कोणाला हरवून नाही तर सर्वांना सोबत घेऊन जगणारा जनसाहित्यिक : बंडोपंत बोढेकर bodhekar bandipant



जुनासुर्ला (लक्ष्मण खोब्रागडे)
यशस्वी तोच होतो, जो स्वतःबरोबर इतरांना सोबत घेऊन जातो. इतरांना मोठे केले की , आपली उंची आपोआप वाढत जाते. इतरांच्या यशात वाटाड्याची भूमिका घेऊन समाधानाची तृप्तता अनुभवायला विशाल अंतःकरण लागते . अशी विशाल हृदयाची माणसे मातीत उगवून आकाशापर्यंत पोहचतात . त्यांच्या छत्रछायेत कित्येकांच्या यशाच्या मालिका दडलेल्या असतात . त्यांच्या सहवासात न हरण्याची भीती ना अपयशाचे शल्य असते , फक्त जीवनाचा प्रत्येक क्षण सत्कारणी लागल्याची आत्मिक अनुभूती मनाला नवी उभारी देत असते . त्यासाठी परिस बनून प्रयत्नाचे सोने बनवणारा हात पाठीशी असावा लागतो . असाच इतरांना यशाचे गमक सांगत नवी ओळख निर्माण करून देणारा मार्गदर्शक म्हणून जनसाहित्यिक बंडोपंत बोढेकर कित्येकांच्या जीवनाला कलाटणी देण्याचे अपूर्व कार्य करीत आहेत.
राष्ट्रसंताचे विचार घेऊन झाडीबोलीच्या चळवळीत ध्रुवताऱ्याप्रमाणे काम करणाऱ्या ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी साहित्य क्षेत्रात कित्येकांना प्रसिद्धी मिळवून दिली; यापेक्षा हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्वतयारीपासून आयोजनापर्यंत प्रत्येक क्षण स्वतःला झोकून देणारे तळमळीचे व्यक्तिमत्त्व मी जवळून अनुभवले आहे . कार्यक्रम कोणाचा आहे यापेक्षा त्या कार्यक्रमाची यशस्वीता बोढेकर सरांना स्वस्थ बसू देत नाही , यासाठी संस्काराने मिळवलेला परोपकारी काळीज प्रत्येकालाच लाभत नाही . त्यासाठी स्पर्धेच्या युगातील कोती मानसिकता सोडून , ग्रामगीतेच्या सारातील एकोपा टिकवण्याची किमया शिकावी ती ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्याकडून . झाडीच्या गर्भात दडलेली अनेक रत्ने शोधून त्यांना पैलू पाडण्याचे पुण्यकर्म बोढेकर यांच्या हातून घडत आहे . स्वार्थापलीकडे परमार्थाचा अध्याय बंडोपंत यांच्या व्यक्तिमत्वाची उंची वृद्धिंगत करीत आहे . स्वतः साहित्यिक असले तरी इतरांतील साहित्यिक जागृत करण्याचे संजीवन बंडोपंत बोढेकर यांच्या रूपाने झाडीबोलीला प्राप्त झाले आहे .
प्रपंच, व्यवसाय, साहित्य, समाजसेवा, प्रबोधन आणि विविध क्षेत्र सांभाळत राष्ट्रसंताचे कार्य गावोगावी पोहचविण्याची त्यांची उर्मी बोढेकरांच्या व्यक्तिमत्वाचा तेज प्रसवते . या तेजाने कित्येक चळवळी पावन झाल्या आहेत . हरविणे नाही तर इतरांना सोबत घेऊन जगणे हाच ज्यांच्या जीवनाचा ध्येय आहे , असे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आज जनसाहित्यिक म्हणून आम्हाला प्रेरक आहेत . मायेची ममता घेऊन यशाचा घास भरवणाऱ्या या अवलीयाला दीर्घायुष्य लाभून आम्हाला सदोदित चैतन्यमय सहवास लाभो, हीच निर्मिकचरणी वंदना ।

-लक्ष्मण खोब्रागडे
जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर
९८३४९०३५५१

मागे वळून पाहताना.....!



.....सहा वर्षांपूर्वी मी गडचिरोली शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने आलो आणि मी एक मनाशी खुणगाठ बांधून घेतली की , येणाऱ्या पुढील वर्षात झाडीबोली साहित्य मंडळाचे काम वाढवण्याच्या दृष्टीने जिल्हा शाखा मजबूत करणे, काही जुन्या- नव्या शाखांचे पुनर्गठण करणे आणि साहित्य विषयक उपक्रमांचे आयोजन करणे, यावर जोर द्यावा असे ठरवून कामाला लागलो होतो.
..... गडचिरोली जिल्ह्यात अनेक गुणी, साहित्य प्रेमी मंडळींनी या कार्यात मला साथ दिली.‌ जिल्हाप्रमुख डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मंडळाच्या माध्यमातून सातत्याने मासिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, साहित्य पुरस्कार वितरण या सारखे उपक्रम ह्या शाखेंनी आयोजित केलेले होते.  त्यात माझे  फक्त दिशादर्शनच  असायचे आणि कार्य नियोजन, अमंलबजावणी मात्र सर्व सन्माननीय सदस्यांचे असायचे. मौशीखांब (ता. गडचिरोली) येथे  झालेले २७ वे झाडीबोली साहित्य संमेलन , ग्राम शाखा काटली, मौशीखांब, येनापूर,आष्टी , कोंढाळा,  या ठिकाणच्या  शाखांमध्ये जाऊन कविसंमेलनाचे आयोजन, कोरोना काळात जिल्हा शाखेच्या वतीने शासनास मदत निधी अर्पण, काव्यलेखन कार्य शाळा,   डॉ. हरिश्चंद्रजी बोरकर सरांचा अमृत महोत्सव,  'आपली माणसं- आपले शब्द' ह्या  प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे लोकार्पण आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ शकलो. या कार्यात  जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे,  सचिव कमलेशजी  झाडे , संजीवजी बोरकर , उपाध्यक्ष प्रा.  विनायकराव धानोरकर, डॉ. किलनाके साहेब,  मारोती आरेवार,उपेंद्रजी रोहणकर,रायपुरे सर, मिलिंद जी उमरे, भोजराजजी कान्हेकर , प्रमोद राऊत तसेच सर्व सन्माननीय महिला सदस्यांच्या सहकार्याने हे काम झाले आहे ,याचा मला आनंद वाटतो. विशेष म्हणजे या काळात डॉ.  चंद्रकांत लेनगुरे यांची तीन पुस्तके, भोजराज कान्हेकर यांचे काव्यसंग्रह, मारोती आरेवार यांचा काव्यसंग्रह, जितेंद्र रायपुरे यांचे दोन काव्यसंग्रह, सौ. सेमले यांचेही बाल काव्यसंग्रह  प्रकाशित झाले, या सर्व सन्माननीय मंडळींचे मी अभिनंदन करतो.
..... आज  दि‌. ११/१२/२०२२ रोजी गडचिरोली येथील  समर्थ फार्म हाऊसवर आयोजित कार्यक्रमात काव्य मैफिलीच्या आणि स्नेहभोजन स्वरूपात मला 'गोड' असा निरोप दिला. भरभरून प्रेम दिले. सत्कार समारंभ घडवून आणला, ह्या प्रेमाचं ' 'संचित 'घेऊन मी  चंद्रपूरला यापुढे काम करीत राहणार आहे, यातून मला नवी उर्जा मिळत राहील. आपल्या या  ऋणातून मी कधीच  मुक्त होऊ शकणार नाही.
...... मी जवळच चंद्रपूर येथे आहे, जेव्हा कधी तुम्ही मला  आवाज द्याल, तेव्हा मी आपल्या आवाहनाला निश्चितपणे प्रतिसाद देईल.... सातत्याने संपर्कात राहील.... एवढे  या ठिकाणी सांगतो... सर्वांना धन्यवाद देतो.... ! कळावे ...!
 बंडोपंत बोढेकर, चंद्रपूर

Post a Comment

0 Comments