अखेर बाबुपेठ येथील ‘देशी’ दारूचे दुकान नागरिकांच्या रोषानंतर 'कुलूप' बंद ! illegal Desi daru dukan




कोणतीही मोक्का चौकशी न करता देशी दारू चे दुकान स्थलांतरित करण्यात आल्याचा बाबुपेठ वासियांचा आरोप!

चंद्रपूर (वि. प्रति . )
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा वर्षानंतर दारूबंदी उठल्यानंतर अनेक दारू दुकानांना नियम धाब्यावर बसवून परवानगी देण्यात आली. चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची भुमिका दारू दुकानांचे परवाने नुतनीकरण करतांना अटी व शर्तीचे पुर्णपणे पालन करण्यात आले नाही. अपुरी चौकशी करून दारू दुकानांचे नुतनीकरण किंवा स्थलांतरित करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचेवर त्वरित कारवाई करण्याचे अधिकार चंद्रपूर चे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांना असतांना ही अद्यापपावेतो कोणत्याही अधिकाऱ्यांवर अशी कारवाई करण्यात आली नाही.

चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या बाबुपेठ परिसरात बुद्धविहाराला लागून रविवारपासुन एक देशी दारूचे दुकान सुरू करण्यात आले होते. या देशी दारू दुकानांवरून बाबुपेठ वासियांमध्ये प्रचंड असंतोष होता. महत्वाचे म्हणजे सुट्टीचे दिवस बघुन रविवार ला हे दुकान सुरू करण्यात आले. यापुर्वी ही शहरातील वडगांव परिसरात असेच एका देशी दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यानंतर जनआक्रोश निर्माण झाला होता. त्यानंतर सदर दुकानाला बंद करण्यात आले. वणी येथील व्यावसायिक नानवाणी यांनी देशी दारुचे दुकान चंद्रपूरात स्थानांतरित केले. बाबुपेठ परिसरात हे देशी दारूचे दुकान सुट्टीच्या दिवशी सुरू करण्यात आले. नियम धाब्यावर बसवून हे देशी दारुचे दुकान देण्यात आल्याचा आरोप करीत भीम आर्मी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोहणे व सुरेश नारनवरे यांनी दुकान तातडीने बंद करण्यात यावे, अन्यथा कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा देत सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तर माजी नगरसेवक स्नेहल रामटेके यांनी नागरिकांना घेऊन आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. तक्रारीची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मारोती पाटील आणि अभिजीत लिचडे यांना घटनास्थळी भेट दिली. मोक्का चौकशी केल्यानंतर तत्काळ सागर देशी दारु दुकानाला कुलूपबंद करण्यात आले असुन पुढील आदेशापर्यंत हे देशी दारु दुकान बंद राहणार आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश नारनवरे, ताई दारूंडे यांचे बयाण घेण्यात आले असुन भीम आर्मीचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोहणे यांचे आज बयाण घेण्यात येणार आहे.

योग्य चौकशी न करता देवाण - घेवाणीतुन दारू दुकानाला परवानगी देण्यात आल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पाहणी करून नियमबाह्य रित्या मंजुरी प्रदान केली त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना करण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र डोहणे व सुरेश नारनवरे यांनी बोलतांना दिली.

नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील एका ढाब्यावर अवैध दारू विक्री करतांना व दारू पिणाऱ्यांवर नागपूर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे, अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली होती. नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपआयुक्तांना जर चंद्रपूर जिल्ह्यात कारवाई चे आदेश द्यावे लागत आहे. तर चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाची भुमिका याठिकाणी संशयास्पद आहे. चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागात अनेक दारू दुकानांच्या तक्रारी केल्या आहेत. वेळेपुर्वी अनेक दारुची दुकाने उघडल्या जात आहेत. अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होत आहे. निर्धारित दरापेक्षा जास्त दराने बिअर बार मध्ये दारूची विक्री होत असल्याच्या तक्रारी असुन निर्धारित दराचे दरपत्रक परवानाधारक दुकानांच्या समोर लावण्यात यावे अशी वारंवार मागणी होत असतांना त्यावर या विभागाचे होत असलेले 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष संशोधनाचा विषय आहे. या प्रकरणी चंद्रपूर चे जिल्हाधिकारी यांनी त्वरित लक्ष घालणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments