बंदी असलेला सुगंधी तंबाखू, अवैध दारू व अनेक गैरव्यवसाय जिल्ह्यात बंद आहेत कां?
राजकीय वरदहस्ता़मुळे सूरू आहेत गैरप्रकार ?
चंद्रपूर (वि.प्र.) : मागील काही वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदी असलेला सुगंधीत तंबाखू मोठ्या प्रमाणात राज्यात विकल्या जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही हा व्यवसाय मोठ्या स्तरावर फोफावला आहे. मागील काही वर्षात अशा व्यवसायांना आणि अशा अनेक व्यवसायांवर आणि व्यवसायिकांवर मोठ्या प्रमाणात धाडी टाकण्यात आल्या, त्यांची गोडाऊन जप्त करण्यात आले, गून्हे दाखल करण्यात आले. लाखोचा सुगंधित तंबाखु पोलीस विभाग व अन्न व प्रशासन विभागाने जप्त केला. परंतु मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये सुगंधीत तंबाखू व अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई मात्र होतांना दिसत नाही. महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधीत तंबाखू जिल्ह्यात येतच नाही की यामध्ये झालेल्या "सेटिंग" मुळे हा व्यवसाय काही मोजक्या व्यापार्‍यांच्या हातात गेलेला आहे, हा संशोधनाचा विषय आहे. असं सांगण्यात येते की, बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू चा व्यवसाय हा सध्या राजुरा येथून चालविण्यात येत असून राजुरा तालुका सुगंधित तंबाखू चे हब बनला आहे. सुगंधित तंबाखू च्या अवैध व्यवसायात जुनी "लॉबी"चं जोमाने सक्रीय असून "तेरी भी चुप और मेरी भी चुप" या तत्वावर राजकीय वरदहस्तातून झालेल्या "सेटिंग" मुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या स्तरावर सूरू असलेल्या करोडोंची उलाढाल असलेल्या या कारभाराकडे पोलिस व संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या स्तरावर दारूबंदी हटल्यानंतर ही अवैध दारू विक्री होत आहे परंतू या दारू विक्रेते व त्यांच्या म्होरक्यांवर वर कारवाई करण्यात राज्य उत्पादन विभाग व पोलिस विभागाला म्हणावे तसे यश येत नाही, या प्रकरणाचा शोध घेणे गरजेचे आहे. या संपूर्ण लॉबीला राजकीय वरदहस्त प्राप्त असल्यामुळे शासकीय विभागातील प्रामाणिक अधिकाज्ञऱ्यांचे हात बांधल्या गेल्याची सुत्रांची माहिती आहे. रेती तस्करी, कोळसा तस्करी ही जिल्ह्यात एका विशिष्ट पांढरपेशा वर्गाकडून काही राजकीय पक्षांच्या आडून खूले आम सूरू आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, मंत्र्यांच्या आगमनाचे मोठ-मोठे फलक झळकावून, विशिष्ट सणा-सुदीला नागरिकांना शुभेच्छा फलक मुख्य भागात लावून शहराला विद्रुपीकरण करणारे, स्वतः आपण फार मोठे समाजसेवक आहोत असे दाखविणाऱ्या काही नतद्रष्ट महाभागा़ची या गैरव्यवसायात कशी भागिदारी आहे, हे जिल्ह्यातील प्रामाणिक अधिकारी खाजगीत सांगतात. जिल्ह्याला गुंड्यांचा आणि अवैध व्यवसायाचा अड्डा बनविण्यात सक्रीय असणाऱ्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या अधिकाऱ्यांची आज जिल्ह्याला नितांत गरज आहे.

अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी पोलिस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली गठीत झाली जिल्हास्तरीय कार्यकारी समिती ?
25 एप्रिल अमली पदार्थांची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या नेतृत्वाखाली गठण करण्यात आली आहे. 10 सदस्यांचा समावेश या समितीत आहे.
या समीतीत उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अन्न व औषधी प्रशासनाचे उमाकांत वाघमारे, राज्य शुल्क उत्पादन विभागाचे अधिक्षक संजय पाटील, मुख्य डाकघरचे अधिक्षक वी.व्ही. रामिरेड्डी, केंद्रीय वस्तु व सेवाकर विभागाचे श्री. पॉल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांचा समावेश आहे. शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे सदर समितीचे गठण करण्यात आले असून यात जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीचा नियमित आढावा घेणे, जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होणार नाही, याची दक्षता घेणे. कुरीअरच्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही याकडे लक्ष ठेवणे, व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल झालेल्या व्यक्तिंची संख्या व त्यांना कोणत्या अंमली पदार्थाचे सेवन आहे काय, याची माहिती प्राप्त करणे, ड्रग्ज डिटेक्शन किट आणि टेस्टिंग केमिकल्स यांची उपलब्धता निश्चित करणे, जिल्हास्तरावर अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती अभियान राबविणे, जिल्हा पोलिस, नार्कोटिक विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती संकलित करून डाटाबेस तयार करणे, एनडीपीएस अंतर्गत गुन्ह्यांच्या तपास अधिका-यांकरीता प्रशिक्षण आयोजित करणे तसेच जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घेणे आणि बंद असलेल्या कारखान्यांवर विशेष लक्ष देणे आदिंची जबाबदारी आहे.
या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सूरू असलेल्या वरील गैरप्रकारांवर आळा बसविण्यासाठी ही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजवावे अशी रास्त अपेक्षा जिल्ह्यातील जनता त्यांचेकडून बाळगत असेल तर त्यात काही वावगे नाही. गठीत समितीच्या समस्त सदस्यांचे अभिनंदन व त्यांचेकडून दिलेल्या जबाबदारीचे निस्वार्थ कार्य घडो, या शुभेच्छा !

Post a Comment

0 Comments