील महाराजांनी मातीचे धरण फुटण्याचा धोका टाळण्यासाठी त्यांना पाचारण केले. त्यांनी धरण भरताच पाणी निघून जाण्याची व्यवस्था सुचवली. तीन वर्षांनंतर राधानगरी धरण बांधून दिले. काही कालावधीत त्यांनी धारवाड, विजापूर या शहरांसाठी पाणीपुरवठा योजना केल्या. मुंबई नगरविकासासाठी आराखडा तयार करून त्यानुसार अडथळे काढून टाकले. १९०८ ला ब्रिटिशांच्या नोकरीतून निवृत्ती घेऊन विश्वेश्वरय्या हे युरोप, अमेरिका, कॅनडा व रशिया देशांचा दौरा करून आले. निझाम सरकारने त्यांना मुख्य अभियंता हे पद बहाल केले. हैदराबादला महाविध्वंसक पूर येऊन गेला होता. पूर नियंत्रण, मलनिःसारण व सांडपाणी व्यवस्थापन ही आव्हाने त्यांनी लीलया पेलवून दाखवली. हैदराबाद, इंदूर, बंगळूर, म्हैसूर, बेळगाव व मुंबई (नवी अंधेरी) या शहरांची रचना, विस्तार यासाठी आराखडा करून दिला. १९०९ ला म्हैसूरच्या महाराजांनी विश्वेश्वरय्या यांना मुख्य अभियंता होण्याची विनंती केली. त्यावर विश्वेश्वरय्या यांनी लिहिले, 'देशाच्या विकासासाठी पायाभूत सेवा, तंत्रशिक्षण व उद्योग चालू करणे आवश्यक आहे; हे मला माझ्या विदेश दौऱ्यातून लक्षात आले आहे. आपल्याला अशी इच्छा आहे का? माझे नकाशे, योजना व अंदाजपत्रके युरोपियन अधिकाऱ्याला दाखवू नयेत. काम चालू असताना समिती नेमून अडथळा आणू नये. मी राज्याच्या भल्यासाठीच करीन, यावर पूर्ण विश्वास ठेवावा. शंका असल्यास थेट मला विचारावे.' या विश्वेश्वरय्या यांनी घातलेल्या अटी मंजूर झाल्यावर ते रुजू झाले. १९१९ ला निवृत्त होताना ते म्हैसूरचे दिवाण (प्रशासक) होते. या काळात ३०० किलोमीटर रेल्वे मार्ग तयार झाले. (त्यांचे उद्दिष्ट होते १५०० किलोमीटरचे) 'पायाभूत सेवा द्या, विकास आपोआप होईल' हे त्यांचे ब्रीद होते. त्यानुसार त्यांनी म्हैसूर राज्याला तयार केले. भटकळ बंदर विकसित करण्याच्या त्यांच्या संकल्पनेला इतर अधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता; परंतु भारत सरकारच्या कमिशनने, 'कोलार व भद्रावती येथील उद्योगांना नवी चालना मिळेल,' असा निर्वाळा दिल्यानंतर मार्ग सुकर झाला. १९११ ते १९३१ या २० वर्षात त्यांनी कृष्णराजसागर धरण प्रकल्प पूर्णत्वास नेला. कावेरी नदीवरील आठ हजार ६०० फूट लांब, १४० फूट उंचीचे, २.४३ कोटी खर्च आलेले हे धरण त्या काळातले भारतातील सर्वात मोठे व पूर्णतः भारतीय अभियंत्यांनी अभिकल्पित केलेले होते. धरणाला लागलेल्या १६१ दरवाजांपैकी १३१ भद्रावतीला तयार करण्यात आले तर केवळ ३० आयात महत्वाकांक्षेमुळेच! कर्मयोग हा आचरणातन व्यक्त करणारे विश्वेश्वरय्या हे शब्दांतून कधीही व्यक्त होत नसत. शिस्तप्रिय, कर्तव्यकठोर, मितभाषी, स्तुती व निंदा दोन्हींना मनावर न घेणारे कमालीचे संयमी, कितीही कटू प्रसंगातही शांत व नम्रपणे आपली मते स्पष्टपणे मांडणारे, असे अतिशय विरळा व्यक्तिमत्व होते. विश्वेश्वरय्या यांच्या घरातील वातावरण अतिशय धार्मिक असूनही ते निरीश्वरवादी होते. ते कधीही देवळात गेले नाहीत. धार्मिक उत्सवात सहभागी झाले नाहीत वा कुठल्याही कार्यारंभी देवाला नमस्कार केला नाही. समस्त भारतीयांशी तुच्छतेने वागणाऱ्या बिटिश अधिकाऱ्यांनाही त्यांचा धाक वाटत असे; तर ब्रिटिश अभियंत्यांना त्यांच्या कर्तृत्वाविषयी विलक्षण आदर होता. त्यामुळेच १९१३ ला त्यांना ब्रिटनच्या राणीने 'सर' (नाइटहूड) हा बहुमान बहाल केला.

लेखक: अतुल देऊळकर (साभार)
(विश्वकर्मा प्रकाशनाकडून प्रकाशित 'ग्रंथांचिया द्वारी'मधील काही अंश)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या